सुजातेने दिलेली भिक्षा

बोधिसत्त्वाला संबोधिज्ञान वैशाख पूर्णिमेच्या रात्री झाले. त्या दिवशी दुपारी सुजाता नावाच्या कुलीन तरुण स्त्रीने त्या उत्तम अन्नाची भिक्षा दिली. याचा उल्लेख सुत्तपटिकात अवचित सापडतो* आणि या प्रसंगाशिवाय सुजातेचे नाव आलेले कोठे आढळत नाही. तथापि बौद्ध चित्रकलेत सुजातेला उत्तम स्थान मिळाले आहे, आणि बुद्धाच्या दृष्टीने देखील हा प्रसंग चिरस्मरणीय झाला. चुंद लोहराने दिलेली भिक्षा ग्रहण करून भगवान आजारी पडला त्यात आपले परिनिर्वाण होणार आहे असे त्याने ताडले आणि आपल्या पश्चात चुंदाला लोकांनी दोष देऊ नये म्हणून भगवान नंदाला म्हणाला, “ज्या दिवशी मला संबोधिज्ञान प्राप्त झाले, या दिवशी मिळालेली व आज मिळालेली अशा दोन्ही भिक्षा समसमान आहेत, असे तुम्ही चुंदाला सांगा व त्याचे सांत्वन करा.”

बोधिवृक्षाखाली आसन

सुजातेने दिलेली भिक्षा घेऊन बोधिसत्त्वाने नैरजरा नदीच्या तीरी भोजन केले. आणि त्या रात्री तो एका पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसला. हे झाड सध्या अस्तित्वात नाही. शशांक राजाने त्याचा विध्वंस केला असे म्हणतात. पण त्याच्याच जागी लावलेला पिंपळ आणि त्यालाच टेकून बुद्धगयेचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्या झाडाखाली बोधिसत्त्व बसला तेव्हा पुन्हा एकवार ललितविस्तरात मारयुद्धाचा प्रसंग वर्णिला आहे. संयुत्तनिकायातील सगाथावग्गात माराने बुद्धाला भुलविण्यासाठी बोधिवृक्षाखाली (त्या पिंपळाखाली) तृष्णा, अरति, आणि रगा या आपल्या तीन मुलींना पाठविले असे वर्णन आढळते. जातकाच्या निदानकथेत तर या प्रसंगी मारसेनेने बुद्धावर चारी बाजूंनी कसा हल्ला चढविला.

याचे सविस्तर वर्णन आहे. माराचे सैन्य पाहून ब्रह्मादिक देव पळून जातात. बोधिसत्त्व तेवढा एकटा राहतो. मग मार ते स्थान आपले आहे, असे म्हणून बुद्धाला तेथून उठण्यास सांगतो आणि त्या स्थानावर आपला हक्क शाबीत करण्यासाठी मारसेनेची साक्ष देतो. सर्व देव पळून गेल्यामुळे त्या प्रसंगी बुद्धाला कोणीच साक्षी सापडत नाही. तेव्हा बुद्ध उजवा हात खाली करून ही सर्वसहा वसुंधरा साक्ष आहे, असे म्हणतो, आणि पृथ्वी देवता, विराटस्वरूप धारण करून मारसेनेचा पराभव करिते, इत्यादि पुराणमय वर्णन जातकअट्ठकथाकाराने केले आहे.

बौद्ध चित्रकलेत हा प्रसंग चित्रकाराने छान रेखाटला आहे. लोभ, द्वेष, मोह, मद, मत्सर इत्यादि दुष्ट मनोवृत्तीला मूर्तिमंत स्वरूपे देण्याचा त्याचा प्रयत्न वाखाणण्याला योग्य वाटतो. प्रथमत: कवीने या प्रसंगाचे वर्णन केले आणि तदनुसार चित्रकारांनी त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला किंवा चित्रकारांनी हा प्रसंग रेखाटल्यावर त्याच्या मागोमाग जाऊन कवींनी त्याचे वर्णन केले हे सांगता येणे शक्य नाही. ते काही असो, पण एवढी गोष्ट खरी की, वर दिलेल्या मारसेनेला मूर्त स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे.

तत्त्वबोध

त्या वैशाखी पूर्णिमेच्या रात्री बोधिसत्त्वाला तत्त्वबोध झाला, आणि तेव्हापासून त्याला बुद्ध म्हणतात. म्हणजे तोपर्यंत गोतम बोधिसत्त्व होता तो त्या दिवसापासून गोतम बुद्ध झाला. बुद्धाला झालेला तत्त्वबोध म्हटला म्हणजे चार आर्यसत्ये व तदन्तर्गत अष्टांगिक मार्ग होय. त्याचा उपदेश त्याने प्रथमत: आपल्या बरोबर राहणार्‍या पाच साथ्यांना केला. (तो प्रसंग पुढे येणार असल्यामुळे येथे त्याचे विवरण करीत नाही.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


भगवान बुद्ध