ज्या देवाच्या मूर्तीजवळ सारी जनता जाऊ शकत नाही, तो देव नसून तुझ्या प्रतिष्ठेची, तुझ्या घमेंडीची ती मूर्ती आहे. ती मूर्ती देवाची असती तर सारे तिथे निरपवाद नम्रपणे नमते, जमते. जेथे क्षणभर सर्वांना अहंकार विसरता येईल, सर्वांना क्षणभर एका ईश्वराचे आपण आहोत असे वाटेल असे एकही पवित्र ठिकाण संसारात नको का ? असे जे असेल ते खरे मंदिर होय. गीतेत नवव्या अध्यायात म्हटले आहे.

'अवजानन्ति मां मूढा, मानुषीं तनुमाश्रितम्'

भगवान् श्रीकृष्ण म्हणतात, 'मनुष्य भुते, प्रेते, पिशाचे, पितर यांनाही पूजितो. झाडे-माडे पूजितो; परंतु मनुष्याच्या शरीरात असलेला जो मी त्या माझा मात्र तिरस्कार करतो. माणसातला देव कोणी ओळखीत नाही. खरा मूर्तिपूजक नाठाळ दिसणा-या मुसलमानातीलही अप्रकट साधुता पाहील व त्याचीही सेवा करील. खरा मूर्तिपूजक हरिजनांची सेवा करील. सर्वत्र मी मांगल्य पहावयास शिकेन, दगड-धोंडयातही ते पाहीन व नाचेन, कुदेन, असे खरा मूर्तिपूजक मानील. माझी मूर्ती कोणी फोडू शकत नाही. एका मूर्तीची कोणी दोन छकले केली तर माझे दोन देव झाले. मूर्तीचे जितके कोणी तुकडे करील तितके माझे शाळिग्राम अधिक होतील. मूर्ती फोडणाराच शेवटी थकेल व त्यालाही कळेल की, मूर्तिपूजा म्हणजे एका अर्थी अनंताचीच पूजा, निराकाराचीच पूजा ! दोन्ही टोके शेवटी मिळावयाची. मूर्तिपूजेचा जो जो विचार करावा तो तो, गोड वाटतो.

परंतु आपण मूर्तिपूजा संकुचित केली आहे व काही ठिकाणी ओंगळ केली आहे. उच्च वर्णीयांनी ती प्रतिष्ठेची वस्तू केली आहे; तर म्हसोबापूजकांनी ती नवसाची केली आहे. मूर्तिपूजेची माधुरी, पवित्रता, भव्यता, दिव्यता अनुभवण्याचा प्रयत्न करणे, ही फार थोर वस्तू आहे.

परंतु शेवटी देवाची खरी प्रार्थना म्हणजेक नि:शब्द प्रार्थना. तेथे तू मी शब्द नाही. दे, घे शब्द नाही. तेथे काही एक नाही, मिळून जाणे, विसर पडणे ही सर्वांत थोर प्रार्थना. कोठे तरी मी वाचले आहे की, 'Sleep is the best prayer." "प्रशान्त निद्रा ही सर्वोत्तम प्रार्थना होय.' त्यातील अर्थ हाच आहे. निष्कामपणे विश्वाच्या शक्तीबरोबर विनम्रपणे उभे राहून तीतच विलीन होणे, हीच खरी प्रार्थना.

रवीन्द्रनाथांनी एके ठिकाणी साधनेत लिहिले आहे, 'मी फिरावयास गेलो व जर अकस्मात वादळ सुरु झाले, धुळीचे लोट उठू लागले, झाडे नाचू लागली, माझ्या अंगावर धूळ येऊ लागली, डोळयांत, कानांत शिरु लागली, कचरा येऊ लागला तर मी का त्या वादळावर रागावू ? त्या सृष्टि-चालकाच्या नावाने का खडे फोडावयास लागू ? एवढा मी फिरावयास चाललो, एवढा माझा हा मोठा अहं, स्वच्छ पोषाखाने फिरावयास निघालो तर का वा-याने धूळ उडवावी ? वा-याला का इतकी साधी अक्कल नसावी असे का मी म्हणू ? नाही, मी असे म्हणणार नाही. सृष्टी नाचावयास लागली आहे तर मलाही नाचू दे. झाडे डोलताहेत, मलाही डोलू दे. मलाही या धुळीच्या बुक्का-गुलालाने नटू दे. असे म्हणून त्या वादळाच्या, विश्व-नाचात मीही डोळे मिटून नाचू लागेन.'

'मन मस्त हुवा तब क्यों बोले'

ईश्वरामध्ये या विश्वाच्या नियंत्रक व चालक शक्तीत मिळून जाणे-आनंदाने, हर्षाने नि:शंकपणे मिळून जाणे-ही खरी महान प्रार्थना होय. तो दादू पिंजारी पिंजण्याचे तूई तूई चालले असताना म्हणावयाचा 'तूही तूही तूही देवा तू तू तू.' देव मात्र एक सत्य, मी कोणीच नाही.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel