"दादा ! थांब रे ! मला आधी निजू दे, मग तू दिवा मालव' असे मी म्हणावयाचा, प्रथम प्रथम मला झोप लागली आहे, असे पाहून मग दादा दिवा मालवी; परंतु पुढे पुढे मलाही अंधाराची सवय झाली. अंधारात झोप येऊ लागली. गुलामगिरीची एकदा सवय झाली म्हणजे त्यातच आनंद वाटतो. शेणातल्या किडयांना शेणातच रहावयास आवडते. घुबडास अंधारच प्रिय असतो. मलाही तसेच होऊ लागले.

मामांकडे माझे मुख्य काम म्हणजे मामींच्या मुलीस खेळविणे हे होते. दुपारच्या वेळी तिला झोपाळयावर घेऊन मी बसे व गाणी म्हणे. एशी माझ्याजवळ रहावयाची. तिला झोपाळयाची चटक लागली. तिला खाली ठेवले म्हणजे ती रडावयाची. शेवटी मी कंटाळावयाचा. मग मी एशीला चिमटे काढावयाचा. 'झोपाळयावर सुध्दा एशी रहात नाही.' असे मामीला सांगता यावे म्हणून मी एकीकडे झोपाळयावर झोपा घ्यावयाचा व एकीकडे एशीला चिमटे काढावयाचा. शेवटी एशी भोकाड पसरी. तिने भोकाड पसरले की, मला विजय मिळाला असे वाटे. मामी शेवटी हाक मारुन म्हणे. 'आण तिला इकडे आण.' ते आश्वासनपर शब्द कानावर पडले म्हणजे मुक्त झालो, असे मला वाटे.

एखाद्या वेळेस जनार्दनबरोबर मी मंडईत भाजी आणण्यासाठी जावयाचा. जनार्दनबरोबर एक अद्भूत कला मी शिकलो. मंडईत पेरुवाल्या बायांच्या टोपल्या भरलेल्या असावयाच्या. पटकन सफाईने एखादा पेरु लांबविण्याची विद्या जनार्दनने मला शिकविली; परंतु एके दिवशी चांगली फजिती झाली. माझ्याबरोबर त्या दिवशी जनार्दन नव्हता. मी एकटाच होतो. एका टोपलीतील पेरु मी लांबविला. परंतु शेजारच्या बाईने पाहिले. तिने माझी बकोटी धरली. मंडईतील बायका किती प्रखर असतात, ते पुणेकरांना विचारावे. 'चल, तुला पोलिसाच्या ताब्यात देत्ये. बामणाचा पोर दिसतोस आणि चोरी का करतोस ?' वाटेल तितके ती बाई बोलली. पुष्कळ लोक भोवती जमले. 'जाऊ दे, पोराची जात आहे.' असे कोणी म्हणू लागले. शेवटी देवाने माझी अब्रू सांभाळली. त्या बाईचे वात्सल्य जागे झाले. 'लहान आहेस म्हणून सोडत्ये तुला. मिशा असत्या तर फरासखान्यातच पोचविले असते.' असे म्हणून तिने मला मोक्ष दिला. मी लाजेने अर्धमेला झालो होतो. वडिलांनी खरे परीक्षकांकडे मला का पाठविले नाही, ते मला कळले. माझ्या जीवनातील मला न दिसणारे किडे त्यांच्या दृष्टीला कदाचित आधीच दिसले असतील !

अशा प्रकारे पुण्याचे अनुभव मी घेत होतो. पुण्यातील पुण्यवंत व विद्यावंत विद्यार्थी होण्यासाठी आलो; परंतु पुण्याचा भामटा होईपर्यंत माझी मजल आली ! मी अभ्यास करीत नसे म्हणून दादा रागवत असे. तो रोज शब्द विचारी, वाक्ये घाली. एखाद्या वेळेस मामा वाचून घेत. मामांची शिकवण्याची पध्दत लहानपणी मी मुंबईस अनुभवलीच होती. पुण्यास त्या क्रोधी पध्दतीचा मला पुरा अनुभव यावयाचा होता. या श्यामचे पुण्यात धिंडवडे निघावयाचे होते !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel