पण व्हॉल्टेअरची सर्वोत्तम बुध्दि तशीच प्रतिभा पाहूं इच्छिणारास अन्यत्र जावें लागेल. या गोष्टींमधील त्याची जीवनाविषयींची दृष्टि आनंददायक असली तरी खोल नाहीं. जरा पोरकटपणाच वाटतो. त्याची लोकप्रियता फार होती म्हणून तो दु:खी असूं शकत नव्हता. त्याची चलती होती म्हणून तो फार प्रखर व तिखट होऊं शकत नव्हता. जीवनाचा अर्थ नीट समजण्याइतपत यथार्थ व पुरेसें जीवन तो अद्यापि जगला नव्हता. तो अठराव्या शतकांतील विनोदी पात्र आहे. तो युरोपचा खेळाडू आहे. पण त्याचें मन अद्यापि अपरिपक्व आहे. त्यानें अद्यापि फारसें दु:ख भोगलेलें नसतें; मोठ्या मनुष्याच्या उंचीला तो अजून गेला नव्हता. विचारांची व भावनांची उच्चता तशीच गंभीरता त्याला अद्यापि आली नव्हती. मानवजातीला मार्ग दाखविणार्‍या थोर पुढार्‍यांपैकीं एक होण्यासाठीं दु:खाच्या सद्गुरूजवळ त्यानें अजून कष्ट सोसणें जरूर होतें.

१८४९ सालीं मॅडम डु चॅटेलेट मरण पावली. जीवनांत प्रथमच दु:ख पाहून तो हंसण्याचें विसरला. त्याची प्रकृतीहि ढांसळूं लागली व कडेलोट म्हणजे त्याला पुन: फ्रान्समधून हद्दपार करण्यांत आलें. १७५५ सालीं लिस्बन येथें भूकंप झाला. या अपघातांत तीस हजार लोक गडप झाले ! त्या दिवशीं सर्व सन्तांचा स्मृतिदिन होता. पुष्कळ लोक प्रार्थना करीत असतांनाच ठार झाले. चर्च प्रार्थना करणार्‍यांनीं भरून गेलें होतें. आणि भूकंप आला व सारे गडप झाले !

व्हॉल्टेअर आतां जगाकडे निराळ्या प्रकाशांत पाहूं लागला. त्याचें लेखन अधिक गंभीर होऊं लागलें. त्याचें भव्य मन शेवटीं एकदांचें परिपक्व झालें. त्यानें एक भावनोत्कट प्रखर कविता लिहिली. ईश्वराची करुणा व त्याचे ज्ञान यांबद्दल त्यानें शंका घेतली. आपल्या लेंकरांना दु:खांत लोटणारा हा कसला परमेश्वर ? आरोळ्या ठोकून प्रार्थना करणार्‍या सार्‍या भक्तांना त्या निष्ठुराचें मौन हेंच उत्तर ! अखेर व्हॉल्टेअरच्या लक्षांत आलें कीं, सुटसुटीत, अर्थसुंदर नर्मवचनें किंवा निश्चिंत हास्य यांपेखां जीवन कांहीं तरी अधिक आहे.

''मी हंसत हंसत विनोदानें जगांतील सुखाचीं गीतें, सूर्यप्रकाशाचीं गीतें गात हातों; पण आता काळ बदलला आहे. माझ्या वाढत्या वयानेंहि मला नवीन दृष्टि दिली आहे. मानवजातीची क्षणभंगुरता मीहि अनुभवीत आहे. सभोंवतीं अंधार वाढत आहे. मीहि प्रकाश शोधीत आहे. अशा वेळीं मीं दु:खीकष्टी होऊं नये तर काय करावें !''

लिस्बन येथील भुकंपाच्या बाबतींत प्रस्थापित चर्चची बेफीकिर वृत्ति पाहून तर व्हॉल्टेअरला धक्काच बसला ! या घोर आपत्तींतहि त्या फादरांना ईश्वराचे हेतु दिसत होते ! त्यांनीं पापें केलीं म्हणून प्रभूनें त्यांना मारून टाकलें, असें हे धर्मोपदेशक खुशाल प्रतिपादीत ! छिन्नविच्छिन्न झालेल्या लोकांच्या वेदनांवर या धर्मांतील भोळसट कल्पना आणखी मीठ चोळीत आहेत असें पाहून या चर्चची व्हॉल्टेअरला चीड आली. चर्चबद्दलचा तिरस्कार त्याच्या मनांत मरेपर्यंत होता.

स्विट्झर्लेंडमध्यें फर्ने येथे त्यानें इस्टेट विकत घेतली. फ्रान्सच्या सरहद्दीच्या जरा बाहेरही इस्टेट होती. येथें बसून त्यानें संघटित धर्माविरुध्द जोरदार लढाई सुरू केली. तो सांगूं लागला कीं, जगांतील सार्‍या दु:खाचें मूळ म्हणजे चर्च. चर्चची धर्मान्धता तशीच असहिष्णुता, तीं इन्क्विझिशन्स, ते बहिष्कार, त्या शिक्षा, तीं युध्दे-सारा फापटपसारा आहे. असें हें चर्च म्हणजे मानवजातीला शाप आहे. अत:पर चर्चची सत्ता चालू ठेवणें म्हणजे सुधारणेला कलंक लावणें होय. ''चर्चला लागलेला हा कलंक धुऊन काढा' अशी घोषणा त्याने केली. ''या निंद्य गोष्टी चिरडून टाका'' हें त्याचें ब्रीदवाक्य झालें. त्यानें मित्रांना लिहिलेल्या प्रत्येक पत्राच्या शेवटीं ''चर्च चिरडून टाका'' हें वाक्य लिहिलेलें असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel