श्रमणांचे प्रचारकार्य

या आणि इतर श्रमणांचे वजन लोकांवर फार होते, हे वर सांगितलेच आहे. हे श्रमण पूर्वेला चंपा (भागलपूर), पश्चिमेला कुरुंचा देश, उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला विंध्य, यांच्या मधल्या प्रदेशात पावसाळ्याचे चार महिने खेरीज करून बाकी आठ महिने सारखे फिरत आणि आपापल्या मताचा लोकांना उपदेश करीत. त्यामुळे लोकात यज्ञयागविषयी अनादर आणि तपश्चर्येबद्दल आदर उत्पन्न झाला.

यज्ञयागाची व्याप्ती

परंतु राजे लोकांना युद्धात जय मिळावा म्हणून यज्ञयाग करणे आवश्यक वाटत होते. यज्ञयाग चालू ठेवण्यासाठी कोसलांच्या पसेनदि राजाने उक्कट्ठा नावाचा गाव पोक्खरसाति (पौष्करसादि) आणि सालवतिका गाव लोहिच्च (लोहित्य) ब्राह्मणाला, त्याचप्रमाणे मगध देशात बिंबिसार राजाने चंपा सोणदण्ड ब्राह्मणाला व खाणुमत गाव कूटदन्त ब्राह्मणाला इनाम दिल्याचा दाखला दीघनकायात सापडतो. याशिवाय खुद्द पसेनदि राजा यज्ञयाग करीत होत असे कोसलसंयुत्तातील नवव्या सुत्तावरून दिसून येते. पण या यज्ञयागाची व्याप्ति कोसलाचा पसेनदि आणि मगधाचा बिंबिसार यांच्या राज्यापुरतीच होती. कारण मोठमोठाले यज्ञयाग करणे राजांना आणि इनामदार ब्राह्मणांनाच काय ते शक्य होते.

असले अवाढव्य यज्ञयाग करणे सामान्य जनतेच्या शक्तीपलीकडचे असल्यामुळे यज्ञयागाच्या लघु आवृत्त्या निघाल्या होत्या. अमुक तर्‍हेच्या लाकडाच्या अमुक तर्‍हेच्या दर्वीने, तुसाचा, कोंड्याचा, अमुक तर्‍हेच्या तांदळाचा, अमुक प्रकारच्या तुपाचा, अमुक प्रकारच्या तेलाचा, अमुक प्राण्यांच्या रक्ताचा होम केला असता अमुकतमुक कार्यसिद्धी होते, असे सांगून ब्राह्मणलोक सामान्य जनतेला हे होम करावयास लावीत व काही श्रमण देखील यात भाग घेत असत, असे दीघनिकायातील मजकुरावरून दिसून येते.* कार्यसिद्धीसाठी हे लोक होम करीत असले तरी त्याची गणना धार्मिक विधीत करीत नसत असे वाटते. कारण ते होम करणार्‍या ब्राह्मणांना आणि श्रमणांना लोक फारसे मानीत नसत
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*दीघनिकाय- ब्रह्मजाल, सामाञ्ञफल वगैरे सुत्ते पाहा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
देवतांची पूजा

आजकाल हिंदु लोक जसे देवदेवता, यक्ष, पिशाच इत्यादिकांना मानतात व त्यांची समजूत करण्यासाठी बलिदान देतात, तसेच बुद्धसमकालचे हिंदु लोक देवतांना मानीत व बलिकर्मे करीत. विशेष एवढाच होता की, सध्याच्या बर्‍याच दैवतांना पुजारी लागतात आणि ते बहुधा ब्राह्मण असतात. याशिवाय सध्याची दैवते जरी बुद्धसमकालच्या दैवताप्रमाणेच काल्पनिक असली तरी त्यापैकी बहुतेकांची पुराणे होऊन बसली आहेत. हा प्रकार बुद्धसमकाली नव्हता, वडासारख्या झाडावर एखाद्या डोंगरावर किंवा वनात महानुभाव देवता राहतात आणि त्यांना नवस केले असता त्या पावतात. अशी लोकांची समजूत होती. आणि बकरे, कोंबडी वगैरे प्राण्यांचा बळी देऊन ते आपला नवस फेडीत असत. पलास जातकाच्या (नं. ३०७) कथेवरून असे दिसते की, देवतांची पूजा ब्राह्मण देखील करीत असत. पण त्यांनी त्या देवतांचा पुजारीपणा स्वत:ची वृत्ति म्हणून बळकावल्याचा पुरावा कोठेच सापडत नाही. असे आज दगडोबा म्हसोबाला किंवा जाखाई जोखाईला पुजारी ब्राह्मण नाहीत. तसे त्या वेळी सर्वच देवतांना नव्हते. लोक नवस करीत आणि मध्यस्थी शिवाय आपल्या हातानेच बलिदान देत. सुजातेने वटवृक्षवासी देवतेला दुधाच्या खिरीचा नवस केला आणि शेवटी त्या झाडाखाली बसलेल्या गोतम बोधिसत्त्वालाच तिने ती खीर दिली ही कथा बौद्धवाङमयात प्रसिद्ध आहे आणि बौद्ध चित्रकलेवर तिचा उत्तम परिणाम झाल्याचे दिसून येते. तात्पर्य, या देवदेतांच्या पूजेत पुजारी ब्राह्मणांची आवश्यकता नव्हती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel