शेजारच्या वर्गात हेडमास्तर शिकवीत होते. ते एकदम आमच्या वर्गात आले. आम्ही चकित झालो. ते संतापलेले दिसत होते. एक प्रकारचा तिरस्कार त्यांच्या मुद्रेवर दिसत होता. त्यांच्या भुवया आकुंचित झालेल्या होत्या. हेडमास्तरांची इतकी अप्रसन्न मुद्रा मी तत्पूर्वी कधीही पाहिलेली नव्हती. ते आता काय म्हणतात, काय करतात, इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. वर्गात एक प्रकारची उत्कट व गंभीर शांतता पसरली होती.

हेडमास्तरांनी जरा तीव्र स्वरात विचारले, 'हा सारा अन्याय आहे.' असे शब्द आता येथे कोणी उच्चारले ? ज्याने उच्चारले असतील त्याने उभे रहावे.'

मी उभा राहिलो.

"तुम्ही उच्चारलेत ते शब्द ?'

"होय,'

"का उच्चारलेत ?'

"मी गणित करीत होतो. मला येत होते. मी म्हटले, 'उत्तर इतक्यात सांगू नका; एक-दोन मिनिटे आणखी थांबा.' परंतु गुरुजी म्हणाले, 'काही नाही. मी उत्तर सांगतो.' म्हणून मला राग आला व तो शब्द मी उच्चारले.'

"शिक्षकाला किती वेळ द्यावा, हे नाही का समजत ?'

"समजते; परंतु मी एक-दोन मिनिटेच थांबा म्हणत होतो.'

"तुम्ही दोन मिनिटे मागितलीत. दुस-याने आणखी मागितली असती. कोठे तरी शिक्षकाला मर्यादा घातलीच पाहिजे. नाहीतर अनवस्था प्रसंग यावयाचा, असे नाही तुम्हाला वाटत !'

"येईल.'

"या शिक्षकांना तुमचा वर्ग फार त्रास देतो, असे मी ऐकले आहे. तुमचा वर्ग फार उन्मत्त झाला आहे. या शिक्षकांना जे कोणी नेहमी त्रास देत असतील, उगीचच उगीच भंडावून सोडीत असतील त्या सर्वांनी उभे रहावे.'

मी उभाच होतो. मी माझा हात वर केला. वर्गात दुसरे कोणीच उभे राहिले नाही.

"काय एकटा श्यामच खोडसाळपणा करतो ? बाकी सारे साळसूद आहेत !' कोणी हात वर करीना व उभा राहीना.

हेडमास्तर मला म्हणाले, 'श्याम ! तुझ्या प्रामाणिकपणाचे मी कौतुक करतो; परंतु याच्यापुढे खोडसाळपणा करण्यात पुरुषार्थ नको मानीत जाऊ. तू चांगला मुलगा आहेस. तू आणखी चांगला हो. परंतु मघा उच्चारलेल्या शब्दांबद्दल तुला शिक्षा केलीच पाहिजे. तू वर्गातून निघून जा. पुन्हा माझ्या अनुज्ञेशिवाय वर्गात येऊ नकोस.'

मी वर्गाबाहेर निघून गेलो; परंतु त्यांतल्या त्यात मला थोडेसे समाधान वाटत होते. हेडमास्तरांच्या शब्दांनी मला
माझ्याबद्दल थोडा आदर वाटला. मी हेडमास्तरांकडे गेलो की, लगेच वर्गात जावयाची परवानगी देतील असे मला वाटले. चित्रकलेल्या दिवाणखान्यात बसून मी वाचीत राहिलो. तास संपताच हेडमास्तरांस विचारावयाचे असे मी मनाशी ठरविले.
तास संपल्याचे ठोके पडले. मुलांचे आवाज ऐकू येऊ लागले. शिक्षकांची जा-ये सुरु झाली. हेडमास्तर चित्रकलेल्या दिवाणखान्यातून स्वत:च्या खोलीकडे जात होते. त्यांनी मला पाहिले नाही. मी उठलो व त्यांच्या पाठोपाठ हळूहळू जाऊ लागलो. माझी त्यांना चाहूल लागली. त्यांनी मागे वळून पाहिले.

"काय पाहिजे ?' स्वत:चे सहजस्मित दाबीत त्यांनी विचारले. 'वर्गात जावयास आपली अनुज्ञा.' मी विनयाने व उत्सुकतेने त्यांच्या तोंडाकडे पहात सांगितले.

"जा, माझी अनुज्ञा आहे' ते म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel