बौद्ध संघाची कर्तव्यनिष्ठा

हे सहाही आचार्य वयाने बुद्ध भगवंतापेक्षा वडील होते आणि त्यांच्या भिक्षुंची संख्या देखील बरीच मोठी होती. बुद्ध या सर्व आचार्यात वयाने लहान, आणि त्याच्या भिक्षूसंघाची संख्या देखील कमी, असे असता या लहानशा नवीन भिक्षुसंघाने सर्वांना मागे टाकले आणि हिंदुस्थानावरच नव्हे, तर सर्व आशियाखंडावर आपला प्रभाव पडला, हे कसे?

याला उत्तर हे की, वरील सहा श्रमणसंघ जरी संख्येने मोठे होते, तरी सामान्य जनसमुदायाची ते फारशी काळजी बाळगत नसत. त्यापैकी बहुतेकांचे तपश्चर्येच्या मार्गाने मोक्ष मिळवावा हे ध्येय होते. गावात किंवा शहरात प्रवेश करून ते गृहस्थांकडून भिक्षा घेत आणि प्रसंगोपात आपल्या संप्रदायाचे तत्त्वज्ञान शिकवीत. तथापि गुहस्थांच्या हितसुखासाठी त्यांचा विशेष प्रयत्न नव्हता.

बौद्ध संघाची गोष्ट याच्या उलट होती. ‘लोकांच्या हितासाठी आणि सुखासाठी तुम्ही चारी दिशांना जा, एका मार्गाने दोघे जाऊ नका,’ हा बुद्धाचा उपदेश वर दिलाच आहे. हा उपदेश महावग्गात आणि मारसंयुत्तात सापडतो आणि तशा अर्थाचे उपदेश सुत्तपिटकांत अनेक ठिकाणी आढळतात. या बुद्ध भगवंताच्या उपदेशाला अनुसरून वागल्यामुळे त्याचा भिक्षुसंघ बहुजनसमाजाला प्रिय आणि मान्य झाला व सर्व लोकांवर त्याचा प्रभाव पडला.

परस्परांशी भांडणाऱया लोकांकडे पाहून बोधिसत्त्वाला वैराग्य झाले, हे चवथ्या प्रकरणात सांगितलेच आहे. ती भांडणें राजसत्तेकडून मिटविता येणे शक्य नव्हते. जोपर्यंत लोकात हिंसात्मक बुद्धि राहील, तोपर्यंत समाजातील तंटेबखेडे मिटणे शक्य नाही. म्हणून राजसत्तेपासून निवृत्त होऊन मनुष्यजातीच्या मुक्तीचा मार्ग शोधून काढण्यास बोधिसत्त्व प्रवृत्त झाला. सात वर्षे तपश्चर्येचे अनेक अनुभव घेतल्यानंतर त्याला मागल्या प्रकरणात दिलेला मध्यम मार्ग सापडला आणि त्याचा सर्व लोकांत प्रसार करण्याचा त्याने बेत ठरविला. याच कामासाठी बुद्ध भगवंताने संघाची स्थापना केली. तेव्हा इतर संघातील श्रमणापेक्षा बौद्ध श्रमण सामान्य जनतेच्या हितसुखाची विशेष काळजी घेत याच नवल नाही.

आध्यात्मिक शेतीची आवश्यकता

समाजाने शेती, व्यापार वगैरे धंदे सुरू केले. पण समाजात जर एकोपा नसला तर त्या धंद्यापासून फायदा होणार नाही, एकाने पेरलेले शेत दुसरा कापून नेईल व एखाद्या व्यापाऱयाला दुसरा चोर लुटील अशी रीतीने समाजात अव्यवस्था सुरू झाली. तर त्या समाजातील व्यक्तींना फार कष्ट भोगावे लागतील. हा एकोपा शस्त्रबळाने उत्पन्न करता आला तरी तो टिकाऊ होत नाही. परस्परांच्या सौजन्याने आणि त्यागाने उत्पन्न झालेली एकीच खरी एकी म्हणता येईल. सामान्य जनसमूहात अशी एकी उत्पन्न करण्याचा बुद्धाचा हेतु होता, असे सुत्तनिपातातील कासिभारद्वाज सुत्तावरून दिसून येते. त्याचा सारांश येणेप्रमाणे –

एके दिवशी बुद्ध भगवान भिक्षाटन करीत असता भारद्वाज ब्राह्मणाच्या शेतावर गेला. तेथे भारद्वाज ब्राह्मण आपल्या मजुरांना जेवण देत होता. भगवान भिक्षेसाठी उभा आहे, असे पाहून तो म्हणाला “माझ्याप्रमाणे तू देखील शेत नांगर, पेर, धान्य गोळा कर आणि खा. भिक्षा का मागतोस?”

भगवान म्हणाला, “मी देखील शेतकरी आहे. मी श्रद्धेचे बी पेरतो. त्यावर तपश्चर्येची (प्रयत्नाची), बुद्धि होते. प्रज्ञा माझा नांगर आहे. पापलज्जा, इसाड. चित्त दऱया, स्मृति (जागृति) नांगराचा फाळ आणि चाबूक आहे. कायेने आणि वाचेने मी संयम पाळतो. आहारात नियमित राहून सत्याच्या योगे (मनोदोषांची) मी खुरपणी करतो. संतोष ही माझी सुटी आहे. उत्साह माझै बैल, आणि माझे वाहन अशा दिशेकडे जाते की, जेथे शोक करण्याची पाळी येत नाही!”

या म्हणण्याचा अर्थ भारद्वाजाला तात्काळ समजला व तो बुद्धाचा शिष्य झाला.

ह्या उपदेशात बुद्धाने शेतीचा निषेध केलेला नाही. पण त्या शेतीला नीतिमत्तेचे पाठबळ नसले तर तिच्यापासून समाजाला सुख न होता दु:ख होईल, एवढाच त्या उपदेशाचा निष्कर्ष आहे. एकाने पेरलेली शेती पिकाच्या वेळी दुसर्‍याने बळकावली तर शेती करण्याला कोणी प्रवृत्त होणार नाही आणि समाजात भयंकर अव्यवस्था माजेल. म्हणून प्रथमत: परस्पराचे हितसबंध अहिंसात्मक असावयास पाहिजेत. तशा प्रकारची मानसिक शेती केल्याशिवाय या भौतिक शेतीचा उपयोग होणार नाही, हे जाणून बुद्धाने आपल्या संघाला समाजाची नैतिक जागृति करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे बौद्ध संघ अल्पसंख्याक असतानाही थोडक्याच काळात सामान्य लोकसमूहाला प्रिय झाला आणि आपल्या कर्तबगारीने इतर श्रमणसंघांना त्याने मागे टाकले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


भगवान बुद्ध