त्याची प्रकृति यथातथाच होती. दुबळ्या प्रकृतीच्या जोडीला तिखट जिभेची आणखी एक अडचण असल्यामुळें त्याला नेहमीं त्रास होई. एकदां तो म्हणाला, ''जें वाटतें तें स्पष्टपणें बोलणें हा माझा धंदा आहे.'' तत्त्वज्ञानक्षेत्रांतच त्याचे विचार होते तोंपर्यंत सारें ठीक होतें; पण माणसांविषयीं आपणास काय वाटतें हें तो सांगूं लागला व विशेषत: सरदार-जमीनदारांविषयीं लिहूं लागला तेव्हां भानगडी सुरू झाल्या, त्रास होऊं लागला. एकदां त्यानें लिहिलेलें एक तिखट व झणझणीत वाक्य चेव्हेलियर डी रोहन याला झोंबलें; त्याचा अहंकार दुखावला गेला. त्यानें कांहीं गुडांना व्हॉल्टेअरला चांगलें चोपून काढावयास सांगितलें. दुसर्‍या दिवशीं व्हॉल्टेअरनें त्या सरदाराला द्वंद्वयुध्दचें आव्हान दिलें. व्हॉल्टेअरची तलवारहि त्याच्या जिभेप्रमाणेंच तिखट असेल असें त्या बड्या सरदाराला वाटलें, म्हणून त्यानें पोलिसांच्या मुख्याकडे संरक्षण मागितलें. पोलिस-अधिकारी त्याचा चुलतभाऊ होता. व्हॉल्टेअर याला पुन : बॅस्टिलच्या तुरुंगांत अडकविण्यांत आलें. त्याची मुक्तता होतांच त्याला फ्रान्समधून निर्वासित करण्यांत आलें.

तो इंग्लंडमध्यें गेला. या वेळीं त्याचें वय बत्तीस वर्षांचे होतें. तो तेथें तीन वर्षे राहिला. त्याचें मन देशकालातीत होतें. इंग्लंडमध्येंहि त्याला घरच्यासारखेंच वाटलें. तो इंग्रजी भाषा चांगलीच शिकला. एका वर्षांत त्यानें शेक्सपिअरखेरीज बाकी सारें साहित्य आत्मसात् केलें. पण शेक्सपिअर हें इंग्लंडचें सर्वोत्कृष्ट फळ होतें. शेक्सपिअरची मनोबुध्दि हा आनंदी तत्त्वज्ञानी समजूं शकला नाहीं. इंग्लंडांतल्याहि मोठमोठ्या तत्त्वज्ञान्यांना उत्कृष्ट फ्रेंच मनोबुध्दि समजूं शकत नसे. व्हॉल्टेअर शेक्सपिअरला जंगली म्हणत असे आणि पुढें शंभर वर्षांनीं कार्लाइलनें व्हॉल्टेअरला जंगली म्हणून त्याचा सूड घेतला. पण भूतकाळांतला महाबुध्दिमान् शेक्सपिअर जरी व्हॉल्टेअरला जाणतां आला नाहीं तरी समकालीन इंग्रजांत त्याला बरेचसे अनुकूल मनोबुध्दीचे लोक भेटले. इंग्रजांचें विचारधैर्य पाहून त्याला आश्चर्य वाटे. इंग्रज लोक आपले विचार धैर्यानें मांडतात हें पाहून तो त्यांचे कौतुक करी. क्वेकरांशीं त्याचा चांगला परिचय झाला. त्यांचीं शांतिमय मतें त्याला लगेच पटलीं. तोहि म्हणाला कीं, समुद्र ओलांडून आपल्याच बंधूंचे गळे कापावयाला जाणें हा केवळ मूर्खपणा होय. ''गाढवाच्या कातड्यावर दोन काठ्या मारून आवाज होतो'' आणि सारे मारामारीला धांवतात. स्विपत्रटची व त्याची भेट झाली. त्या शतकांतले सर्वांत मोठे असे दोन उपहासलेखक एकत्र बसले, बोलले. खरोखरच तो प्रसंग देवांना सुध्दं मोठ्या मेजवानीचा वाटला असता. व्हॉल्टेअरची ''छोटामोठा'' ही मनोरम कथा 'गलिव्हर्स ट्रॅव्हल्स' पासूनच स्फूर्ति मिळून लिहिली गेली असावी. स्विपत्रटच्या उपहासांतील तिखटपणाइतका तिखटपणा व्हॉल्टेअरमध्यें नसे. व्हॉल्टेटरची लेखणी गुदगुल्या करी, स्विपत्रटची लेखणी भोंसकी. पण व्हॉल्टेअरची प्रतिभा अधिक समृध्द व श्रीमंत होती. छोटामोठा-मायग्नोमेगस हा सिरियल बेटाचा रहिवासी होता. तो पांच लक्ष पूच्ट उंच होता. त्याला शनीवरचा एक अंगदींच लहान, केवळ पंधराच हजार फूट उंच गृहस्थ भेटतो. उभयतां अनंत अवकाशांतून भ्रमन्ती करण्यासाठीं बाहेर पडतात. सॅटर्नियनचें (शनीवरील गृहस्थाचें) लग्न नुकतेंच झालेलें असतें. त्याची पत्नी त्याला जाऊं देत नाहीं. कारण त्यांनीं केवळ दोनशेंच वर्षे मधुचंद्र भोगलेला होता ! इतक्या लवकर ताटातूट ! पण सॅटर्नियन तिचें समाधान करतो व म्हणतो, ''रडूं नको. मी लवकरच परत येईन.'' दोघे मित्र धूमकेतूच्या शेपटीवर बसून विश्वसंचारास निघतात. ते तार्‍यांमधून जात असतात. संचार करतां करतां ते पृथ्वी नांवाच्या एका लहानशा ढिपळावर उतरतात. भूमध्यसमुद्र म्हणजे त्यांना गंमत वाटते. ते त्यांतुन गप्पा मारीत मारीत चालत जातात. त्यांना वाटेंत एक गलबत भेटतें. त्या गलबतावर ध्रुवाची सफर करून आलेले कांहीं तत्त्वज्ञानी असतात. सिरियनला तें गलबत इतकें लहान वाटतें कीं, दुर्बिणीशिवाय तें त्याला दिसत नाहीं. तो तें गलबत उचलून आपल्या बोटाच्या नखावर त्याचें नीट परीक्षण करण्यासाठीं ठेवतो; पण त्या गलबतांत सजीव अणूपरमाणू पाहून त्याला आश्चर्य वाटतें. हे अणू त्याच्याशीं बोलतात व त्याला म्हणतात, ''आम्ही लहान असलों तरी आमच्यांत अमर आत्मा आहे.'' हें ऐकून त्या पांच लक्ष पूच्ट उंच माणसास व त्याच्या मित्रास अधिकच आश्चर्य वाटतें. ते सजीव अणू आणखी सांगतात, ''आम्ही ईश्वराची प्रतिकृति आहों, विश्वाचे मध्यबिंदू आहों.'' ते अधिकच आश्चर्यचकित होतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel