(१) शस्त्रधारण भयावह वाटले. (त्यामुळे) ही जनता कशी भांडते पाहा. मला संवेग (वैराग्य) कसा उत्पन्न झाला हे सांगतो. (२) अपुर्‍या पाण्यात मासे जसे तडफडतात, त्याप्रमाणे परस्परंशी विरोध करून तडफडणार्‍या प्रजेकडे पाहून माझ्या अंत:करणात भय शिरले. (३) चारी बाजूंना जग असार दिसू लागले. सर्व दिशा कंपित होत आहेत असे वाटले आणि यात आश्रयाची जागा शोधीत असता निर्भय स्थान सापडेना. कारण शेवटपर्यंत सर्व जनता परस्परांशी विरुद्ध झालेलीच दिसून आल्यामुळे मला कंटाळा आला. रोहिणी नदीच्या पाण्यासाठी शाक्य आणि कोलिय भांडत होते, एक वेळी दोघांनीही आपले सैन्य तयार करून रोहिणी नदीपाशी नेले, आणि त्या प्रसंगी बुद्ध भगवान दोन्ही सैन्याच्या मध्ये येऊन त्याने हे सुत्त उपदेशिले, असा उल्लेख जातकअट्ठकथेत अनेक ठिकाणी आला आहे. पण तो विपर्यस्त असावा असे वाटते. शाक्यांना आणि कोलियांना भगवान बुद्धाने उपदेश केला असेल आणि त्यांची भांडणेही मिटवली असतील. परंतु त्या प्रसंगी हे सुत्त उपदेशिण्याचे काही कारण दिसत नाही. आपणाला वैराग्य कसे झाले व आपण घरातून बाहेर का पडलो हे या सुत्तात भगवान सांगत आहे. रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने किंवा अशाच क्षुद्र कारणास्तव शाक्य आणि कोलिय यांची भांडणे होत. त्या प्रसंगी आपण शस्त्र धरावे की नाही हा बोधिसत्त्वाला प्रश्न पडला असावा. पण शस्त्राने ही भांडणे मिटविणे शक्य नव्हते. शाक्य आणि कोलिय यांची भांडणे जबरदस्तीने मिटवली गेली तरी ती मिटली नसती. का की, ती मिटविणार्‍याला पुन्हा शेजारच्या राजाशी शस्त्र धरावे लागले असते, आणि जर त्याने त्यालाही जिंकले, तर त्याच्या पलीकडच्या राजाला जिंकणे त्याला भाग पडले असते. याप्रमाणे शस्त्रग्रहणामुळे जिकडे तिकडे जय मिळविल्यावाचून गत्यंतर राहिले नसते. पण जय मिळविला तरी त्याला शांति कोठून मिळणार होती? पसेनदि कोसल आणि बिंबिसार यांचे पुत्रच त्यांचे शत्रू झाले. तर मग या शस्त्रग्रहणापासून लाभ काय? शेवटपर्यंत भांडत राहावे हाच! या सशस्त्र प्रवृत्तिमार्गाचा प्रेमळ बोधिसत्त्वाला कंटाळा आला आणि त्याने शस्त्रनिवृत्तीमार्ग स्वीकारला.

सुत्तनिपातातील पब्बज्ज्या सुत्तात आरंभीच खालील गाथा आहेत.

पब्बजं कित्तयिस्सामि, यथा पब्बजि चक्खुमा,
यथा वीमंसमानो सो पब्बजं समरोचयि ।।१।।
संबाधोडयं घरावासो रजस्सायतनं इति।
अब्भोकासो च पब्बज्जा इति दिस्वान पब्बजि ।।२।।

(१) चक्षुष्मन्ताने प्रव्रज्या का घेतली आणि ती त्याला कोणत्या विचारामुळे आवडली हे सांगून (त्याच्या) प्रव्रज्येचे मी वर्ण करतो.

(२) गृहस्थाश्रम म्हणजे अडचणींची आणि कचर्‍याची जागा व प्रव्रज्या म्हणजे मोकळी हवा, असे जाणून तो परिव्राजक झाला.’
या म्हणण्याला आधार मज्झिमनिकायातील महासच्चक सुत्तातही सापडतो. तेथे भगवान म्हणतो, “हे अग्गिवेस्सन, संबोधिज्ञान होण्यापूर्वी बोधिसत्त्व असतानाच मला वाटले, ‘गृहस्थाश्रम अडचणीची व कचर्‍याची जागा आहे, प्रव्रज्या म्हणजे मोकळी हवा. गृहस्थाश्रमात राहून अत्यंत परिपूर्ण आणि परिशुद्ध ब्रह्मचर्य आचरणे शक्य नाही. म्हणून मुंडन करून आणि काषाय शस्त्रे धारण करून घरातून बाहेर पडून परिव्राजक होणे योग्य आहे.’

परंतु रियपरियेसनसुत्तात याच्यापेक्षा थोडेसे भिन्न कारण दिले आहे. भगवान म्हणत, “भिक्षुहो, संबोधिज्ञान होण्यापूर्वी बोधिसत्त्व असनाताच मी स्वत: जन्मधर्मी असताना जन्माच्या फेर्‍यात सापडलेल्या वस्तूंच्या (पुत्र, दारा, दासी, दास इत्यादिकांच्या) मागे लागलो होतो. (म्हणजे माझे सुख त्याजवर अवलंबून आहे असे मला वाटे.) स्वत: जराधर्मी असताना, व्याधिधर्मी असताना, मरणधर्मी असताना, शोकधर्मी असताना, जरा, व्याधि, मरण, शोक यांच्या फेर्‍यात सापडलेल्या वस्तूंच्याच मागे लागलो होतो. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की, मी स्वत: जन्म, जरा, मरण, व्याधि व शोक यांनी संबद्ध असता त्यांनीच संबद्ध जे पुत्रदारादिक त्यांच्या मागे लागलो आहे हे ठीक नव्हे. तर मग मी या जन्मजरादिकांनी होणारी हानि पाहून अजात, अजर, अव्याधि, अमर आणि अशोक असे जे परमश्रेष्ठ निर्वाणपद त्याचा शोध करावा हे योग्य आहे.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel