भिक्षुणीसंघाची स्थापना

भिक्षुणीसंघाच्या स्थापनेची हकीकत चुल्लवग्गात आली आहे. तिचा सारांश असा :--

बुद्ध भगवान कपिलवस्तू येथे निग्रोधारामात राहत होता. तेव्हा महाप्रजपती गौतमी भगवंताजवळ येऊन म्हणाली, “भदन्त, बायकांना आपल्या संप्रदायात प्रव्रज्या घेण्यास परवानगी द्या.” भगवंताने ती विनंती तीनदा नाकारली आणि बर्‍याच शाक्य स्त्रियांना बरोबर घेऊन भगवंताच्या मागोमाग वैशालीला आली. प्रवासाने तिचे पाय सुजले होते, अंग धुळीने माखले होते आणि तिच्या चेहर्‍यावर उदासीनता पसरली होती. आनंदाने तिला पाहून तिच्या उदासीनतेचे कारण विचारले. “स्त्रियांना बौद्ध संप्रदायात प्रव्रज्या घेण्यास भगवान परवानगी देत नाही. म्हणून मी उदासीन झाले,” असे गौमती म्हणाली. तिला तेथेच राहण्यास सांगून आनंद भगवंतापाशी गेला, आणि स्त्रियांस प्रव्रज्या घेण्यास परवानगी द्यावी, अशी त्याने भगवंताला विनंती केली. भगवंताने ती गोष्ट नाकारली, तेव्हा आनंद म्हणाला, “भदन्त, तथागताने निवेदिलेल्या धर्मसंप्रदायात भिक्षुणी होऊन एखाद्या स्त्रियेला स्रोतआपत्तिफल, सकृदागामिल, अनागामिफल आणि अर्हत्फल* प्राप्त करून घेणे शक्य आहे की नाही?” भगवंताने ‘शक्य आहे’ असे उत्तर दिल्यावर आनंद म्हणाला, “असे जर आहे, तर ज्या मावशीने भगवंताला आईच्या अभावी दूध पाजून लहानाचे मोठे केले तिच्या विनंतीवरून भगवंताने स्त्रियांना प्रव्रज्या द्यावी.”

भगवान म्हणाला, “जर महाप्रजापती गोमती आठ जबाबदारीचे नियम (अट्ठगरुधम्मा) पत्करील तर स्त्रियांना प्रव्रज्या घेण्यास मी परवानगी देतो. (१) भिक्षुणी संघात किती वर्षे राहिलेली असो, तिने लहान मोठ्या सर्व भिक्षूंना नमस्कार केला पाहिजे. (२) ज्या काही भिक्षु नसतील त्या गावी भिक्षुणीने राहत कामा नये. (३) दर पंधरवड्यास उपोसथ कोणत्या दिवशी व धर्मोपदेश ऐकण्यास कधी यावे, या दोन गोष्टी भिक्षुणीने भिक्षुसंघाला विचाराव्या. (४) चातुर्मासानंतर भिक्षुणीने भिक्षुसंघाची व भिक्षुणीसंघाची प्रवारणा* केली पाहिजे. (५) ज्या भिक्षुणीकडून संघादिशेष आपत्ति घडली असेल, तिने दोन्ही संघाकडून पंधरा दिवसांचे मानत्ता घेतले पाहिजे. (६) दोन वर्षे अभ्यास केला असेल, अशा श्रामणेरीला दोन्ही संघानी उपसंपदा दिली पाहिजे. (७) कोणत्याही कारणास्तव भिक्षुणीने भिक्षूला शिवीगाळ करता कामा नये. (८) भिक्षुणीने भिक्षूला उरपदेश करता कामा नये; भिक्षूने भिक्षुणीला उपदेश करावा.” आनंदाने ते आठ नियम महाप्रजापती गोतमीला कळविले आणि तिला ते पसंत पडले. येथवर ही कथा अंगुत्तरनिकायाच्या अट्ठकनिपातातही आढळते आणि त्यानंतर भगवान आनंदाला म्हणतो, “हे आनंद, जर स्त्रीला या धर्मविनयात प्रव्रज्या मिळाली नसती तर हा धर्म (ब्रह्मचर्य) एक हजार वर्षे टिकला असता. ज्या अर्थी आता स्त्रीला संन्यासाचा अधिकार देण्यात आला, त्या अर्थी हा सद्धर्म पाचशे वर्षेच टिकेल.” याप्रमाणे विनय आणि अंगुत्तरनिकाय यांचा मेळ आहे, तरी देखील हे आठ गुरुधर्म मागाहून रचले असे म्हणावे लागते; का की, विनयाचे नियम घालून देण्याची जी भगवंताची पद्धति होती, तिचा या नियमांशी उघड विरोध आहे.

बुद्ध भगवान वेरंजा गावाजवळ राहत होता. त्या काळी वेरंजा गावाच्या आसपास दुष्काळ पडल्यामुळे भिक्षूंचे फार हाल होऊ लागले. तेव्हा सारिपुत्ताने भगवंताला विनंती केली की, भिक्षूंना आचारविचारासंबंधी नियम घालून द्यावे. भगवान म्हणाला, “सारिपुत्ता, तू दम धर. नियम घालून देण्याचा प्रसंग कोणता ते तथागतालाच माहीत आहे. संघात जोपर्यंत पापचार शिरले नाहीत, तोपर्यंत तथागत तन्निवारक नियम घालून देत नसतो.” या बुद्धाच्या वचनानुसार सर्व नियमांची रचना केली आहे. प्रथमत: एखादा भिक्षु काही तरी गुन्हा किंवा चूक करतो. ती गोष्ट बुद्धाच्या कानी आल्यावर भिक्षुसंघ जमवून भगवान एखादा नियम घालून देतो आणि त्या नियमचा अर्थ बरोबर करण्यात येत नाही, असा अनुभव आला तर त्यात पुढे सुधारणा करतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल