संघच सर्वांचा पुढारी

बुद्ध भगवंताने आपल्या मागे संघाचा पुढारी नेमला नाही. सर्व संघाने मिळून संघकार्ये केली पाहिजेत असा नियम घालून दिला. एकसत्ताक राज्यद्धतीत रुळलेल्या लोकांना ही बुद्धाची पद्धति चमत्कारिक वाटली, तर त्यात नवल नाही.

भगवान परिनिर्वाण पावून फार काळ झाला नव्हता. त्या काळी आनंद राजगृहात राहत असे. प्रद्योताच्या भयाने अजातशत्रू राजाने राजगृहाची डागडुजी चालविली, आणि त्या कामावर गोपक मोग्गल्लान ब्राह्मणाची नेमणूक केली. आयुष्मान आनंद राजगृहात भिक्षेसाठी जाण्यास निघाला. पण भिक्षाटनाला अद्यापि समय आहे असे वाटून तो गोपक मोग्गल्लान ब्राह्मणाच्या कामावर गेला. ब्राह्मणाने त्याला आसन दिले आणि स्वत: कमी दर्जाच्या आसनावर बसून प्रश्न विचारला, “भगवंतारखा गुणी भिक्षु आहे काय?” आनंदाने “नाही” असे उत्तर दिले.

ही गोष्ट चालली असता मगध देशाचा प्रमुख मंत्री वस्सकार ब्राह्मण तेथे आला; आणि त्याने चाललेली गोष्ट ऐकून घेऊन आनंदाला प्रश्न केला, “त्या भगवंताने अशा एखाद्या भिक्षूची निवड केली आहे काय, की भगवंताच्या अभावी संघ या भिक्षूला शरण जाईल?” आनंदाने “नाही” असे उत्तर दिले. वस्सकार म्हणाला, “तेव्हा तुमच्या या भिक्षुसंघाला कोणताही नेता नाही. असे असता या संघात सामग्री कशी राहते?” आनंद म्हणाला, “आम्हाला नेता नाही असे समजू नये. भगवंताने विनयाचे नियम घालून दिले आहेत. जेवढे भिक्षु का गावात राहतात, तेवढे एकत्र जमून त्या नियमाची आम्ही उजळणी करतो; ज्याच्याकडून दोष झाला असेल तो आपला दोष प्रकट करतो आणि त्याबद्दल प्रायश्चित्त घेतो... एखदा भिक्षु शीलादिक गुणांनी संपन्न असला तर त्याचा आम्ही मान ठेवतो आणि त्याची सल्ला घेतो.”*

वस्सकार ब्राह्मण अजातशत्रू राजा दिवाण होता. कोणी तरी सर्वाधिकारी व्यक्ती असल्याशिवाय राज्यवयवस्था सुरळीत चालणे शक्य नाही, असे त्याचे ठाम मत असले पाहिजे. बुद्धाने आपल्या गादीवर कोणाला बसविले नाही तरी निदान संघाने एखाद्या भिक्षूला निवडून त्या गादीवर त्याची स्थापना केली पाहिजे, असे वस्सकार ब्राह्मणाचे म्हणणे. पण अशा सर्वाधिकार्‍यावाचून बुद्धाच्या पश्चात देखील संघाचे काम सुरळीत चालले; यावरून बुद्धाने केलेली संघाची रचना योग्य होती असे म्हणावे लागते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


भगवान बुद्ध