इन्द्राचा स्वभाव

सप्तसिंधूवर स्वामित्व स्थापन करणारा सेनापति इन्द्र मनुष्य होता याला पुरावा ऋग्वेदात भरपूर सापडतो. त्याच्या स्वभावाचे थोडेसे दिग्दर्शन कौषीतकि उपनिषदात आढळते. ते येणेप्रमाणे.

दिवोदासाचा पुत्र प्रतर्दन युद्ध करून आणि पराक्रम दाखवून इन्द्राच्या आवडत्या वाङ्मयात गेला त्याला इन्द्र म्हणाला, `हे प्रतर्दना, तुला मी वर देतो.’ प्रतर्दन म्हणाला, `जो मनुष्याला कल्याणकारक होईल असा वर दे.’ इन्द्र- `वर दुसर्‍यांकरिता घेत नसतात, स्वत:साठी वर मागून घे.’  प्रतर्दन-- `माझ्यासाठी मला वर नको.’ तेव्हा इन्द्राने सत्य गोष्ट होती, ती सांगितली. कारण इन्द्र सत्य आहे. तो म्हणाला, `मला जाण. तेच मनुष्याला हितकारक आहे, की जेणेकरून मला तो जाणेल. त्वष्ट्याच्या मुलाला- त्रिशीर्षाला- मी ठार मारले. अरुर्मग नावाच्या यतींना कुत्र्यांकडून खाववले. पुष्कळ तहांचे अतिक्रमण करून दिव्यलोकी प्रल्हादाच्या अनुयायांना, अंतरिक्षात पौलोमांना आणि पृथ्वीवर कालकाश्यांना मी ठार मारले. त्या प्रसंगी माझा एक लोम देखील वाकला नाही. अशा प्रकारे जो मला ओळखील, त्याने मातृवध पितृवध, चौर्य, भ्रूणहत्या इत्यादि पापे केली असता किंवा तो करीत असता त्याला दिक्कत वाटणार नाही, किंवा त्याच्या तोंडाचा नूर पालटणार नाही.’

आपले साम्राज्य स्थापण्याच्या वेळी इन्द्राने ह्या उतार्‍यात दिलेले बरेच अत्याचार केल्याचा निर्देश खुद्द ऋग्वेदातच आढळतो. पण इन्द्रच का, कोणत्याही मनुष्याला साम्राज्य स्थापावयाचे असल्यास आपपरभाव, दयामाया ठेवता येत नाही. तह मोडण्याचे भय बाळगता येत नाही. शिवाजीने चन्द्रराव मोर्‍यांना ठार मारले, ते न्याय्य होते की अन्याय्य होते, हे वाद निरर्थक आहेत. न्यायान्यायाचा विचार करीत बसला असता, तर शिवाजी साम्राज्य स्थापू शकला नसता. साम्राज्यान्तर्गंत लोक देखील असल्या पापपुण्यांचा विचार करीत बसत नाहीत. ते एवढेच पाहतात की, एकंदरीत या साम्राज्याच्या स्थापनेपासून सामान्य जनतेचा फायदा झाला आहे की काय?

आर्यांच्या सत्तेपासून फायदे

ह्या दृष्टीने विचार केला असता इन्द्राच्या किंवा आर्यांच्या साम्राज्यापासून सप्तसिंधुतील जनतेचा फार मोठा फायदा झाला असला पाहिजे. लहान लहान शहराशहरांमधून जी वारंवार युद्धे होत असत, ती बंद पडल्यामुळे लोकांना एक प्रकारचे सुखस्वास्थ्य मिळाले. पेशव्यांच्याच नातलगांनी शनवार वाड्यावर इंग्रजांचा झेंडा लावला; आणि पेशवाई बुडाल्यावर इतर हिंदूंनी तर मोठाच उत्सव केला म्हणतात. त्याचप्रमाणे वृत्त जरी ब्राह्मण होता तरी त्याला मारून सप्तसिंधुंतील अंत:कलह बंद पाडल्याबद्दल इन्द्राचे देव्हारे तेथील प्रजेने माजविणे अगदी साहजिक होते. तेव्हा दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षापासून जे काही सुपरिणाम घडून आले, त्यातला पहिला हा समजला पाहिजे की, सप्तसिंधुमध्ये एक प्रकारची शांतता नांदू लागली. दुसरी गोष्ट ब्राह्मणांचे जे वर्चस्व राजकारणात होते ते नष्ट झाले. इन्द्राने त्वष्ट्याच्या मुलाला- विश्वरुपाला- पुरोहितपद दिले आणि तो बंड करील या भयाने त्यालाही ठार मारले, असा उल्लेख खुद्द ऋग्वेदात आणि यजुर्वेदात सापडतो. (हिंदी संस्कृति आणि अहिंसा, प-. १९-२० पाहा.) तथापि पुरोहिताची पदवी कोणत्या ना कोणत्या ब्राह्मणाकडे राहिली. राजकारणापासून अलिप्त राहिल्यामुळे ब्राह्मण समाजाला वाङ्मयाची अभिवृद्धि करता आली.

वैदिक भाषा

दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षाने एक नवीन भाषा उत्पन्न झाली. हीच वैदिक भाषा होय. मुसलमानांच्या आणि हिंदूंच्या संघर्षाने जशी हिंदुस्थानात उर्दू नावाची नवीन भाषा उत्पन्न झाली, तशी ही भाषा होती. पण वैदिक भाषेइतके उच्च स्थान उर्दूला कधीही मिळाले नाही आणि मिळण्याचा संभव नाही. वैदिक भाषा निव्वळ देववाणी होऊन बसली!

या वैदिक भाषेचा नीट अर्थ लावावयाचा असल्यास बाबिलोनियन भाषांच्या ज्ञानाची फार आवश्यकता आहे. काही मूळच्या शब्दांचे अर्थ कसे उलटले आहेत हे दास आणि आर्य या दोन शब्दांवरून दिसून येते. दास शब्दाचा मूळचा अर्थ दाता असून सध्या गुलाम असा होऊन बसला आहे; आणि आर्य शब्दाचा मूळचा अर्थ फिरस्ता असता थोर, उदार, श्रेष्ठ असा झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल