नाहीं. तीस हजारांची रकम पुरेशी नव्हती. टॉर्कीमीडानें राजा-राणींचें मन परावृत्त केलें. १४९२ सालच्या मार्चच्या एकतिसाव्या तारखेस ज्यूंच्या हकालपट्टीच्या कायद्यावर राजानें सही केली. या कायद्यानुसार स्पेनमधील प्रत्येक ज्यूला चार महिन्यांच्या आंत बाप्तिस्मा तरी द्यावा, नाहीं तर हांकलून तरी द्यावें असें ठरविण्यांत आलें. तीन लक्ष ज्यू ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यापेक्षां वनवासास जाण्यास तयार झाले. त्यांना आपली मालमत्ता विकण्याची परवानगी देण्यांत आली. पण विकत घेणारे शेवटच्या दिवसाची वाट पाहत होते. शेवटच्या दिवशीं विकत घेणारे मागतील त्या किंमतींत घरेंदारें वगैरे सारें विकून ज्यू निघाले. त्या काळचा एक लेखक बर्नाल्डीम लिहितो, ''एकानें आपला राजवाड एका गाढवाच्या मोबदल्यांत दिला ! दुसर्‍या एकानें आपला द्राक्षाचा मळा एका कापडाच्या ठाणास देऊन टाकला !'' या निर्वासितांना बरोबर सोनें घेऊन जाण्याची बंदी होती.याप्रमाणें ज्यूंना लुटून व हद्दपार करून ख्रिश्चन लोक आनंदानें नाचूं लागले. त्यांस आपल्या क्रूरतेची कृतार्थता वाटली. डोमिनिकन पंथीय ब्लेडा म्हणाला, ''स्पेनच्या इतिहासांतील हा अतिशय भाग्याचा दिवस पाहा ! आतां धार्मिक ऐक्य सुरक्षित राहील. भरभराटीचा काल आतां लांब नाहीं. लवकरच सुखाचा सूर्योदय होईल.''

पण अपेक्षित सुखाची उषा तर कधीं आलीच नाहीं, उलट ज्यूंच्या निर्वासनानंतर स्पेनच्या भाग्यसूर्याचा मात्र अस्त झाला !

स्पेनमधून निर्वासित झाल्यावर कोठें जावयाचें हें ज्यूंना कळेना. पुष्कळसे पोर्तुगालमध्यें गेले. तेथील राजा इमॅन्युएल दया दाखवील असें त्यांना वाटलें. पण तो धार्मिक कॅथॉलिक होता. ज्यू जें कांहीं किडूकमिडूक घेऊन आले होते तेंहि त्यानें लुटलें व 'माझ्या देशांतून चालते व्हा !' असें त्यांस सांगितलें. त्या 'दयाळू' ख्रिश्चन राजानें आपलें कार्य उत्कृष्टपणें पार पाडलें. ज्यूंची मालमत्ता, चीजवस्तू, येवढेंच काय, पण त्यांचीं मुलेंबाळेंहि त्यानें लांबविली. त्यानें असा गुप्त हुकूम सोडला होता कीं, चौदा वर्षांखालचीं सारीं ज्यू मुलें पकडण्यांत यावीं. त्यांना बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन म्हणून वाढविण्यांत येणार होतें.

ही झाली ज्यूंची कथा. पण ख्रिश्चन धर्मांतीलच असूनहि जे कॅथॉलिक नव्हते त्यांची होळी टॉर्कीमीडा यानें सतत पेटती ठेवली होती. शेंकडों लोक त्यानें या होळींत फेंकले. त्याचीं स्तुतिस्तोत्रें गाणारे कौतुकानें लिहितात, ''टॉर्कीमीडा इतका कसा दुष्ट, असें तुम्हांस वाटेल. पण जे पाखंडी होते त्यांचा उध्दार व्हावा म्हणून त्याला असें दुष्ट व्हावें लागत असे.'' सेंट थॉमस अ‍ॅक्विनसवर टॉर्कीमीडाची फार प्रीति तशीच भक्ति असे. अ‍ॅक्विनसप्रमाणेंच टॉर्कीमीडा मनाचें समाधान करी कीं, ''चर्चच्या कल्याणासाठींच मी असा वागत आहें.''

आपण दुष्ट आहों याची टॉर्कीमीडाला जाणीवच नसे. इतर इन्क्विझिटरांप्रमाणेंच तोहि आपल्या आरोपींची दयेनें व न्यायबुध्दीनें विटंबना करी, त्यांचे अवयवच्छेदन करी आणि मग त्याचे हालहाल करून त्यांना ठार करी, हे इन्क्विझिटर लोक जेव्हां जिवंत जाळण्याची शिक्षा देत, तेव्हां ते नेहमीं ''दयेनें व न्यायबुध्दीनें'' असे शब्द वापरीत. चौर्‍याहत्तराव्या वर्षी टॉर्कीमीडा इन्क्विझिशनचें अध्यक्षपद सोडून मोकळा झाला. पुढें दोन वर्षांनीं इ;स; १४९८ मध्यें तो मेला. पण इन्क्विझिशन संस्था पुढें एकोणिसाव्या शतकापर्यंत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel