'कोठे आहे तो रुमाल ?' मी विचारले.
'आहे खिशात. फराळ झाला म्हणजे देईन.' मामा म्हणाले.
माझे फराळाकडे लक्ष लागेना. तो रुमाल केव्हा पाहीन, असे मला झाले होते. अहंमदने दिलेला रुमाल ! माझी तहानभूक हरपली. डोळे त्या मामांच्या खिशात गेले तेथे रुमाल पाहू लागले.
मामांनी हात धुतले. त्यांनी खिशातून रुमाल काढला. सुंदर रेशमी रुमाल ! मामांनी तो माझ्या हातात दिला. तो मी माझ्या हातात घेतला. त्या रुमालाकडे मी पाहू लागलो. 'भाई श्याम !' असे त्यावर लिहिलेले होते.
मी तो रुमाल उडवीत राहिलो. आमच्या निर्मळ प्रेमाची ती निर्मळ पताका होती. आमच्या हृदयैक्याचा तो अमरध्वज होता. त्या मंगल रुमालाशी मी खेळत होतो, वा-यावर त्याला नाचवीत होतो.
बोटीच्या कठडयाशी मी उभा होतो. जोराचा वारा सुटला होता. पाण्यावर मोठमोठया लाटा उसळत होत्या. माझ्या त्या प्रेमध्वजावर लाटांचे शिंतोडे उडत होते. त्या लाटा त्या रुमालावर प्रेमाचे तुषार फेकीत होत्या. त्या लाटा उचंबळत होत्या. वर येत होत्या. त्यांना का माझा रुमाल पाहिजे होता ?
'श्याम वादळ होणार आहे. पडून राहा. बोट हालत आहे. खाली बस.' मामा म्हणाले. 'वारा मला आवडतो. लाटा बघा मामा केवढाल्या ! माझ्या रुमालावर पाणी उडत आहे.' मी म्हटले.
मी माझे निशाण फडकवीत राहिलो. जणू मी प्रेमनगरीचा राजा होतो, परंतु अरेरे ! राजावर हल्ला आला; घाला आला. वा-याने रुमालावर झडप घातली. गेला ! माझा रुमाल गेला ! वा-यावर गेला. वा-याने माझे निशाण नेले. प्रेम नेले. हृदय नेले. जीवनस्वातंत्र्य नेले ! मीही वा-याबरोबर गेलो असतो ! एकदम मी माझा हात वा-याकडे, माझा ठेवा पकडण्यासाठी पुढे केला ! माझा पाय मामांनी एकदम मागे ओढला.
'पडशील की गाढवा !' ते म्हणाले.
माझे नुकसान त्यांना काय माहीत ? माझे जे हरवले त्याची त्यांना काय किंमत ?
मी रडू लागलो. माझे रडे थांबेना. मामा माझी समजूत घालीत होते. शेजारचे लोक माझी समजूत घालीत होते. मामांनी आपला रुमाल मला देऊ केला. शेजारचे लोक स्वच्छ रुमाल मला देऊ लागले; परंतु तसल्या रुमालांच्या ढिगाने माझे समाधान झाले नसते.
त्या लाटांना माझ्या हातातील रत्न पाहिजे होते. त्यांनी जगातील सारे वारे माझ्या रुमालावर पाठविले, वा-यांनी त्या सागराचे ऐकले. श्यामची संपत्ती वारे घेऊन गेले. माझा तो लहानसा रुमाल अनंत सागराने हृदयाशी धरला.