एके दिवशी एक गलबत त्या बेटाच्या बाजूनें जात असतें. गलबतांत एका लग्नसमारंभाची मंडळी असते. ट्यूनिसहून ही मंडळी इटलीस परत येत होती. या मंडळींत राजा अलोन्सो व अ‍ॅन्टोनिओ हे असतात. यांनींच प्रॉस्पेरोला हद्दपार केलेलें असतें. राजाचा भाऊ सेबॅस्टियन व मुलगा फर्डिनंड हेहि त्यांच्याबरोबर असतात.

प्रॉस्पेरो आपल्या मंत्रसामर्थ्यानें समुद्रावर एक वादळ उठवितो. तें गलबत वादळांतून जात असतां या मंतरलेल्या बेटाला येऊन लागतें. प्रॉस्पेरो एरियलला सर्व उतारूंना वांचवावयास सांगतो, पण वांचविल्यावर त्यांना बेटावर चारी दिशांस अलग अलग करावयाची सूचना देतो. फर्डिनंड बापापासून वियुक्त होतो व बाप मेला असें वाटून शून्य मनानें भटकत भटकत प्रॉस्पेरोच्या गुहेकडे येतो. वस्तुत: तो तिकडे जादूमुळें खेंचला गेलेला असतो. मिरान्दाची व त्याची तेथें दृष्टिभेट होऊन दोघांचें परस्परांवर प्रेम जडतें. एक शब्दहि उच्चारला जाण्यापूर्वी हृदयें दिलीं-घेतलीं जातात.

पण बेटाच्या दुसर्‍या एका भागावर सेबॅस्टियन व अ‍ॅन्टोनिओ राजाचा खून करण्याचें कारस्थान करीत असतात; तर कॅलिबन व गलबतांतून आलेले कांहीं दारुडे खलाशी प्रॉस्पेरोचा खून करूं पाहतात; हें बेट मंतरलेलें असल्यांचें त्यांना माहीत नसतें. हे पाहुणे ज्या जगांतून आलेले असतात त्या जगांतील अनीतिविषयक प्रचार व मूर्खपणा येथेंहि करूं लागतात, तेव्हां सर्वज्ञ व सर्वशक्तिमान् प्रॉस्पेरो त्यांचे सारे रानवट बेत हाणून पाडतो. राजाला व त्याच्याबरोबरच्या लोकांना त्यांनीं केलेल्या अन्यायांबद्दल शासन करावें असें प्रॉस्पेरोला प्रथम वाटतें; पण एरियल दैवी विचारांचा असल्यामुळें तो प्रॉस्पेरोस अधिक थोर दृष्टि देतो व सांगतो, ''राजा, त्याचा भाऊ आणि तुझा भाऊ सारेच दु:खी व त्रस्त आहेत. त्यांच्या दु:खाचा पेला कांठोकांठ भरलेला आहे. त्यांना काय करावें हें समजेनासें झालें आहे. तुझ्या जादूचा त्यांच्यावर फार परिणाम झाला आहे. तूं त्यांना पाहशील तर तुझेंहि हृदय विरघळेल, तुझ्या भावना अधिक कोमल होतील.'' यावर प्रॉस्पेरो विचारतो, ''विद्याधरा, तुला खरेंच का असें वाटतें ?'' एरियल उत्तर देतो, ''मी मनुष्य असतों तर माझें हृदय विरघळलें असतें, माझ्या भावना कोमल झाल्या असत्या.'' तेव्हां प्रॉस्पेरो म्हणतो, ''तूं अतिमानुष आहेस, जणूं वायुरुप आहेस, तरीहि जर तुला त्यांच्याविषयीं इतकी सहानुभूति वाटते, तर मग मी मानव असल्यामुळें, त्यांच्याच जातीचा असल्यामुळें, मला कां बरें वाटणार नाहीं ? त्यांच्याप्रमाणेंच मीहि सुखदु:खें भोगतों, मलाहि वासनाविकार आहेत. मग मला माझ्या मानवबंधूंविषयीं तुला वाटतात त्यापेक्षां अधिक प्रेम व दया नकोत का वाटावयाला ? त्यांनीं केलेले दुष्ट अन्याय आठवून माझें हृदय जरी प्रक्षुब्ध होतें, तरी माझ्यांतल्या दैवी भागानें, उदात्त भावनेनें मी आपला क्रोध जिंकीन व दैवी भागाशींच एकरुप होईन. एरियल, जा. त्यांना मुक्त कर.''

टिमॉननें सीनेटरांजवळ काढलेले उद्गार व प्रॉस्टेरोचे हे एरियलजवळचे उद्गार यांची तुलना करा, म्हणजे मानवी अन्यायाकडे मानवी दृष्टीनें पाहणें व अतिमानुष दृष्टीनें पाहणें यांतील फरक लक्षांत येईल.

प्रॉस्पेरो अतिमानुष आहे. शेक्सपिअरनें किंवा सृष्टीनें निर्मिलेला अत्यंत निर्दोष व सर्वांगपरिपूर्ण असा मानवी स्वभावाचा नमुना म्हणजे प्रॉस्पेरो. हा शेक्सपिअरच्या सृष्टींतील कन्फ्यूशियस होय. हृदयांत अपरंपार करुणा व सहानुभूति असल्यामुळें नव्हे तर त्याची बुध्दि त्याला 'क्षमा करणें चांगलें' असें सांगते म्हणून तो क्षमा करतो. ज्या जगांत राहणें प्रॉस्पेरोस प्राप्त होतें, त्या जगांत भांडणें व द्वेषमत्सर, महत्त्वाकांक्षा व वासना-विकार, फसवणुकी अन्याय, वंचना व स्पर्धा, पश्चात्ताप व सूड, यांचा सर्वत्र सुळसुळाट आहे ! पण प्रॉस्पेरोचें मन या जगांतून अधिक उंच पातळीवर जाऊन, या क्षुद्र धुळीपलीकडे जाऊन, विचार करूं लागतें. तो जीवनाची कठोरपणें निंदा करीत नाहीं. तो स्मित करतो व जरासा दु:खी असा साक्षी होऊनच जणूं राहतो ! त्या मंतरलेल्या बेटावर मिरांदाला आपल्या पित्याहून वेगळीं आणखीं माणसें दिसतात तेव्हां ती आश्चर्यचकित होते. पिता वगळल्यास अन्य मानवप्राणी तिनें आतांपर्यंत पाहिला नव्हता. नवीन माणसें दिसतांच ती एकदम उद्गारते, ''काय आनंद ! अहो, केवढें आश्चर्य ! किती सुंदर ही मानवजात ! किती सुंदर व उमदें हें जग, ज्यांत अशीं सुंदर माणसें राहतात !''  पण प्रॉस्पेरो मुलीचा उत्साह व आनंद पाहून उत्तर देतो, ''तुला हें जग नवीन दिसत असल्यामुळें असें वाटत आहे !''  अनुभवानें त्याला माहीत झालेलें असतें कीं, या जगांतील प्रत्येक प्राणी जन्मजात सैतान आहे. या सैतानांना कितीहि उपदेश केला तरी तो 'पालथ्या घड्यावर पाणी' या न्यायानें फुकटच जातो. त्याचा कोणाहि माणसावर विश्वास नसतो, तरी तो सर्वांवर प्रेम करतो.

शेक्सपिअरनें निर्मिलेल्या पात्रांपैकीं प्रॉस्पेरो हें सर्वोत्कृष्ट आहे येवढेंच नव्हे, तर खुद्द शेक्सपिअरच जणूं परमोच्च स्थितींतील प्रॉस्पेरोच्या रूपानें अवतरला आहेसें वाटतें. प्रॉस्पेरोप्रमाणेंच खुद्द शेक्सपिअरहि एक जादूगारच आहे. त्यानें आपल्या जादूनें या जगांत पर्‍या, यक्ष, गंधर्व, किन्नर इ० नाना प्रकार निर्मिले आहेत; भुतखेतें, माणसें वगैरे सर्व कांहीं त्यानें निर्मिलें आहे. त्यानें आपल्या जादूनें मध्यान्हींच्या सूर्याला मंद केलें आहे, तुफानी वार्‍यांना हांक मारली आहे, खालचा निळा समुद्र व वरचें निळें आकाश यांच्या दरम्यान महायुध्द पेटवून ठेवलें आहे; पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वत्र रणांगणं पेटवून ठेवलें आहे. शेक्सपिअरचा हुकूम होतांच आत्मे जागृत होऊन थडग्यांतून बाहेर पडतात, थडग्यांचीं दारें उघडतात ! महान् जादूगार !

सर्जनाची परमोच्च स्थिति अनुभवून प्रॉस्पेरोप्रमाणेंच शेक्सपिअरहि मग आपली जादू गुंडाळून ठेवतो; टेंपेस्टमध्यें परमोच्च कला प्रकटवून तो आपली जादूची कांडी मोडून टाकतो व आपली जादूची पोतडी गुंडाळून ठेवून नाट्यसृष्टीची रजा घेतो. मथ्थड डोक्यांच्या मानवांना उपदेश पाजून, त्यांचीं टिंगल करून, त्यांचा उपहास करून दमल्यावर आतां तो केवळ कौतुकापुरता साक्षी म्हणून दुरून गंमत पाहत राहतो.

शेक्सपिअर अज्ञातच मेला ! त्याची अगाध बुध्दिमत्ता, त्याची अद्वितीय प्रतिभा जगाला कळल्या नाहींत; पण जगाच्या स्तुतीची त्याला तरी कोठें पर्वा होती ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel