मलमूत्र खाण्याची चाल

स्वत:चे मलमूत्र खाण्याची चाल अद्यापिही अघोरीसारख्या पंथात चालू असल्याचे दिसून येते. काशीत तेलंगस्वामी म्हणून एक प्रसिद्ध संन्यासी होऊन गेले. ते नागवे राहत. त्यांच्यासारखे नागवे फिरणारे दुसरेही पुष्कळ परमहंस काशीला होते. त्या वेळी गोडविन नावाचा (याला काशीचे लोक गोविंद साहेब म्हणत) मोठा लोकप्रिय कलेक्टर होता, हिंदु लोकांच्या चालीरीतीची त्याने सहानुभूतिपूर्वक माहिती करून घेतली, आणि या नंग्या बुवांनी लंगोटी लावून फिरावे म्हणून खालील युक्ति योजिली.
रस्त्यात फिरणारा नंगा बुवा भेटल्याबरोबर पोलीस त्याला साहेबाकडे घेऊन जात आणि साहेब त्याला विचारी, “तू परमहंस आहेस का?” त्याने होय म्हणून सांगितल्याबरोबर त्याला तो आपले अन्न खाण्यास सांगत असे. अर्थातच ते नंग्या बुवाला पसंत नसे. तेव्हा गोविंद साहेब म्हणे, “परमहंस कसलाच भेद ठेवीत नसतो, असे शास्त्रांत सांगितले आहे आणि तुमच्या मनात तर भेदभाव आहे. तेव्हा तुम्ही नग्न हिंडता कामा नये.” येणेप्रमाणे पुष्कळशा नंग्या बुवांना त्याने लंगोटी लावण्यास भाग पडले.
असाच प्रसंग एकदा तेलंगस्वामीवर आला. पोलीस स्वामीला घेऊन कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावर गेल्याचे वर्तमान समजताच त्याचे शिष्य व चाहते मोठमोठे पंडित व इतर वजनदार लोक साहेबांच्या बंगल्यावर गेले. साहेबाने सर्वांस बसवून घेऊन तेलंगस्वामीला प्रश्न केला, “तुम्ही परमहंस आहात काय?” स्वामीकडून ‘होय’ असे उत्तर मिळाल्यावर साहेबाने दुसरा प्रश्न केला, “माझ्याकडचे अन्न खाल काय?” त्यावर स्वामी म्हणाले, “तुम्ही माझे अन्न खाल काय?” मी जरी परमहंस नाही, तरी कोणाचेही अन्न खातो,” साहेबाने उत्तर केले.

स्वामींनी तेथल्या तेथे आपल्या हातावर शौचविधि केला व तो हात पुढे करून स्वामी गोविंदसाहेबाला म्हणाले, “हे घ्या माझे अन्न, हे तुम्ही खाऊन दाखवा” साहेब अत्यंत कंटाळला आणि संतापून म्हणाला, “हे काय माणसाने खाण्याजोगे अन्न आहे?” तेव्हा स्वामींनी ते पार खाल्ले आणि हात चाटून साफसूफ केला. साहेबाने स्वामीला सोडून दिले, इतकेच नव्हे, पण पुन्हा त्याची चौकशी देखील केली नाही!

मी १९०२ साली काशीला असताना ही गोष्ट काशीच्या पंडितांनी मोठ्या आदराने सांगितलेली ऐकली आहे. आणि त्यापूर्वी ती तशाच आदरबुद्धीने ‘काशीयात्रा’ या पुस्तकात लिहिलेली मी वाचली.

आधुनिक तपस्या

हेच तेलंगस्वामी भर थंडीच्या दिवसात केवळ डोके वर ठेवून गंगेत बसत आणि भर उन्हाळ्यात ज्या ठिकाणी चालल्याने पायाला फोड येई त्या गंगेच्या वाळवंटात बसत.

लोखंडाच्या काट्याची खाट बनवून त्याच्यावर निजणारे बैरागी पुष्कळांनी पाहिले असतील. १९०२ साली असा एक बैरागी काशीत बिंदुमाधवाच्या मंदिराजवळ राहत होता. लाकडाची लंगोटी घालून फिरणारे बुवाबैरागीही माझ्या पाहण्यात आले आहेत.
श्रमणांचा तपश्चर्येविषयी आदर

वर दिलेल्या तपश्चर्येच्या प्रकारांपैकी शाक, शामाक व अरण्यातील सहज मिळालेली फळेमुळे खाऊन राहणे, या प्रकार अरण्यात राहणारे ऋषिमुनी आचरीत असत. ते वल्कले नेसत आणि बहुतेक अग्निहोत्रही ठेवीत. परंतु हे जे नवीन श्रमणसंप्रदाय निघाले त्यांनी अग्निहोत्राला फाटा दिला आणि अरण्यात राहणार्‍या ऋषिमुनीच्या बर्‍याच तपश्चर्या घेऊन त्यात चामड्याचे तुकडे वगैरे खाण्याच्या तपश्चर्याची भर घातली.

बुद्धाच्या वेळी निर्ग्रंथाचा (जैनांचा) संप्रदाय जोमात होता हे वर सांगितलेच आहे. त्याशिवाय पूरणकाश्यप, सक्खलि गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कात्यायन आणि संजय बेलट्ठपुत्त या पाच श्रमणनायकाचे श्रमणसंप्रदाय फार प्रसिद्ध होते. या लोकांच्या तत्त्वज्ञानाचा विचार संक्षेपाने सातव्या प्रकरणात केला आहे. त्यावरून असे दिसून येईल की, तत्त्वाविषयी त्यांचा फार मोठा मतभेद होता. तथापि दोन गोष्टीत त्यांची एकवाक्यता होती –

(१) या सर्वांना यज्ञयाग पसंत नव्हते आणि

(२) तपश्चर्येविषयी थोड्याबहुत प्रमाणात त्यांचा आदर होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel