आ.—आपण काही म्हणा, ब्राह्मण आपणाला श्रेष्ठ समजतात व इतर वर्णांना हीन समजतात ही गोष्ट खरी आहे.

भ.—हे आश्वलायना, एखादा मूर्धावसिक्त राजा सर्व जातीच्या शंभर पुरुषांना एकत्र करील, त्यापैकी क्षत्रिय, ब्राह्मण आणि राजकुलात जन्मले असतील त्यांना तो म्हणेल, ‘अहो इकडे या, आणि शाल किंवा चंदनासारख्या उत्तम वृक्षाची उत्तरारणी घेऊन अग्नि उत्पन्न करा.’ आणि त्यापैकी चाडाळ, निषाद इत्यादिक हीन कुलामध्ये जन्मलेले असतील त्यांना तो म्हणेल, ‘अहो इकडे या व कुत्र्याला खावयाला घालावयाच्या दोणीत, डुकराला खावयाला घालावयाच्या दोणीत किंवा रंगार्‍याच्या दोणीत  एरंडाच्या उत्तरारणीने अग्नि उत्पन्न करा.’ हे आश्वलायना ब्राह्मणादिक उच्च वर्णाच्या मनुष्याने उत्तम अरणीने उत्पन्न केलेला अग्नि तेवढा भास्वर आणि तेजस्वी होईल, आणि चांडालादिक हीन वर्णाच्या मनुष्याने एरंडादिकाच्या अरणीने उत्पन्न केलेला अग्नि भास्वर आणि तेजस्वी होणार नाही व त्यापासून अग्विकार्ये घडणार नाहीत, असे तुला वाटते काय?

आ.—भो गोतम, कोणत्याही वर्णाच्या माणसाने बर्‍या किंवा वाईट लाकडची उत्तरारणी करून कोणत्याही ठिकाणी अग्नि उत्पन्न केला तर तो एकसारखाच तेजस्वी होईल व त्यापासून समान अग्निकार्ये घडून येतील.

भ.—एखाद्या क्षत्रियकुमाराने ब्राह्मण कन्येबरोबर शरीरसबंध केला व त्या संबंधापासून जर त्याला पुत्र झाला तर तो पुत्र आईबापासारखाच मनुष्य होईल असे तुला वाटत नाही काय? त्याचप्रमाणे एखाद्या ब्राह्मणकुरामाराने क्षत्रिय कन्येशी विवाह केला व त्या संबंधापासून त्याला पुत्र झाला तर तो आईबापांसारखा  होता भलत्याच प्रकारचा होईल, असे तुला वाटते काय?

आ.—अशा मिश्र विवाहाने जो मुलगा होतो तो त्याच्या आईबापांसारखाच मनुष्य असतो. त्याला ब्राह्मणही म्हणता येईल किंवा क्षत्रियही म्हणता येईल.

भ.—पण आश्वलायना, एखाद्या घोडीच्या आणि गाढवाच्या संबंधापासून जे शिंगरू होते त्याला त्याच्या आईसारखे किंवा बापासारखे म्हणता येते काय? त्याला घोडाही म्हणता येईल आणि गाढवही म्हणता येईल काय?

आ.—भो गोतम, त्याला घोडा किंवा गाढव म्हणता येत नाही. तो एक तिसर्‍याच जातीचा प्राणी होतो. त्याला आपण खेचर म्हणतो, परंतु ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या संबंधापासून झालेल्या मुलामध्ये असा प्रकार आढळून येत नाही.

भ.—हे आश्वलायन दोघा ब्राह्मण बंधूंपैकी एक वेदपठण केलेला चांगला सुशिक्षित व दुसरा असिक्षित असेल तर त्यात ब्राह्मण कोणत्या भावाला श्राद्धामध्ये व यज्ञामध्ये प्रथम आमंत्रण देतील?

आ.—जो सुशिक्षित असेल त्यालाच प्रथम आमंत्रण दिले जाईल.

भ.—आता असे समज की, या दोघा भावांपैकी एकजण मोठा विद्वान पण अत्यंत दुराचारी आहे, दुसरा विद्वान नाही, पण अत्यंत सुशील आहे, तर त्या दोघांमध्ये प्रथमत: कोणाला आमंत्रण दिले जाईल?

आय—भो गोतम, जो शीलवान असेल त्यालाच प्रथम आमंत्रण दिले जाईल, दुराचारी मनुष्याला दिलेले दान महाफलदायक कसे होईल?

भ.—हे आश्वलायन, प्रथमत: तू जातीला महत्त्व दिलेस, नंतर वेदपठनाला, आणि आता शीलाला महत्त्व देत आहेस, अर्थात मी जी चातुर्वर्ण्यशुद्धि प्रतिपादितो तिचाच तू अंगीकार केलास.

हे बुद्ध भगवंताचे भाषण ऐकून आश्वलायन मान खाली घालून चुप्प राहिला. पुढे काय बोलावे हे त्याला सुचेना. नंतर भगवंताने असितदेवल ऋषीची गोष्ट सांगितली आणि शेवटी आश्वलायन बुद्धाचा उपासक झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel