ज्या सरकारात नोकरीची इभ्रत रहात नाही. त्या सरकारची नोकरी नको असे तात्यांनी ठरविले. तात्यांनी राजीनामा पाठविला व स्वावलंबनाने ते शोभू लागले. तात्या करारी होते. जे एकदा ठरले ते ठरले. त्यांच्यासारखा दृढवती मनुष्य दुर्मिळ होता. तात्या गांजा ओढीत असत. २५/३० वर्षांची त्यांना गांजाची सवय ! परंतु ज्या वर्षी मी त्यांच्याकडे रहावयास आलो त्या वर्षीच्या चातुर्मास्यानिमित्त 'गांजा ओढणार नाही,' असे त्यांनी व्रत घेतले. हे व्रत चालविणे किती कठीण असेल याची कल्पना करणेच बरे, दोन तपांची गांजाची सवय ! गांजेकसांची तात्यांकडे बैठक व्हावयाची. तरीही निदान चार महिन्यांपर्यंत गांजा न ओढण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले. तात्यांकडे त्यांचे मित्र येत असत. तात्या त्यांना गांजा पिळून चिलीम तयार करुन देत; परंतु स्वत: एकही झुरका ते ओढीत नसत. चार महिने या प्रमाणे गेले व तात्यांचे २५ वर्षांचे व्यसन सुटले ! विडीचे, सुपारीचे व चहाचे व्यसन आपणास सोडता येत नाही; परंतु तात्यांनी गांज्यासारखे मादक व तलफ निर्माण करणारे कित्येक वर्षांचे व्यसन मनात इच्छा येताच सोडून दाखविले, आणि पुन्हा गांजाकसी मंडळी रोज घरी जमत असतानाही हे त्यात विशेष, 'विकारहेतौ सति विक्रयन्ते ! येषां न चेतांसि स एव धीर:' विकारवस्तू जवळ असूनही ज्याचे मन निर्विकार असू शकते तेच खरे धीर-वीर होत. तात्या अशा धीरबीरांपैकी एक होते. मला ते थट्टेने म्हणत, 'शाम तू आलास व माझे व्यसन सुटले हा. तुझा चांगला पायगुण.' तात्यांच्या इच्छाशक्तीचा तो विजय होता.
तात्या अत्यंत व्यवस्थित होते. त्यांच्या कपाटात सर्व वस्तू नीटनेटक्या ठेवलेल्या असत. लहान नातवंडास खाऊ देत. तो खाऊ प्रमाणात असावयाचा. पेपरमिटची वडी, पेढा, असला खाऊ देत नसत. मनुका, बेदाणा, खिसमिस, खारकांचे तुकडे हा त्यांचा खाऊ होता. मोजून खाऊ द्यावयाचे. त्यांच्याजवळ घडयाळ होते. ते बारा वर्षांत कधी बिघडले नव्हते. निजून उठताच ते किल्ली देत. त्यात कधी खंड पडलेला मी चार वर्षात पाहिला नाही. पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तीन-चार गाद्या स्वच्छ ठेवलेल्या असत. पांघरावयास घोंगडी. पाच-सहा घोंगडया तेथे नीट ठेवलेल्या असत. तात्यांना घोंगडी फार आवडत असे. गादीवर घोंगडी घालून मग तीवर ते निजावयाचे. ते हसत म्हणावयाचे की, 'मरताना मनुष्याला घोंगडीवर घेतात. मी नेहमीच घोंगडीवर असतो. देवाकडे तुझ्या गाद्यागिरद्यावरुन तुला जाता येणार नाही. देवाकडे नम्र होऊन जा, घोंगडीवर उतरुन जा.' असा या रुढीत महान अर्थ आहे, असे तात्या सांगत.
तात्या मोठे सहृदय होते. त्यांचे संस्कृतचे अध्ययन चांगले होते. नवनीत त्यांना पुष्कळ पाठ होते. किती तरी मजेदार गोष्टी व अनुभव ते सांगावयाचे. तात्यांचा स्वभाव प्रेमळ होता. त्यांनी स्वत:च्या मुलांना किंवा मुलांच्या मुलांना कधी मारले नाही. 'माझ्याच्याने मुलांना मारवत नाही. मारलेले बघवत नाही,' असे ते म्हणावयाचे.
तात्या जिवंत होते तोपर्यंत त्यांच्या घरी रॉकेल कधी आले नाही. रॉकेलचा वासही त्यांना खपत नसे. रॉकेलचा कंदील घेऊन कोणी रात्रीच्या वेळेस त्यांच्याकडे जर आले तर तो येणारा अंगणाच्या कडेला आहे तोच तात्यांच्या तीव्र नाकाला वास यावयाचा व ते लगेच म्हणावयाचे, 'जा श्याम ! त्यांना तेथेच कंदील ठेवून वर येण्यास सांग.' तात्यांच्याकडे ग्रामोद्योग होता. कडू तेल दिव्यात वापरण्यात येत असे. याच थंड दिव्याजवळ आम्ही अभ्यास करीत असू; वाचीत असू; माझ्या डोळयांना त्यापासून फार फायदा झाला. रात्रीच्या वेळेस बाहेर नेण्यासाठी वगैरे म्हणून खोबरेल तेलाचा एक वाटोळा काचेच सुंदर कंदील त्यांच्याकडे होता. तात्यांना दमा होता म्हणून ते फक्त घरात एक वेळ चहा घेत असत. बाकी कोणी घेत नसे. तात्या रोज एक-दोन भिलावे कुटून त्यात थोडी चिंच व थोडी साखर घालून त्याची गोळी करुन गिळीत असत. 'या औषधाने सर्व रोग बरे होतात' असे ते म्हणत. तात्यांना पोटदुखी होती. परंतु त्या उपायाने ती सर्व गेली. पोट नेहमी साफ रहावयास हा सोपा उपाय आहे असे ते म्हणावयाचे. एखादे वेळेस गावात आमांशाची वगैरे साथ आली म्हणजे आम्हालाही भिलाव्याची गोळी ते द्यावयाचे. मी तात्यांना विचारी 'तात्या ! भिलावा तोंडात उभरणार नाही का ?' तात्या म्हणत, 'त्यात चिंच आहे; त्यामुळे उभरणार नाही. शिवाय तोंडात चघळीत बसू नको. एकदम दातालाही न लावता गोटी गीळ; म्हणजे काही होणार नाही.
तात्यांना शोभणारीच माझी आत्या होती. माझी आत्याही अत्यंत निरलस होती. घरात कांडण करण्यापासून आत्याची तयारी असे. भाजीपाले पेरावयाचे. त्यांना पाणी घालावयाचे, ही कामे आत्याची असत. सर्व गावाच्या आधी आत्याकडे भेंडयाची भाजी तयार व्हावयाची व लोक विकत घ्यावयास यावयाचे. दिडकीस तीन भेंडया आत्या देत असते. गाईचे दूध आत्याच काढी. आत्याशिवाय गाय दूध देत नसे. रोज पहाटे गाईची पूजा आत्या करावयाची. आत्याची व्रतवैकल्ये फार. तुळशीच्या १०८ प्रदक्षिणा तिच्या कधी चुकल्या नाहीत. एकादशी, सोमवार, प्रदोष सारे उपवास असावयाचे. आत्याचे कधी कपाळ दुखल्याचे मला माहीत नाही. दुपारी काम आटोपल्यावर आत्या पोथी वगैरे वाचावयाची. तात्यांना विष्णुसहस्त्रनाम पाठ असे. आत्याचे काम स्वच्छ व निर्मळ असावयाचे. गंध उगाळून पूजेची तयारी करुन ठेवावयाची. एखादे वेळेस जर आम्ही गंध उगाळीत असलो तर आत्या येऊन म्हणे, 'श्याम ! ढोपराच्या आत हात घेऊन गंध उगाळ. असे केल्याने घसाघसा तुला उगाळता येणार नाही हे खरे. गंध उगाळावयास वेळ लागेल हेही खरे; परंतु गंध गुळगुळीत येईल. भराभर गंध उगाळले तर तितके मृदू गुळगुळीत येत नाही. देवाच्या कामाची वेठ नये मारु. जे काही करावयाचे ते मन:पूर्वक व भक्तिपूर्वक करावे.' माझ्या आत्याची केवढी ही थोर दृष्टी !