''स्वत:ला समजून घ्या.''  हें त्याच्या तत्त्वज्ञानाचें सार आहे.  सॉक्रे़टीस म्हणे, ''ज्ञान म्हणजे सद्‍गुण.'' लोक दुष्टपणामुळें चुका करतात असें नव्हे, तर ते अडाणी असतात.  गुन्हेगार हा मूर्ख तरी असतो किंवा माथेफिरू तरी असतो.  परंतु दोन्ही प्रकारच्या गुन्हेगारांना आपण काय करतों तें कळत नसतें.

तत्त्वज्ञान्याचें मुख्य कर्तव्य ज्ञान कसें मिळवावें, शहाणें कसें व्हावें, हें शिकवणें हें होय.  सॉक्रे़टिसानें लोकांना शहाणें करण्याचें, त्यांना शिकवण्याचें व्रत आमरण चालविलें.  लोकांस आवडो वा नावडो, तो त्यांना शिकवीत राही.  तो गमतीनें एकदां म्हणाला, ''मी सुईण आहें.  लोकांच्या मनांत जे विचार असतात, त्यांच्या पोटांत ज्या गोष्टी असतात, त्या नीट सहजपणें बाहेर पडाव्या यासाठीं मी लोकांना मदत करीत असतों.''

परंतु दुसर्‍यानें आपणांस शिकवावें, आपणांस सुचवावें, हें कोणासच आवडत नसतें.  विचार करणें ही गोष्ट सुखाची नाहीं.  विचारप्रसूति वेदनांशिवाय नाहीं.  म्हणून पुष्कळ जण विचार करणेंच टाळतात.  कशाला त्रास असें ते म्हणतात.  तसेंच रस्त्यांत किंवा सार्वजनिक जागीं आपल्या अज्ञानाचें सर्वांसमोर प्रदर्शन व्हावें, चारचौघांत आपल्या मूर्खपणाची शोभा व्हावी ही गोष्ट कोणास रुचणार ? ज्यांचा मूर्खपणा तो प्रकट करी ते त्याला विदूषक म्हणत.  कधीं कधीं ते त्याला मारहाण सुध्दां करीत.  त्याच्या अंगावर हात टाकीत.  परंतु सॉक्रे़टीस कधीं रागावत नसे.  तो स्वत:चा विनोदी स्वभाव गमावून बसत नसे.

तो रस्त्यांतच माणसांना थांबवी व गोंधळून टाकणारे प्रश्न त्यांना विचारी.  यामुळें पुष्कळ जण त्याचे शत्रू बनले.  विशेषत: राजकारणी लोकांचा मूर्खपणा चव्हाट्यावर आणण्यांत त्याला फार आनंद वाटे.  ह्या मुत्सद्दयांना व राजकारणपटूंना चांगल्या राज्यकारभाराचें काडीइतकेंहि ज्ञान नाहीं असें तो सभोंवतीं असणार्‍या लोकांना दाखवून देई आणि नंतर त्या मुत्सद्दयांना म्हणे, ''तुम्हांला कांही कळत नाहीं तर राज्यकारभार कशाला चालवतां ? चांभारानें गलबत चालवूं पाहण्याप्रमाणें हा अव्यापारेषु व्यापार आहे.''

शहरांतील तरुणांमध्यें त्यानें बौध्दिक जिज्ञासा निर्माण केली.  नवीन नवीन विचार त्यांच्या डोक्यांत त्यानें भरले.  आणि तरुण मुलें हे नवीन विचार घेऊन घरीं येत व आपल्या आईबापांशीं त्या बाबतींत चर्चा करीत.  आपलीं पोरें आपणांपेक्षां शहाणीं होत चाललीं हें पाहून अडाणी आईबाप चिडत, रागावत.  सारे वृध्द शेवटीं सॉक्रे़टिसावर रागावले.  ते म्हणूं लागले, ''हा आमच्या मुलांना बिघडवीत आहे.''

आणि एके दिवशीं बाजारांतील प्रमुख ठिकाणी 'सॉक्रे़टिसावर अमुक अमुक आरोप आहेत' असें पत्रक लागलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel