परंतु महाप्रजापती गोतमीच्या बाबतीत या पद्धतीचा अंगीकार केलेला नाही. भिक्षुणीसंघात काही एक दोष घडून आले नसता आरंभीच भिक्षुणीवर हे आठ नियम लादण्यात यावे, हे विलक्षण दिसते; आणि भिक्षुसंघाने आपल्या हाती सर्व सत्ता ठेवण्यासाठी मागाहून हे नियम रचून विनयात  अंगुत्तरनिकायात दाखल केले. असे अनुमान करता येते.

विनयपिटकपेक्षा सुत्तपिटक प्राचीनतर आहे. तथापि त्यात काही सुत्ते मागाहून दाखल करण्यात आली आणि त्यापैकी हे एक असावे असे वाटते. इसवी सनपूर्वी पहिल्या किंवा दुसर्‍या शतकात जेव्हा महायान पंथाचा जारीने प्रसार होऊ लागला, अशा वेळी ते लिहिले असावे. त्यात सद्धर्म म्हणजे स्थविरवादी पंथ भिक्षुणीसंघाच्या स्थापनेमुळे पाचशे वर्षे टिकेल आणि नंतर जिकडे तिकडे महायान संप्रदायाचा प्रसार होईल, असा ह्या सुत्तकर्त्याचा भविष्यवाद असावा हे सुत्त भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणांतर पाचशे वर्षांनी लिहिले, असे या भविष्यावरूनच सिद्ध होते.

भारतवर्षात पहिला भिक्षुणीसंघ बुद्धानेच स्थापन केला असता, तर कदाचित या आठ गुरूधर्मची अल्पस्वल्प प्रमाणात इतिहसात गणना करता येणे शक्य होते. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. जैन आणि इतर संप्रदाय बौद्ध संप्रदायापेक्षा एक दोन शतकापूर्वी अस्तित्वात आले होते आणि त्या संप्रदायात भिक्षुणीचे मोठमोठाले संघ असून त्यापैकी काही भिक्षुणी हुशार व विद्रुपी होत्या, अशी माहिती पालि वाङमयात बर्‍याच ठिकाणी सापडते. त्याच धर्तीवर बुद्धाचा भिक्षुणीसंघ स्थापन करण्यात आला. गणसत्ताक राज्यात, आणि ज्या देशात एकसत्ताक राज्यपद्धति उदयास आली होती तेथे देखील, स्त्रियांचा मान चांगलाच ठेवण्यात येत असे. त्यामुळे भिक्षुणीसंघाच्या रक्षणासाठी विचित्र नियम करण्याची मुळीच गरज नव्हती. अशोक कालानंतर ही परिस्थिती पालटली. या देशावर यवन आणि शक लोकांच्या स्वार्‍या होऊ लागल्या आणि उत्तरोत्तर बायकांना दर्जा अगदी खालचा ठरून समाजात त्यांचा मान राहिला नाही. त्या काळी भिक्षुणीसंबंधाने अशा प्रकारचे नियम अस्तित्वात आले तर त्यात नवल कोणते?

राहुल श्रामणेर

भिक्षुसंघ आणि भिक्षुणीसंघ स्थापन झाल्यावर त्यात श्रामणेर आणि श्रामणेरी दाखल करून घ्याव्या लागल्या. प्रथमत: बुद्ध भगवंताने राहुलाला श्रामणेर करून घेतल्याची कथा महावग्गात आली आहे. ती अशी :--

भगवान काही काळ राजगृहात राहून कपिलवस्तूला आला. तेथे तो निग्रोधारामात राहत असे. एके दिवशी भगवान शुद्धोदनाच्या घराजवळून भिक्षाटन करीत असता राहुलमातेने त्याला पाहिले. तेव्हा ती राहुलाला म्हणाली, “वा राहुला, हा तुझा पिता आहे. त्याच्याजवळ जाऊन आपला दायभाग माग.” मातेचे वचन ऐकून राहुल भगवंतापुढे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, “श्रमणा तुझी सावली सुखकर आहे.” भगवान तेथून चालता झाला. राहुल त्याच्या मागोमाग, माझा दायभाग द्या, असे म्हणत गेला. विहारात गेल्यावर आपले दायाद्य राहुलाला देण्याच्या उद्देशाने सारिपुत्ताला बोलावून भगवंताने राहुलाला श्रामणेर करविले. ती गोष्ट शुद्धोदनला आवडली नाही. लहान मुलांना प्रव्रज्या दिली असता त्यांच्या पालकांना दु:ख कसे होते हे सांगून त्याने भगवंताला असा नियम करावया लावला की, अल्पवयी माणसाला प्रव्रज्जा देऊ नये.

ही कथा ऐतिहासिक कसोटीला टिकत नाही. एक तर शुद्धोदन शाक्य कपिलवस्तूमध्ये राहत नव्हता. दुसरे, निग्रोधाराम बुद्धाच्या उतारवयात बांधण्यात आला आणि त्या वेळी राहुल अल्पवयी नव्हता. तेव्हा ही गोष्ट पुष्कळ शतकानंतर रचून महावग्गांत दाखल केली आहे, असे म्हणावे लागते.

बुद्ध भगवंताने राहुलाला श्रामणेरदीक्षा दिली, त्या वेळी त्याचे वय सात वर्षांचे होते, असे अम्बलटठिकराहुलोवाद सुत्ताच्या अट्ठकथेत म्हटले आहे आणि हीच समजूत बौद्ध लोकांत अद्यापिही प्रचलित आहे. बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाच्या दिवशी राहुलकुमार जन्मला, असे गृहीत धरले, तर तो श्रामणेरदीक्षेच्या वेळी सात वर्षांचा होता हे संभवत नाही. का की गृहत्यागानंतर बोधिसत्वाने सात वर्षे तपश्चर्या केली आणि तत्त्वबोध झाल्यावर पहिला चातुर्मास वाराणसीला घालविला, आणि त्यानंतर संघस्थापनेला एक वर्ष तरी लागले असले पाहिजे. तेव्हा राहुलकुमार श्रामणेरदीक्षेच्या वेळी सात वर्षांचा राहणे शक्यच नव्हते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel