रोमन सीनेटर गर्भगळित झाले.  सक्तिची सैन्यभरती करून त्यांनीं दुसरी सेना उभारली व कार्थेजियनांचा लोंढा थांबविण्यासाठीं ती पाठविली.  रोमपासून थोड्या मैलांवर कॅन्नी येथें उभय सेनांची गांठ पडली व रोमनांचा पुरा धुव्वा उडला !  सैन्य व अमलदार मिळून सत्तर हजार रोमन ठार झाले !

रोमन लोकांचा इतका मोठा पराभव क्वचितच झाला असेल.  रोमवर ही प्रचंड आपत्ति होती, हा प्रखर प्रहार होता.  हॅनिबॉल आज ना उद्यां रोमवर चालून येणार हें नक्की होतें.  विजेच्या गोळ्याप्रमाणें तो कोणत्याहि क्षणीं कडाडत गडाडत येईल असें पदोपदीं वाटे.  पण हॅनिबॉल चाल करून येईना तेव्हां सर्वांस आश्चर्य वाटलें.  तो रोम शहराकडे पाठ फिरवून दक्षिण इटलींत निघून गेला.  त्याच्या त्या विचित्र वर्तनाचें कारण त्या वेळीं कोणाच्या ध्यानात आलें नाहीं.  पण तें उघड होतें.  पराभवामुळें झालेल्या रोमनांच्या नुकसानाइतकेंच विजय झालेल्या कार्थेजियनांचेंहि नुकसान झालें होतें.  त्यांचें पुष्कळसें सैन्य ठार झालें होतें, त्यांची साधनसामग्री संपुष्टांत आली होती, शक्ति क्षीण झाली होती.  त्यांच्या विजयी आक्रमणाचा वेग अविश्रांतपणें सुरू होता.  त्यांनीं क्षणभरहि दम घेतला नसल्यामुळें त्यांना विश्रांतीची जरुरी होती.  रोमवर हल्ला करण्यासाठीं त्यांना ताजा पुरवठाहि हवा होता.  नवीं माणसें, नवीं यंत्रें, नवीं हत्यारें यांचीं त्यांना गरज होती.  म्हणून कार्थेजहून नवीन सैन्याचा व नवीन साधनसामग्रीचा पुरवठा येईपर्यंत वाट पाहण्याचें हॅनिबॉलनें ठरविलें.  तोपर्यंत इटलीच्या प्रांतांतून कार्थेजियनांचा प्रचार करीत तो हिंडणार होता.  त्यानें प्रचाराची स्वारी सुरू केली होती.

पण रोमनांनीं नवेच डावपेंच सुरू केल्यामुळें हॅनिबॉलच्या अडचणी वाढतच गेल्या.  क्विंटस फेबियस मॅक्झिमस हा रोमन सैन्याचा सेनापति होता.  त्याला त्याच्या देशबांधवांनीं ''वेळ घेणारा—दिरंगाई करणारा'' (कॅक्टेटर—डिलेअर) अशी पदवी दिली होती.  तो कधींहि त्वरित निर्णय घेत नसे.  निर्णय घेण्याचें काम तो नेहमी पुढें ढकली.  ज्या लढाया आज खेळावयाला हव्या त्या उद्यांवर ढकलणेंच अधिक बरें असतें अशी त्याची ठाम समजूत होती.  क्विंटस फेबियस हॅनिबॉलशीं लढाई देण्याची सारखी टाळाटाळ करीत होता.  त्यामुळें लवकर सोक्षमोक्ष होईना.  कार्थेजियन कंटाळूं लागले.  दिरंगाई व कालापव्यय यामुळें त्यांचें नीतिर्धर्य गळाठलें—खचलें.  लढून पराजय होता तरी पत्करता, पण ही न लढण्याची लढाई नको असें त्यांना होऊन गेलें.  ते शत्रूचा पाठलाग करूं पाहत होते.  पण शत्रु होता कोठें ? ते छायामय शत्रूचा पाठलाग करीत होते.  शत्रु सारखां झुकांड्या देत होता.  तो जवळ दिसे, पण क्षणांत दूर जाई. जिवंत शत्रूला कसें जिंकावें हें कार्थेजियन जाणत होते.  पण पोकळ हवेवर कसा विजय मिळवावा, छायामय शत्रूला कसें पराभूत करावें हें त्यांना समजेना.  रोमन शस्त्रास्त्रें जेथें निस्तेज व हतप्रभ ठरलीं, पराभूत झालीं, तेथेंच क्विंटस फेबियसचा हा नि:शस्त्र प्रतिकार प्रभावी व विजयी होत होता.

हॅनिबॉल कार्थेजहून येणार्‍या सैन्याची व वाहतुकीची वाट पाहत होता.  आपण लवकरच मदतीस येतों असा त्याचा भाऊ हस्द्रुबॉल याचा निरोप आला.  नीट सुसज्ज असें प्रचंड सैन्यच नव्हे तर रोमला वेढा घालण्यासाठीं जरूर तीं यंत्रेंहि घेऊन हस्द्रुबॉल येणार होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel