प्रस्तुत ग्रंथाचे हस्तलिखित नवभारत ग्रंथमालेच्या संपादकांनी वाचून पाहिले, तेव्हा ग्रंथामध्ये ज्यांचे विशेष विवेचन आलेले नाही असे काही मुद्दे माझ्या नजरेस आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचा येथेच थोडक्यात विचार करणे योग्य होईल असे वाटल्यावरून तसे करीत आहे.

(१) बुद्धाच्या जन्मतिथीसंबंधाने निरनिराळ्या मतांचा उपन्यास करून साधकबाधक प्रमाणांनिशी ऊहापोह प्रस्तुत ग्रंथात करावयास नको होता काय? आपल्या प्राचीन अथवा मध्ययुगीन इतिहासातील राज्यकर्ते, धर्मगुरू, ग्रंथकार इत्यादिकांचे चरित्र वर्णन करावयाच्या अगोदर त्यांचा काल ठरविण्यासाठी विद्वानांना पुष्कळच मजकूर खर्ची घालावा लागतो, तसे या ग्रंथांत केलेले दिसत नाही.

या मुद्दयासंबंधाने माझे म्हणणे असे: मध्ययुगी कवि आणि ग्रंथकार हे शककर्ते नव्हते. त्यांच्या जन्मतिथीसंबंधी कितीही वाद केला तरी त्या नक्की ठरविता येतील असे वाटत नाही. बुद्धाची गोष्ट तशी नाही. त्याच्या परिनिर्वाणापासून तहत आजपर्यंत त्याचा शक चालू आहे. मध्यंतरी पाश्चात्य पंडितांनी वादविवाद करून ह्या तिथीत ५६ पासून ६५ वर्षापर्यंत फरक आहे, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण अखेरीस जी परंपरा सिंहलद्वीपात चालू आहे, तीच बरोबर ठरली. पण समजा बुद्धाच्या जन्मतिथीत थोडासा कमीजास्त फरक पडला तरी त्यापासून त्याच्या चरित्राला काही गौणत्व येईल असे वाटत नाही. मुद्दयाची गोष्ट जन्मतिथि नसून त्याच्या पूर्वीची स्थिती काय होती आणि त्या स्थितीतून बुद्धाने नवीन धर्ममार्ग कसा शोधून काढला ही होय; आणि ती जर विशद करता आली, तर आजकाल बुद्धासंबंधाने प्रचलित  असलेल्या भ्रामक कल्पना नष्ट होतील व आम्हाला त्या काळचा इतिहास नीटपणे समजेल. तेव्हा तिथीवर पुष्कळ पाने खर्ची न घातला बुद्धाच्या चरित्रावर प्रकाश पडेल अशाच गोष्टींकडे मी विशेष लक्ष दिले आहे.

(२) बुद्धाने उपदेशिलेल्या अहिंसेने हिंदी समाज नेभळट झाला व त्यामुळेच परकीयांकडून तो जिंकला गेला, असे मत कित्येक ठिकाणी प्रतिपादिले जाते. त्याला या ग्रंथात उत्तर असावयास पाहिजे होते.

उत्तर- बुद्धाच्या चरित्राचा आणि या प्रतिपादनाचा काही संबंध आहे, असे मला वाटत नाही. बुद्धाचे परिनिर्वाण इ. स. पूर्वी ५३ व्या वर्षी झाले. त्यानंतर दोन शतकांनी चंद्रगुप्ताने  साम्राज्य स्थापन केले. स्वत: चंद्रगुप्त जैनधर्मी होता असे म्हणतात. पण ग्रीक लोकांना या देशांतून हाकून देण्याला अहिंसाधर्म त्याला आड आला नाही. त्याचा नातू अशोक पूर्णपणे बौद्ध झाला, तरी मोठे साम्राज्य चालवीत होता.

महंद इब्न कासीम याने इ. स. ७१२ साली सिंध देशावर स्वारी केली, तेव्हा बौद्धधर्म पश्चिम हिंदुस्थानातून लोप पावला होता; आणि ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व वाढत गेले होते. असे असता खलिफाच्या या अल्पवयी सरदाराने सिंध देश हा हा म्हणता पादाक्रांत केला, आणि तेथील हिंदु राजाला ठार मारून त्याच्या मुली आपल्या खलिफाला नजराण्यादाखल पाठवून दिल्या.

मुसलमानांनी सिंध आणि पंजाब देशाचा काही भाग ताब्यात घेतल्यानंतर शंभर वर्षानी शंकराचार्य उदयाला आले. त्यांच्या वेदान्ताचा सर्व रोख म्हटला म्हणजे शूद्रांनी वेदाध्ययन करता कामा नये हा! जर शूद्रांनी वेदवाक्य ऐकले, तर त्याचे कान शिशाने किंवा लाखेने भरावे; वेदवाक्य उच्चारले तर त्याची जीभ कापावी; आणि वेदमंत्र धारण केला तर त्याला ठार मारावे. हा त्यांचा वेदान्त! मुसलमान जेत्यांपासून तरी हे आमचे सनातनी धडा शिकले काय? बुद्ध तर त्यांचा शत्रूच, त्याच्यापासून शिकण्यासारखे होते काय?

रजपूत लोक चांगले सनातनी, ते अहिंसेला निखालस मानीत नसत. प्रसंग पडेल तेव्हा आपसात यथेच्छ लढाया करीत. हिंसेच्या ह्या शूर भक्तांना महमूद गझनीने घोडय़ाच्या पायाखालच्या धुळीसारखे उद्ध्वस्त कसे केले? ते बुद्धाची अहिंसा मानीत होते म्हणून की काय?

आमची पेशवाई तर खास ब्राह्मणांच्याच हाती होती. शेवटला बाजीराव कर्मठपणाबद्दल प्रसिद्ध आहे. हिंसेची तर पेशवाईत परमावधि झाली. इतरांशी लढाया तर राहूच द्या, पण घरच्या घरीच एकदा दौलवराव शिंद्याने पुणे लुटले, तर दुसर्‍यांदा यशवंतराव होळकराने लुटले! अशा या निस्सीम हिंसाभक्तांचे साम्राज्य सर्व हिंदुस्थानावर व्हावयास  नको होते काय? त्यांना त्यांच्यापेक्षा शतपटीने अहिंसक असलेल्या इंग्रजांना शरण का जावे लागले? एकामागून एक मराठे सरदार इंग्रजांचे अंकित का झाले? ते बुद्धाचा उपदेश मानीत होते म्हणून काय?

जपान आजला हजार बाराशे वर्षे बौद्धधर्मी आहे. १८५३ साली त्यांच्यावर कमोडोर पेरीने तोफा रोखल्याबरोबर त्यांची जागृति होऊन एकी कशी झाली? बौद्धधर्माने त्यांना नेभळट का बनविले नाही?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


भगवान बुद्ध