अशा रीतीनें मिसर देशांतील धर्मोपाध्यायांनीं प्रथम लेखनाचा शोध लाविला.  मागच्या पिढीनें स्वत:चा मूर्खपणा पुढच्या पिढीसाठीं लिहून ठेवण्याची ही पध्दत अशा रीतीनें जन्माला आली.

देवदेवतांची इच्छा काय आहे तें धार्मोपाध्याय सांगत.  या ब्राह्मणवर्गाबरोबरच दुसरा एक वर्ग उदयास आला.  देवदेवतांची इच्छा प्रत्यक्ष मूर्त स्वरूपांत आणणारा हा वर्ग होता.  प्रबळ असा क्षत्रियांचा हा वर्ग किंवा जमीनदारांचा वर्ग.  दुष्काळ केव्हां येईल व भरपूर केव्हां पिकेल तें धर्मोपाध्याय सांगत.  उद्योगी लोक कठिण येणार्‍या दिवसांसाठीं धान्य सांठवून ठेवीत.  तें शेजार्‍यांना पुढें उपयोगी पडे.  इतर लोकांना जिवंत ठेवतां येईल अशीं साधनें मिळाल्यावर हे उद्योगी लोक इतरांचे पुढारी बनले.  ते धनी झाले.  जमीनदार झाले.  त्यांच्यांत जो अत्यंत हुशार व अत्यंत प्रबळ होता, जो सर्वांहून अधिक दुष्ट व कपटी होता, त्यानें इतर स्पर्धावंतांस स्पर्धांक्षेत्रांतून दूर केलें ; आणि इतिहासांतील पहिला वैभवशाली राजा जन्माला आला.  ईश्वरी इच्छेनें हा पहिला राजा जन्मला नाहीं ; तर स्वत:च्या धूर्ततेनें तो राजा झाला.

राजसंस्थासुध्दां जमिनींत धान्य पेरण्यांतूनच जन्मली असण्याचा बराचसा संभव वाटतो.

धान्य पेरण्याच्या कल्पनेंतूनच अमृतत्वाची कल्पना निघाली असावी.  मृत व जमिनींत गाडलेलें धान्य पुन्हा अंकुरतें, त्यांतून नवीन जीवन बहरतें, यांत अमृतत्वाच्या कल्पनेचा उगम आहे.  मातींत पुरलेल्या बीजांतून नवीन सजीव सस्यांकुर जन्मतात, त्याप्रमाणें मृत शरीरांतून पुन्हा सजीव आत्मे जन्माला येतील.  म्हणून मृतांच्या शरीरांचा सांभाळ केला पाहिजे.  मृत शरीरें नीट ठेवण्याची कला जन्मली.  मृतांसाठीं या मिसरी लोकांनीं प्रचंड व भव्य मंदिरें बांधिली.  मृतासाठीं जीं घरें बांधावयाचीं तीं टिकाऊ असलीं पाहिजेत.  मजबूत व सुखसोयींनीं संपन्न अशीं असलीं पाहिजेत.  जिवंतांच्या घरांपेक्षां मृतांचीं घरें अधिक सुंदर व समर्थ अशीं असलीं पाहिजेत.  कारण ते मृतात्मे या दगडी घरांतून कायमचे रहाणार !

अशा रीतीनें पिरॅमिड बांधले गेले.  या कलेची वाढ फारच आश्चर्यकारक झपाट्यानें झाली.  संस्कृति व सुधारणा यांची अशीच प्रगति होत असते.  हजारों वर्षें लंगडत, अडखळत एकादें पाऊल ती टाकते.  नंतर एकदोन शतकें उड्या मारीत जणुं ती जाते.  आणि पुन्हा आलस्याचीं शतकें सुरू होतात.  हजारों वर्षे जणूं पुन्हा एक प्रकारची अर्धवट स्थगितता येते.  पिरॅमिड बांधण्याचा काळ हा इजिप्तच्या सांस्कृतिक इतिहासांतील उड्या मारीत जाण्याचा काळ होता.  एकदम प्रगतीची जशी उकळी आणि भरती आली !  ओबड-धोबड दगडांचीं थडगीं बांधण्यापासून तों गिझे येथील भव्यतम पिरॅमिड बांधण्यापर्यंत इजिप्तनें एकदम मजल मारली.  ही आश्चर्यकारक प्रगति होती.

गिझे येथील हा पिरॅमिड वाळवंटाच्या कडेला बांधलेला आहे.  आजच्या विसाव्या शतकांतील गगनचुंबी अमेरिकन इमारतींप्रमाणें हा पिरॅमिड उभा आहे.  तो पांचशें फूट उंच आहे.  त्याच्या पायानें तेरा एकर जमीन व्यापली आहे.  जगांतील आजची सर्वांत मोठी इमारत घेतली तर तिचा पाया याच्या तिसर्‍या हिश्शानेंहि नाहीं असें दिसेल.

मिसर लोकांचे हें राष्ट्र कांही फारसें मोठें नव्हतें.  परंतु त्यांच्या कल्पना प्रचंड असत.  त्यांची महत्त्वाकांक्षा उत्तुंग होती.  स्वत:च्या महत्त्वाकांक्षेनेंच ते मेले.  मृत राजांसाठीं हे प्रचंड पिरॅमिड तर त्यांनीं बांधलेच, देवतांसाठीं प्रचंड आकारांची मंदिरें त्यांनी उभारलींच ; इतकेंच नव्हे, तर त्यांनी त्यांचे ८०/८०, ९०/९० फूट उंचीचे पुतळे बनविले ; आणि याबरोबरच प्राचीन इतिहासांतील अत्यंत शिस्तीचें असें सैन्यहि त्यांनी उभारिलें.  हें जें लष्करी भूत त्यांनीं उभारलें, त्यानेंच त्यांचा शेवटीं अध:पात झाला.  कांहीं काळपर्यंत त्यांनीं इतर राष्ट्रांना जिंकले.  परंतु पुढें ते स्वत:च जिंकले गेले.  आणि मानवजातीच्या रंगभूमीवरून निघून जाऊन दुसर्‍यांना त्यांनीं जागा करून दिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel