५. वज्जी

महाजनसत्ताक राज्यात तीनच राज्ये स्वतंत्र राहिली होती. एक वज्जींचे, आणि दोन पावा व कुशिनारा येथील मल्लांची. त्यात वज्जींचे राज्य बलाढ्य असून भरभराटीत होते, तरी त्याचा अस्त देखील फार दूर नव्हता. तथापि पहाटेच्या प्रहरी शुक्राच्या चांदणीप्रमाणे ते चमकत होते. बुद्ध भगवान् अशाच एका महाजनसत्ताक राज्यात जन्मला. पण शाक्यांचे स्वातंत्र्य पूर्वीच नष्ट झाले होते. वज्जी आपल्या एकीने व पराक्रमाने बुद्धाच्या ह्यातीत स्वतंत्र राहिल्यामुळे बुद्धाला त्यांच्याविषयी आदर असणे साहजिक होते. महापरि-निब्बानसुत्तांत भगवान दुरून येणार्‍या लिच्छवींकडे पाहून भिक्षूंना म्हणतो, `भिक्षूंनो, ज्यांनी तावतित्रंशत् देव पाहिले नसतील, त्यांनी या लिच्छवींच्या समुदायाकडे पाहावे!’

वज्जींची राजधानी वैशाली नगरी होती. तिच्या आसपास राहणार्‍या वज्जींना लिच्छवी म्हणत. त्यांच्या पूर्वेला पूर्वी विदेहांचे राज्य होते, जेथे जनकासारखे उदारधी राजे होऊन गेले. विदेहांचा शेवटचा राजा सुमित्र मिथिलानगरीत राज्य करीत होता, असे ललितविस्तरावरून दिसून येते. त्याच्या पश्चात विदेहांचे राज्य वज्जींच्या राज्याला जोडण्यात आले असावे.

बुद्ध भगवन्ताने वज्जींना अभिवृद्धीचे सात नियम उपदेशिल्याचे वर्णन महापरिनिब्बानसुत्ताच्या आरंभी आणि अंगुत्तरनिकायाच्या सत्तकनिपातात सापडते. महापरिनिब्बानसुत्ताच्या अट्ठकथेत या नियमावर विस्तृत टीका आहे. तिजवरून असे अनुमान करता येते की, वज्जींच्या राज्यात एक प्रकारची ज्युरीची पद्धति होती व सहसा निरपराधी माणसाला शिक्षा होत नसे. त्यांचे कायदे लिहिलेले असत व त्याप्रमाणे चालण्याविषयी ते दक्षचा बाळगीत.

६. मल्ला


मल्लांचे राज्य वज्जींच्या पूर्वेस व कोसल देशाच्या पश्चिमेस होते. तेथे वज्जींप्रमाणेच गणसत्ताक राज्यपद्धति प्रचलित होती. परंतु मल्लात फूट पडून त्यांचे पावा येथील मल्ल व कुशिनारा येथील मल्ल असे दोन विभाग झाले होते.

मगध देशातून कोसल देशाकडे जाण्याचा रस्ता मल्लांच्या राज्यातून असल्यामुळे बुद्ध भगवान तेथून वारंवार प्रवास करीत असे. बुद्ध भगवंताने पावा येथे राहणार्‍या चुन्द लोहाराचे अन्न ग्रहण केले; आणि तो आजारी झाला; व तेथून कुसिनारेला गेल्यावर त्या रात्री परिनिर्वाण पावला. आजला त्या ठिकाणी एक लहानसा स्तूप व मंदिर अस्तित्वात आहे. त्याच्या दर्शनाला अनेक बौद्ध यात्रेकरू जातात. पावा किंवा पडवणा हा गावही येथून जवळच आहे. तेव्हा पावा येथील मल्ल व कुसिनारा येथील मल्ल जवळ जवळ राहत असे दिसते. या दोन राज्यांतून बुद्धाचे बरेच शिष्य होते. ही राज्ये स्वतंत्र होती खरी, पण त्यांचा प्रभाव वज्जींच्या गणसत्ताक राज्याएवढा खास नव्हता. किंबहुना वज्जींच्या बलाढ्य राज्याच्या अस्तित्वामुळे ती राहिली असावी.

७. चेती

या राष्ट्राची माहिती जातकातील चेतिय जातक आणि वेस्संतर जातक या दोन जातकात आली आहे. त्याचा राजधानी सोत्थिवती (स्वस्तिवती) होती असे चेतिय जातकात (नं. ४२२) म्हटले आहे;  आणि तेथील राजांची परंपराही दिली आहे. शेवटला राजा उपचर किंवा अपचर हा खोटे बोलला आणि आपल्या पुरोहिताच्या शापामुळे नरकात पडला. त्यांचे पाच मुलगे पुरोहिताला शरण गेले. पुरोहिताने ते राज्य सोडून जाण्यास त्यांना सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांनी बाहेर जाऊन निरनिराळी पाच शहरे वसविली, असे वर्णन या जातकात आढळते.

वेस्संतराची पत्नी मद्दी (माद्री) ही मद्द (मद्र) राष्ट्रांतील राजकन्या होती. याच राष्ट्राला चेतिय राष्ट्र म्हणत असे वेस्संतर जातकातील कथेवरून दिसून येते. खुद्द वेस्संतरांचा देश शिवि हा या चेतिय राष्ट्राच्या जवळ होता. तेथल्या शिविराजाने आपले डोळे ब्राह्मणाला दिल्याची कथा जातकात प्रसिद्ध आहे. (सिविजातक (नं. ४९९) पाहा.) वेस्संतर राजकुमाराने देखील आपला मंगल हत्ती, दोन मुले आणि बायको ब्राह्मणांना दान दिल्याची कथा वेस्संतर जातकात आली आहे. यावरून फार तर एवढे सिद्ध होते की, शिवींच्या आणि चेतींच्या (चौद्यांच्या) राष्ट्रात ब्राह्मणांचे फार वर्चस्व असे आणि त्यामुळे ही राज्ये कोठे तरी पश्चिमेच्या बाजूला असावी. बुद्धकाळी शिवीचे व चेतीचे नाव अस्तित्वात होते;  पण बुद्ध त्यांच्या राज्यांत गेल्याचे, किंवा अंगाचा जसा मगधांच्या राज्यात समावेश झाला, तसा या राज्यांच्या दुसर्‍या राज्यात समावेश झाल्याचेही दिसून येत नाही. काही असो, बुद्ध भगवंताच्या चरित्राशी या राज्यांचा कोणत्याही रीतीने संबंध आला नाही एवढे खास.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल