आत्म्याच्या कल्पना

या आचार्यांच्या आणि तत्समकालीन इतर श्रमणांच्या आत्म्याविषयी किती विलक्षण कल्पना होत्या यांचा थोडासा मामला उपनिषदात सापडतो. उदहरणार्थ आत्मा तांदळापेक्षा आणि जवापेक्षाही बारीक आहे, आणि तो हृदयामध्ये राहतो, ही कल्पना घ्या.
एष में आत्मान्तर्हृदयेणीयान्प्रीहेर्वा ययाद् सर्षपाद्वा

श्यामाकाद् श्यामकतण्डुलाद्वा। (छान्दोग्य ३।१४।३)

’हा माझा आत्मा अंतर्हृदयांत (राहतो), तो भातापेक्षा, जवापेक्षा, मोहरीपेक्षा, श्यामाक नावाच्या देवभातापेक्षा किंवा त्याच्या तांदळापेक्षाहि लहान आहे.’ आणि तो यांच्या एवढाही आहे!

मनोमयोयं पुरुषो भा: सत्यसतस्मिन्नन्तर्हृदये यता
ब्रीहिर्वा यतो वा... (बृहदारण्यक ५।६।१)

‘हा पुरुषरूपी आत्मा मनोमय भास्वान आणि सत्यरूपी असून त्या अंतर्हृदयामध्ये जसा भाताचा किंवा जवाचा दाणा (तसा असतो).’

त्यानंतर तो आंगठ्याएवढा आहे, अशी याची कल्पना प्रचलित झाली.
अङगुष्ठमत्र: पुरुषो मध्य आत्मनि तष्ठति। (कठ २।४।१२)

‘आंगठ्याएवढा तो पुरुष आत्म्याच्या मध्यभागी राहतो.’ आणि मनुष्य झोपला असता तो त्याच्या शरीरातून बाहेर हिंडावयास जातो. स यथा शकुनि:सूत्रेण प्रबद्धो दिशं दिशं पतित्न्यत्रयतनमलब्ध्वा बन्धनमेवोपश्रयत एवमेव खलु सोम्य तन्मनो दिशं दिशं पतित्वान्यत्रायतनमलब्ध्वा प्राणमेवोपश्रयते प्राणबन्धनं हि सोम्य मन इति।। (छान्दोग्य ६।९।२).

‘तो (आत्मा), जसा दोरीने बांधलेला पक्षी चारी दिशांना उडतो आणि तेथे राहु न शकल्यामुळे बंधनातच येतो, त्याचप्रमाणे हे सौम्य, मनाच्या योगे आत्मा चारी दिशांना उडतो, आणि तेथे स्थान न मिळाल्यामुळे प्राण्याचा आश्रय धरतो; कारण प्राण हे मनाचे बंधन आहे.’

शाश्वतवाद व उच्छेदवाद

अशा विचित्र आणि विविध आत्मविषयक कल्पना बुद्धसमकालीन श्रमणब्राह्मणांत पसरल्या होत्या, त्या सर्व दोनच वर्गात येत असत. त्यापैकी एकाचे म्हणणे असे की,

सस्सतो अत्ता च लोको  वंझो कुटट्ठो एसिकट्ठायी ठितो।।

‘आत्मा आणि जग शाश्वत आहे.  वन्ध्य कूटस्थ आणि नगरद्वारावरील स्तंभाप्रमाणे स्थिर आहे.’* (*हे आणि दुसरे अनेक आत्मवाद दीघनिकायातील ब्रह्मजालसुत्तात दिले आहेत. इतर निकायात देखील भिन्न भिन्न आत्मवादांचा उल्लेख सापडतो.) या वादात पूरण कस्सप, मक्खलि गोसाल, पकुध कच्चायन आणि निगण्ठ नाथपुत्त यांची मते समाविष्ट होत असत.

आणि दुसरे श्रमणब्राह्मण उच्छेदवाद प्रतिपादन करीत ते म्हणत –

अथं अत्ता रूपी चातुम्माबाभूतिको मातापेत्तिसंभवो
कायस्स भेदा इच्छिज्जति बिनस्सति न होति परं मरणा।।

‘हा आत्मा जड, चार महाभूतांचा बनलेला आणि आईबापांपासून उत्पन्न झालेला, शरीरभेदानंतर छिन्न होतो, विनाश पावतो तो परणानंतर राहत नाही.’ हे मत प्रतिपादणार्‍या श्रमणांत अजित केसकम्बल प्रमुख होता. यांच्या दरम्यान आत्मा काही अंशी शाश्वत व कांही अंशी अशाश्वत असे म्हणणारे देखील श्रमणब्राह्मण होते, संजय बेलट्ठपुत्ताचा वाद तशाच प्रकारचा दिसतो आणि तेच तत्त्वज्ञान पुढे जैनांनी उचलले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel