बेकारी नष्ट करणे हाच खरा यज्ञ

वरील सुत्तात महाविजित याचा अर्थ ज्यांचे राज्य विस्तृत आहे असा. तोच महयज्ञ करू शकेल. त्या महायज्ञाचे मुख्य विधान म्हटले म्हणजे राज्यात बेकार लोक राहू द्यावयाचे नाहीत. सर्वांना सत्कार्याला लावावयाचे. हेच विधान निराळ्या तऱहेने चक्कवतिसीहनाद सुत्तात सांगितले आहे. त्याचा सारांश असा—

दृढनेमि नावाचा चक्रवर्ती राजा होऊन गेला. वृद्धाकाळी आपल्या मुलाला अभिषेक करून तो योगाभ्यासाठी उपवनात जाऊन राहिला. सातव्या दिवशी राजाच्या प्रासादासमोर असलेले देदीप्यमान चक्र अंतर्धान पावले. तेव्हा दृढनेमीचा पुत्र फार घाबरला आणि राजर्षि पित्याजवळ जाऊन त्याने त्याला हे वर्तमान विदित केले. राजर्षि म्हणाला, “मुला, तू घाबरू नकोस. हे चक्र तुझ्या पुण्याईने उत्पन्न झाले नव्हते. तू जर चक्रवर्ति राजाचे व्रत पालन करशील तर ते पुन्हा जागच्या जागी येऊन स्थिर राहील. तू लोकांचे न्यायाने आणि समतेने रक्षण कर. तुझ्या राज्यात अन्यायाची प्रवृत्ति होऊ देऊ नकोस. जे दरिद्री असतील त्यांना (उद्योगाला लावून) धन मिळेल अशी व्यवस्था कर आणि जे तुझ्या राज्यात सत्पुरुष श्रमणब्राह्मण असतील त्यांजपासून वेळोवेळी कर्तव्याकर्तव्याचा बोध करून घे. त्यांचा उपदेश ऐकून अकर्तव्यपासून दूर हो व कर्तव्यात दक्ष राहा.”

तरुण राजाने हा उपदेश मान्य केला आणि त्याप्रमाणे वागल्याने ते देदीप्यमान चक्र पुन्हा स्वस्थानी आले. राजाने डाव्या हातात पाण्याची झारी घेतली. आणि उजव्या हाताने ते चक्र प्रवर्तित केले. ते त्याच्या साम्राज्यात चोहीकडे फिरले. त्याच्या मागोमाग जाऊन राजाने सर्व लोकांना उपदेश केला की, ‘प्राणघात करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटे बोलू नये. यथार्थतया निर्वाह करावा.”

त्यानंतर ते चक्ररत्न परत फिरून चक्रवर्ति राजाच्या सभास्थानासमोर खडे राहिले. राजवाड्याला त्याने शोभा आणली.

हा चक्रवर्तिव्रताचा प्रकार सात पिढ्यांपर्यंत चालला. सातव्या चक्रवर्तिने संन्यास घेतल्यावर सातव्या दिवशी ते चक्र अन्तर्धान पावले, आणि त्यामुळे तरुण राजाला फार दु:ख झाले. पण राजर्षि पित्याजवळ जाऊन त्याने चक्रवर्तिव्रत समजावून घेतले नाही. त्याच्या अमात्यांनी आणि इतर सदगृहस्थांनी त्याला ते चक्रवर्तिव्रत समजावून दिले. ते ऐकून घेऊन राजाने लोकांचे न्याय्य रक्षण आरंभिले. पण दरिद्री लोकांना उद्योग मिळेल अशी व्यवस्था केली नाही. त्यामुळे दारिद्र्य भयंकर वाढले. आणि का मनुष्याने चोरी केली. त्याला लोकांना राज्याच्या स्वाधीन केल्यावर राजा म्हणाला, “रे माणसा, तू चोरी केलीस हे खरे काय?”

तो—खरे महाराज.
राजा—का चोरी केलीस?
तो—महाराज, निर्वाह होत नाही ना!

त्याला यथायोग्य द्रव्य देऊन राजा म्हणाला, “ह्या द्रव्याने तू स्वत: निर्वाह कर, तुझ्या कुटुंबाला पोस, व्यापारउद्योग आणि दानधर्म कर.” ही गोष्ट दुसर्‍या एका बेकाराला समजली. तेव्हा त्यानेही चोरी केली. राजाने त्यालाही यथायोग्य द्रव्य दिले. लोकांना समजून चुकले की जो चोरी करतो, त्याला राजा बक्षीस देतो. तेव्हा जो तो चोर्‍या करू लागला. त्यापैकी एकाला पकडून राजाकडे नेले. राजाने विचार केला, ‘जर चोर्‍या करणार्‍यांना मी द्रव्य देत गेलो तर सर्व राज्यात बेसुमार चोर्‍या होतील! म्हणून या माणसाचा शिरच्छेद करावयास लावणे चांगले.’ त्याप्रमाणे त्या माणसाला त्याने दोर्‍यांनी बांधावयास लावले, त्याचे मुंडन करवले आणि रस्यातून धिंड काढावयास लावून नगराच्या दक्षिणेला त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel