१७. कोकणात घरी
घर म्हटले म्हणजे हजारो पवित्र भावना संमिश्रित अशा मनुष्याच्या हृदयात उभ्या राहतात. मोठमोठया स्वर्गतुल्य राजवाडयांतून रहा. तरी तेथेही तुम्हाला तुमच्या गरीब घराची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. त्या तुमच्या लहानशा घरात रेडिओ नसतील; सुंदर सुंदर किमती चित्रे नसतील; जिभेचे चोचले पुरविणारे खाद्यपेय पदार्थ नसतील; मौल्यवान ग्रंथ नसतील; हे तिथे काही नसले तरी या सर्वांपेक्षा थोर असे तेथे काही तरी असते. रेडिओत गोड गाणी ऐकावयास मिळत असतील; परंतु आईने मारलेली 'बाळ' अशी हाक व मुलाने मारलेली 'आई' अशी हाक यांच्याहून कोणते गोड गाणे त्या रेडिओत असेल ? मुलाला अंगणात जेवविताना 'तो बघ काऊ ? काऊ काऊ ! माझा बाळ जेवतो हो. घे, हा घे काऊचा घास. हा दुसरा चिऊचा. बाळाचे जेवणे होवो, बाळ जेवून आजोळी जाओ' अशा रीतीने किती गोड गोड शब्दांनी आई मुलाला भरवीत असते ! असले मधुर भोजन कोणत्या मेजवानीत मिळेल ? पाळण्यात किंवा पायावर निजविताना ज्या ओव्या, जी अंगाई गीते आई म्हणते त्यांतील वात्सल्य व माधुर्य, त्यांतील कोमलता व उत्कटता घराशिवाय अन्यत्र कोठे आढळणार ? कोठे मिळणार ? कोंडयाचा मांडा करुन गरीब आई जे गोडधोड मुलाला देते त्याची सर कोणत्या उंची पक्वान्नास येणार आहे ? आईने प्रेमाने वाढलेली शिळी भाकर शिरापुरीपेक्षा मुलाला गोड लागते. आईने पाठीवर प्रेमळपणाने हात फिरवून केलेला उपदेश सा-या ग्रंथालयातील ज्ञानापेक्षा पवित्र असतो. 'सबसे ऊंची प्रेम सगाई'- प्रेमाचे नाते ऐश्वर्यालाही लाजवील. हे प्रेम जेथे नाही ते माडया-महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत.
शेवटी गोडी वस्तूत नसून गोड आत्म्यात आहे. त्रिसुपर्णाच्या मंत्रात म्हटल्याप्रमाणे तुपाची धार आपल्या हृदयात आहे. आईला भातावर अन्नशुध्दी गरिबीमुळे नसेल करता येत; परंतु हृदयातील मायेची अपार तुपाची धार ती ओतीतच असते. त्यामुळे तो भात गोड लागतो. उपनिषदांनी आत्म्याला 'रसानां रसतम:' असे म्हटले आहे. आपल्याला सर्व संसार मधुर करुन घ्यावयाचा असेल तर सर्वत्र प्रेम करावे. आपल्या आत्म्याचे माधुर्य सर्वत्र ओतीत जावे.
मी माझ्या घरी जाणार होतो. प्रेममूर्ती आईकडे जात होतो; परंतु माझ्या मनाला आनंद नव्हता. मामा मला घरी परत पोहोचवीत होते. मी नालायक ठरलो. आपला मुलगा विधुळा निघाला, हे पाहून कोणत्या मातेला समाधान होईल ? मला पाहून माझ्या आईला आनंद का झाला असता ! पुण्याच्या माझ्या विचित्र लीला मी जाण्याआधी माझ्या घरी गेल्या होत्या. ज्याप्रमाणे सत्कीर्ती पंखाशिवाय उडत जाते, त्याप्रमाणे अपकीर्तीही वा-याबरोबर सर्वत्र पसरते. सुगंध पटकन पसरतो, घाणही लवकर पसरते. मामांची पत्रे आधी घरी गेलीच होती. मी काय दिवे लाविले होते, याची साद्यंत सत्यकथा सर्वांना कळली होती. मग मला पाहून कोणाला सुख झाले असते ? सारी माणसे माझ्याकडे तिरस्काराने पाहतील. माझा उपहास करतील. मला हिडीसफिडीस करतील-सारे चित्र माझ्या डोळयांसमोर उभे राहिले होते. नको घरी जाणे. नको मामांकडे राहणे. असे मनात येई. बोटीतून पडावात उतरताना मी समुद्रात पडलो तर सुटेन, असाही विचार क्षणभर डोक्यात चमकून गेला. परंतु मृत्यू, प्रत्यक्ष घेऊन जावयास आला असता तर मी त्याच्यापासून पळून गेलो असतो. मृत्यू दूर आहे तोपर्यंतच तो एखादे वेळेस प्रिय व रमणीय वाटतो.
एका फ्रेंच लेखकाने एका ठिकाणी म्हटले आहे, 'आपण आत्महत्या करावी, असे एकदाही ज्याच्या मनात कधी आले नाही तो मनुष्य जगण्यास योग्य नाही.' माझ्या मनात तो विचार आला त्यावरुन मी जगण्यास लायक ठरत होतो. मामा व मी बोटीत होतो. मी काही बोललो नाही. माझ्याने बोलवत नव्हते, खाववत नव्हते, निजवत नव्हते. मी केवळ हताश व शरमिंधा झालो होतो.
आम्ही पालगडला घरी पोचलो, शिव्याशापांनीच माझे स्वागत झाले. मी काही केले तरी कोणाच्या मर्जीस येईना. 'कोणी म्हणे गोवारी हो. कोणी म्हणे हो नांग-या.' गाईचा गोवारी होणे, शेती करुन धान्य पिकवणे म्हणजे का नीच कर्म आहे ? गोसेवेचे काम करण्यात गोपाळकृष्णाने धन्यता मानली. शिशुपाल वगैरे 'गवळयाचा पोर, गवळयाचा पोर' म्हणून उपहास करीत असताना कृष्ण म्हणाला, 'तुम्ही दिलेले दूषण ते माझे भूषण होय. मी गोपालकृष्ण म्हणून ओळखला जाईन.' आज मुलांची नावे गोपाळ म्हणून ठेवण्यात येतात; परंतु गोपाळाचे काम मात्र तुच्छ मानण्यात येते. मग काय परकीय सरकारची अहोरात्र हमाली करणे, यात प्रौढी आहे ? जर गुराख्याचे काम तुच्छ असेल तर गोपालकृष्णाचे नाव उच्चारावयाचे व त्याने केलेल्या गोपालनास मनात हीन समजायचे. हा दंभ तर अतीव त्याज्य व तिरस्करणीय आहे.