निर्भयता

कुशल वितर्कांच्या साहाय्याने अकुशल वितर्कांवर जय मिळविला, तरी जोपर्यंत धार्मिक माणसाच्या मनात निर्भयता उत्पन्न झाली नाही, तोपर्यंत त्याला तत्त्वबोध होणे अशक्य आहे. दरोडेखोर किंवा सैनिक आपल्या विरोधकांवर धाडसाने तुटून पडतात. पण त्यांच्यात निर्भयता थोडीच असते. ते शस्त्रास्त्रांनी कितीही सज्ज असले तरी भयभयीत असतात, न जाणो, आपले शत्रू आपणावर कधी घाला घालतील याचा नेम नाही, असे त्यास वाटते. अर्थात त्यांची निर्भयता खरी नव्हे. अध्यात्ममार्गाने जी निर्भयता मिळते तीच खरी होय. ती बोधिसत्त्वाने कशी मिळविली हे खालील उतार्‍यांवरून समजून येईल.

बुद्ध भगवान जानुश्रोणी ब्राह्मणाला म्हणतो, “हे ब्राह्मणा, जेव्हा मला संबोध प्राप्त झाला नव्हता, मी केवळ बोधिसत्त्व होतो. तेव्हा मला असे वाटले की, जे कोणी श्रमण किंवा ब्राह्मण परिशुद्ध कायकर्मे न आचरिता अरण्यामध्ये राहतात ते या दोषामुळे भयभैरवाला आमंत्रण देतात. पण माझी कर्मे परिशुद्ध आहेत. परिशुद्ध कायकर्मे असलेले जे सज्जन (आर्य) अरण्यात राहतात त्यापैकी मी एक आहे असे जेव्हा मला दिसून आले, तेव्हा अरण्यवासात मला अत्यंत निर्भयता वाटली. दुसरे कित्येक श्रमण किंवा ब्राह्मण अपरिशुद्ध वाचसिक कर्मे आचरीत असताना अपरिशुद्ध मानसिक कर्मे आचरीत असताना, अपरिशुद्ध आजीव (उपजिवीका) करीत असताना अरण्यामध्ये राहतात आणि या दोघांमुळे ते भयभैरवाला आमंत्रण देतात, परंतु माझी वाचसिक आणि मनसिक कर्म व उपजिवीका परिशुद्ध आहेत. ज्या सज्जनंची ही सर्व परिशुद्ध आहेत त्यापैकी मी एक आहे, असे दिसून आल्यावर अरण्यावासात मला अत्यंत निर्भयता वाटली.

“हे ब्राह्मण जे श्रमण किंवा ब्राह्मण लोभी, प्रदुष्टचित्त, आळशी, भ्रान्तचित्त किंवा संशयग्रस्त होऊन अरण्यात राहतात ते ह्या दोषामुळे भयभैरवाला आमंत्रण देतात. पण माझे चित्त कामविकारापासून अलिप्त आहे. द्वेषापासून मुक्त आहे. (म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयी माझ्य मनात मैत्री बसते.) माझे मन उत्साहपूर्ण स्थिर व नि:शंक आहे. अशा गुणांनी युक्त जे सज्जन अरण्यात राहातात, त्यापैकी मी एक आहे, असे दिसून आल्यावर मला अरण्यवासात अत्यंत निर्भयता वाटली.

“हे ब्राह्मण, जे श्रमण किंवा ब्राह्मण आत्मस्तुति आणि परनिंदा करतात भ्याड असतात मानमान्यतेची चाड धरून अरण्यात राहतात किंवा जडबुद्धि असतात ते या दोषामुळे भयभैरवाला आमंत्रण देतात. पण माझ्या अंगी हे दुर्गुण नाहीत मी आत्मस्तुति किंवा परनिंदा करीत नाही, भ्याड नाही. मानमान्यतेची मला इच्छा नाही... आणि मी प्रज्ञावान आहे. जे सज्जन अशा गुणांनी युक्त होऊन अरण्यात राहतात त्यापैकी मी एक आहे, असे दिसून आल्यावर मला अरण्यवासात अत्यंत निर्भयता वाटली.

“हे ब्राह्मणा, चतुर्दशी, पूर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी या रात्री (भयासंबंधाने) प्रसिद्ध आहेत. त्या रात्री ज्या उद्यानात, अरण्यात किंवा वृक्षाखाली लोक देवतांना बलिदान देतात किंवा जी स्थळे अत्यंत भयंकर आहेत असे समजतात त्या ठिकाणी मी (एकाकी) राहत असे, कारण भयभैरव कसे असते ते पाहण्याची माझी इच्छा होती. अशा स्थळी राहत असता एखादा हरिण त्या बाजूने जाई, एखादा मोर सुकलेले लाकूड खाली पाडी, किंवा झाडाची पाने वार्‍याने हालत त्या प्रसंगी मला वाटे. हेच ते भयभैरव होय आणि मी म्हणे. भयभैरवाची इच्छा धरूनच मी या ठिकाणी आलो हे तेव्हा या स्थितीत असतानाच त्याचा नाश केला पाहिजे. मी चालत असताना ते भयभैरव आले तर चालत असतानाच त्याचा नाश करीत असे. जोपर्यंत त्याचा नाश केला नाही. तोपर्यंत उभा राहत नसे आणि बसत नसे किंवा अंथरुणावर पडत नसे. जर ते भयभैरव उभा असताना आले तर उभा असतानाच याचा मी नाश करीत असे. जोपर्यंत त्याचा नाश केला नाही तोपर्यंत चालत नसे, बसत नसे, किंवा अंथरुणावर पडत नसे. बसलो जर ते भयभैरव आले तर मी निजत नसे, उभा राहत नसे किंवा चालत नसे बसलो असताच त्याचा नाश करीत असे. अंथरुणावर पडलो असता ते आले तर बसत नसे. उभा राहत नसे किंवा चालत नसे. अंथरुणावर पडलो असताच त्याच नाश करीत असे.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel