प्रकरण ७ वें
मातृहत्यारा सम्राट् नीरो
- १ -
पूर्वेकडे आपण जरा फिरून आलो. चला पुन: रोम शहरीं. सीझर मेल्यावर त्याचा एक चुलत नातू गादीवर बसला. त्याचें नांव ऑक्टेव्हियस. त्यानें दुसरें त्रिकूट बनविलें. अॅन्टोनी, लॅपिडस व ऑक्टेव्हियस या त्रिकूटानें सीझर, पाँपे व क्रॅशस यांच्याप्रमाणेंच सारी पृथ्वी आपणांस वांटून घेतली. तिघांनाहि लूट करण्यास नीट वाव मिळावा म्हणून ही विभागणी करण्यात आली. आपलें काम नीट, निर्वेध व सुरळीतपणें चालावें यासाठीं कांही लोकांना आपल्या मार्गांतून दूर करणें त्यांना भाग होतें ! त्यांच्या अवकृपेला बळी पडलेल्यांत सुप्रसिध्द वक्ता सिसरोहि होता. सिसरो मारला जावा असें अॅन्टोनी व लॅपिडस यांना वाटत होतें. ऑक्टेव्हियस प्रथम प्रथम त्याला वांचवूं इंच्छीत होता. पण थोड्याशा विचारविनिमयानंतर सिसरोला ठार मारण्याच्या बाबतींत तिघांचेंहि एकमत झालें. प्ल्युटार्क लिहितो, ''त्या तिघांत झालेल्या कराराच्या अटी पुढीलप्रमाणें होत्या :—सीझर (ऑक्टेव्हियस) यानें सिसरोची बाजू सोडावी, लॅपिडसनें आपला भाऊ पॉलस याचा त्याग करावा व अॅन्टोनीनें आपला मामा ल्यूसियस सीझर याला सोडावें.'' अशा रीतीनें त्यांच्या मनांतल्या क्रोधद्वेषांनीं त्यांची माणुसकी नष्ट केली. कोणताहि हिंस्र वन्य वशु सुध्दां माणसांहून अधिक क्रूर व रानटी नसतो हें त्यांनीं जगाच्या निदर्शनास आणून दिले. क्रोधांध माणसाच्या हातीं सत्ता आल्यास तो पशूहूनहि पशु होतो.
त्या तिघांनीं आपआपले कांटे काढून टाकून शिवाय आणखी शेंकडों जणाची कत्तल केली. पण नंतर ते तिघे पुन: नेहमींप्रमाणें आपसांत भांडूं लागले. त्या तिघांच्या तंट्यांत लॅपिडस केव्हांच मागें पडला व शेवटीं मुख्य प्रतिस्पर्धी दोनच उरले. अॅन्टोनी ईजिप्तमध्यें गेला व सीझरप्रमाणें क्लिओपाट्रा हिच्या प्रेमपाशांत सांपडला. ऑक्टेव्हियसला जिंकण्यांचा एक दुबळा प्रयत्न त्यानें केला ; पण ख्रि. पू. ३१ या वर्षी ऑक्टियमच्या आरमारी लढाईंत त्याचा मोड झाला व ऑक्टेव्हियस रोमचा प्रतिस्पर्धीहीन स्वामी झाला. त्यानें 'ऑगस्टस' म्हणजे 'मोठा' ही अहंकारी पदवी धारण केली व रिपब्लिकची परंपरा राखण्याच्या ढोंगाआड सर्व सत्ता हळूहळू आपल्या हातीं घेतली. तो पहिला रोमन सम्राट् झाला. त्यानें एकेचाळीस वर्षे राज्य केलें (ख्रि.पू. २७ ते इ.स. १४). आपण रोमनांचा सम्राट्, नेता व देव आहों, अशी घोषणा त्यानें केली. त्याचें शरीर म्हणजे जणूं देवाचें, त्याचा राहता राजवाडा म्हणजे जणूं पवित्र देव-मन्दिर अशी त्याची समजूत होती. त्याच्या ठायीं उतावीळपणा नव्हता. तो धाडशी व कारस्थानी होता. कोणतेंहि कपट करावयाला तो मागेंपुढें पाहत नसे. थॉमस डी क्विन्सी आपल्या 'सीझर्स' नामक पुस्तकांत लिहितो, ''इतिहासांत नमूद असलेल्या कोणत्याहि कमालीच्या दुष्टपणाच्या कृत्यांशीं तुलनेंत कमी पडणार नाहींत, अशीं ऑगस्टसची दुष्कृत्यें होती. देवांना खुष करण्यासाठीं त्यानें एकदां स्वत:च्या हातानें यज्ञवेदीवर अनेक कैद्यांचा बळी दिला. एकदां एका युध्दानंतर आपल्या सैन्यास पुरेसा पगार देतां येत नाहीं असें पाहून त्यानें कांही श्रीमंतांस ठार केले व त्यांच्या इस्टेटी सरकारजमा करून सैन्याचा पगार भागविला ! मृत्युशय्येवर असतां आपण आतां जगांतून जाणार म्हणून आपलीं शेवटचीं स्तुति-स्तोत्रें गावयास त्यानें नोकरांना सांगितलें. आपण फारच दिव्य व भव्य जीवन जगलों असें त्याला वाटे. इतकी उदात्त भूमिका केल्यावर पडद्याआड जाण्यास तो तयार होता, पण जातां जातां स्वत:चे पोवाडे ऐकूं इच्छीत होता.''