पित्यानें पुत्राला योग्य मार्गावर आणण्याची पुन: एकदां खटपट केली. त्याला स्ट्रासबर्ग येथें पाठवितांना बाप म्हणाला, ''आतां पुन: वेळ गमावूं नको. पुरे झाल्या माकडचेष्टा ! मूर्खपणा सोड. डॉक्टर ही कायद्याची पदवी घे.''  पण येथेंहि लीपझिग येथल्याप्रमाणेंच त्याचें जीवन सुरू झालें. अभ्यास—पुस्तकी अभ्यास-दूर ठेवून तो जीवनाचा अभ्यास करूं लागला. कलेंत लुडबुड करण्यास त्यानें सुरुवात केली. तो स्टेलो खेळावयास व सतार वाजवावयास शिकला. तो वैद्यकहि शिकूं लागला. त्याचा काळ कधीं तत्त्वज्ञानांत कधी सुखविलासांत तर कधीं खान-पान-गानांत जाई. तो स्ट्रासबर्ग येथील बुध्दिमंतांचा नेता झाला. त्याची प्रकृत आतां चांगली बरी झाली. तेथील रस्त्यांतून तो एकाद्या ग्रीक देवाप्रमाणें हिंडे. एकदां तो एका उपाहारगृहांत गेला. तो आत जातांच त्या भव्य, दिव्य व तेजस्वी पुरुषास पाहून सारे चकित झाले ! चिमटे व काटे बाजूस ठेवून ते त्याच्याकडे बघत राहिले ! तो एके ठिकाणीं म्हणतो, ''मी यौवनानें जणूं मत्त होऊन गेलों होतों !'' त्याच्या नसांनसांतून तारुण्य भरलें हातें. ज्यांचा ज्यांचा त्याच्याशीं परिचय होई ते ते त्याची स्फूर्ति घेऊन जात. त्यांनाहि जणूं नवचैतन्याचा लाभ होई.

तो उत्कृष्ट तलवारबहाद्दर होता. तो घोड्यावरहि छान बसे. जर्मनीनें कधीहि ऐकलीं नव्हतीं अशीं अत्यंत सुंदर गीतें तो जर्मन भाषेंत रचूं लागला व गाऊंहि लागला. स्ट्रासबर्गमधील सर्व बुध्दिमंतांचीं डोकीं त्यानें फिरवून टाकलीं ! त्याचें स्वत:चें डोकें तर नेहमींच फिरत असे. तें स्वस्थ नसे. भावना व विकार यांची त्यांत गर्दी असे. तो चट्कन् प्रेम करी व तितक्याच चट्कन् ते विसरेहि. त्याला कोणी मोह पाडो अथवा तो कोणाला मोहित करो, त्यात मिळणार्‍या अनुभवाचें तो सोनें करी, त्यावर अमर काव्य रची व तो अनुभव गीतांत ओतून पुन: नव्या साहसाकडे वळे. त्याला जीवनाचा प्रत्येक दृष्टीनें अभ्यास करण्याची उत्कंठा असल्यामुळें तो सर्व प्रकारच्या लोकांशीं मिसळे. खानावळवाले, त्यांच्या मुली, धर्मोपदेशक, आस्तिक, नास्तिक, गूढवादी, पंडित, विद्वान् लोक, उडाणटप्पू, नाटकमंडळयातील लोक, ज्यू, नाच शिकविणारे वगैरे सर्व प्रकारचे लोक त्यानें पाहिले. स्पायनोझाप्रमाणें त्याला प्रत्येयकांत कांहीं ना कांहीं दिव्य व रमणीय दिसेच. रंगभूमीची तर त्याला विशेषच आवड होती. तो शेक्सपिअरचा मोठा भक्त हाता. जर्मन रंगभूमि नि:सत्त्व होती, नाटकांत जणूं जीवच नव्हता ! एलिझाबेथकालीन इंग्रजी नाटकांतील जोर, उत्साह, तीव्रता व उत्कटता गटेनें जर्मन नाटकांत आणण्याचा यत्न केला. तारुण्यांतील अपरंपार उत्साह त्याच्या जीवनांत उसळत होता ! त्यानें त्या उत्साहाच्या योगानें केवळ जर्मन कलाच नव्हेत तर सारे राष्ट्रीय जीवनच संस्फूर्त करण्याचें ठरविलें. जर्मनीचा सारा इतिहास त्यानें नाट्यप्रसंग शोधून काढण्यासाठीं धुंडाळला ! आपल्या स्वच्छंद प्रतिभेला भरपूर वाव मिळावा म्हणून त्यानें एवढा खटाटोप केला. जर्मन वीरपुरुष गॉट्झ व्हॉनप बर्लिचिन् जेन याच्यामध्यें त्याला नाट्यविषय आढळला. गॉट्झ हो जणूं जर्मन रॉबिनहुडच होता ! गरिबांना मदत करण्यासाठीं तो श्रीमंतांना लुटी. तो धर्मोपदेशक व सरदार यांच्याविरुध्द होता. त्यानें अनेक पराक्रम केले, अनेक साहसें केलीं. शेतकर्‍यांच्या बाजूनें तो लढे, झगडे, धडपडे. गटेची प्रतिभा जागी झाली, परिणामत: एक अति भव्य व प्रक्षोभकारी नाटक निर्माण झालें. कांहीं दिवस तें तरुणांचें जणूं बायबलच होतें ! बेछूटपणाच्या जीवनाचा व स्वच्छंदीपणाच्या नवधर्माचा गटे जणूं प्रेषितच बनला !

आणि या सर्व गोष्टी संभाळून त्यानें वडिलांच्या समाधानार्थ एकदांची कायद्यांतील डॉक्टर पदवी घेतली. वडिलांनीं त्याला पुढील अभ्यासासाठीं वेट्झलर येथील सुप्रिम कोर्टाकडे पाठविलें. पण तेथें गेल्यावर गटेला काय दिसलें ? तेथील शाही न्यायाधीशासमोर चालावयाचे वीस हजर खटले शिल्लक पडले होते. त्यांना तीनशें तेहतीस वर्षे लागतील असा गटेचा अंदाज होता. त्यांचा निकाल लागेल तेव्हां लागो, स्वत:च्या केसचा निकाल त्यानें ताबडतोब लावला. त्याला कायद्याविषयीं अत:पर मुळींच आदर राहिला नाहीं. त्यानें 'वाङ्मय हेंच आपलें जीवनकार्य' असें निश्चित केलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel