- ३ -

अति सुखामुळें गौतम उदासीन झाले होते.  त्या सुखाचा त्यांना वीट आला होता.  आपल्या या उदासीनतेंतून अधिक उच्च व उदात्त असें सुख शोधण्यासाठीं ते उभे राहिले.  परिव्राजक यति व्हावयाचें त्यांनी ठरविलें.  सर्वसंगपरित्याग करून बाहेर पडण्याचें त्यांनीं ठरविलें.  चिंतनानें, उपवासानें मानवी भवितव्याचें कोडें सोडवतां येईल असें त्यांना वाटत होतें.

इतक्यांत आपल्याला मुलगा झाला आहे असें त्यांना कळलें.  नवीन एक बंधन निर्माण झालें.  परंतु तीं सारीं कोमल व प्रेमळ बंधनें निग्रहानें तोडण्याचें त्यांनीं नक्की केलें.  एके दिवशीं पुत्रजन्मानिमित्त मेजवानी होती.  बुध्दांच्या पित्यानें खास सोहळा मांडला होता.  आणि त्याच दिवशीं मध्यरात्रीं निघून जाण्यासाठीं बुध्दांनीं सिध्दता केली.  सारी मंडळी दमून भागून झोंपलेली होती.  बुध्द उठले.  पत्नीकडे त्यांनीं शेवटचें पाहिलें.  लहान बाळ तेथें आईच्या कुशींत होतें.  बुध्दांच्याच जीवनांतील जीवनानें तें सुंदर सोन्याचें भांडें भरलेलें होतें.  त्या मायलेकरांचें चुंबन घ्यावें असें त्यांना वाटलें.  परंतु तीं जागीं होतील या भीतीनें त्यांनीं तसें केलें नाहीं.  ते तेथून निघाले.  त्यांनीं आपल्या सारथ्याला दोन वेगवान् घोडे तयार करण्यास सांगितलें.  त्या घोड्यांवर बसून दोघे दूर गेले.  सर्व प्रेमळ बंधनें तोडण्यासाठीं त्यांना लांब जाणें भाग होतें.  जीवनाचें रहस्य शोधण्यासाठीं जो मार्ग त्यांना घ्यावयाचा होता तो मार्ग अनंत होता.  पाठीमागें एकदांहि वळून न पहातां सकाळ होईपर्यंत ते खूप दूर गेले.

आतां उजाडलें होतें.  आपल्या पित्याच्या राज्याच्या सीमांच्या बाहेर ते होते, एका नदीतीरीं ते थांबले.  बुध्द घोड्यावरून उतरले.  त्यांनीं आपले ते लांब सुंदर केस कापून टाकले.  अंगावरचे रत्नालंकार त्यांनीं काढले.  ते छन्नाला म्हणाले, ''हा घोडा, ही तरवार, हीं हिरेमाणकें, हें सारें परत घेऊन जा.'' छन्न माघारा गेला.  बुध्द आतां एकटे होते.  ते पर्वतावर गेले.  तेथील गुहांतून ॠषी-मुनी जीवन-मरणाच्या गूढाचा विचार करीत रहात असत.

वाटेंत स्वत:चीं वस्त्रेंहि एका भिकार्‍याजवळ त्यांनीं बदललीं.  त्यांच्या अंगावर आतां फाटक्या चिंध्या होत्या.  राजवैभवाचा त्यांना वीट आला होता.  ज्ञानशोधार्थ बुध्द आतां एकटे फिरूं लागले.

ते त्या ॠषीमुनींच्या सान्निध्यांत गेले. तेथील एका गुहेंत ते राहिले.  प्रत्यहीं ते खालच्या शहरांत जात.  हातांत भिक्षापत्र असे.  ते भिक्षा मागत.  पोटासाठीं अधिक कष्ट करण्याची जरूरी नव्हती.  तेथील आचार्यांच्या चरणांपाशीं बसून गौतम त्यांचीं प्रवचनें ऐकत.  जन्ममरणाच्या फेर्‍यांतून जीव कसा जात असतो आणि शेवटीं हा जीव अत्यंत मधुर अशा शांत निर्वाणाप्रत कसा जातो तें सारें ते ऐकत.  जीवन मालवणें हें अंतिम ध्येय.  तें ध्येय प्राप्त व्हावें म्हणून शरीराला अन्न-पाणी देऊं नये, शरीर-दंडनानें स्वर्गप्राप्ति होते, असें त्या ॠषीमुनींचें मत होतें.  जणूं शरीरदंडनाच्या जादूनें सर्व सिध्दी मिळतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel