बिंबिसार राजाचा मुलगा अजातशत्रु आपल्या अमात्यांसह पौर्णिमेच्या रात्री प्रासादाच्या गच्चीवर बसला आहे. त्या वेळी त्याला कोणातरी एखाद्या मोठ्या श्रमण नायकाची भेट घ्यावी अशी इच्छा होते. तेव्हा त्याच्या अमात्यांपैकी प्रत्येकजण एकेका श्रमणसंघाच्या नायकाची स्तुति करतो व राजाला त्याच्याजवळ  जाण्यास विनवितो. त्याचा गृहवैद्य मुकाट्याने बसला होता. त्याला अजातशत्रु प्रश्न करतो; तेव्हा जीवक बुद्ध भगवंतांची स्तुति करून त्यांची भेट घेण्यास राजाचे मन वळवितो. आणि जरी या श्रमण संघांच्या पुढार्‍यांत बुद्ध वयाने लहान होता, आणि त्याचा संघ नुकताच स्थापन झाला होता, तरी त्याचीच भेट घ्यावी असे अजातशत्रू ठरवतो, आणि सहपरिवार बुद्धाच्या दर्शनासाठी जीवकाच्या आम्रवनात जातो.

अजातशत्रूने आपल्या बापाला कैद करून ठार केले व गादी बळकावली. तथापि बापाने जो श्रमणांचा आदर ठेवला होता, तो त्याने कमी पडू दिला नाही. बिंबिसार राजाच्या मरणानंतर बुद्ध भगवान क्वचितच राजगृहाला येत असे. त्यापैकी वर सांगितलेला एक प्रसंग होता. गादी मिळण्यापूर्वी अजातशत्रूला आपल्या बाजूला वळवून देवदत्ताने बुद्धावर नालगिरि नावाचा उन्मत्त हत्ती सोडण्याचा कट केला होता, इत्यादि गोष्टी विनयपिटकात वर्णिल्या आहेत. त्यात कितपत तथ्य असावे हे सांगता येत नाही. तथापि एक गोष्ट खरी की, अजातशत्रूचा देवदत्ताला चांगलाच पाठिंबा होता. आणि त्यामुळेच बुद्ध भगवान राजगृहापासून दूर राहत असत. ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे अजातशत्रू आपल्या बापापेक्षा देखील श्रमणांचा आदर विशेष ठेवीत होता, असे स्पष्ट दिसून येते. किंबहुना त्याच्या कारकीर्दीत मगध देशातील यज्ञयाग नष्टप्राय होत चालले आणि श्रमणसंघांची भरभराट होत गेली.

मगधांची राजधानी राजगृह ही जागा बिहार प्रांतांत तिलय्या नावाच्या स्टेशनापासून सोळा मैलांवर आहे. चारी बाजूंना डोंगर असून त्याच्या मध्यभागी हे शहर वसले होते. शहरांत जाण्याला डोंगराच्या खिंडीतून दोनच रस्ते असल्यामुळे शत्रूपासून  सहराचे रक्षण करणे सोपे काम वाटल्यावरून येथे हे शहर बांधण्यात आले असावे. पण अजातशत्रूचे सामर्थ्य इतके वाढत गेले की, त्याला आपल्या रक्षणासाठी या डोंगरांतील गोठ्यात (गिरिव्रजांत) राहण्याची गरज वाटली नाही. बुद्धाच्या परिनिर्वाणापूर्वी तो पाटलिपुत्र येथे एक नवीन शहर बांधीत होता ; आणि पुढे त्याने आपली राजधानी त्याच ठिकाणी नेली असावी.

अजातशत्रूला वैदेहीपुत्र म्हटले आहे. यावरून त्याची आई विदेह राष्ट्रातील असावी असे सकृद्दर्शनी दिसून येते. आणि जैनांच्या `आचारांग’ सूत्रादिकातही त्याची आई वज्जी राजांपैकी एका राजाची कन्या होती असा उल्लेख आढळतो. परंतु कोसलसंयुत्ताच्या दुसर्‍या वग्गाच्या चौथ्या सुत्ताच्या अट्ठकथेत त्याला पसेनदीचा भाचा म्हटले आहे. आणि वैदेही शब्दाचा अर्थ `पंडिताधिवचनमेतं, पंडितित्थिया पुत्तो ति अत्थो’ असा केला आहे. ललितविस्तरात मगध देशाच्या राजकुलाला वैदेहीकुल हीच संज्ञा दिली आहे. यावरून असे दिसते की, हे कुल पितृपरंपरेने अप्रसिद्ध होते. आणि पुढे त्यातील एखाद्या राजाचा विदेह देशातील राजकन्येशी संबंध जडल्यामुळे ते नावारुपास आले; आणि काही राजपुत्र आपणास वैदेहीपुत्र म्हणवून घेऊ लागले.

अजातशत्रूने बिंबिसाराला ठार मारल्याची बातमी ऐकली तेव्हा अवंतीचा चंडप्रद्योत राजा फार रागावला व अजातशत्रूवर स्वारी करण्याचा त्याने घाट घातला. त्याच्या भयाने अजातशत्रूने राजगृहाच्या तटाची डागडुजी केली. (मज्झिमनिकायांतील गोपकमोग्गलानसुताची अट्ठकथा पाहा.) पुढे चंडप्रद्योताच्या स्वारीचा बेत रहित झाला असावा. चंडप्रद्योतासारखा परकीय राजा अजातशत्रूवर रागावला, पण मगधातील प्रजेचा प्रक्षोभ मुळीच झाला नाही. यावरून या देशात एकसत्ताक राज्यपद्धति कशी दृढमूल झाली होती, याचे चांगले अनुमान करता येते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel