असल्या वाक्यांतून मार्क्सचें खरें अंतरंग आपण पाहूं शकतों व मार्क्सचाच हा आवाज असें ओळखूं शकतों. मार्क्स जगाला बदलूं इच्छीत होता; पण वरिष्ठ वर्गाचें लोक जगाला त्याच जुन्या अनियंत्रित सत्तेच्या व जुन्या धार्मिक समजुतींच्या चाकोरींतून नेऊं इच्छीत होते. त्यामुळें मार्क्सचा व या सनातनीबुवांचा झगडा सुरू झाला. जर्मन सरकारनें त्याच्यावर राजद्रोहाचा गंभीर आरोप ठेवला. जन्मभूमीचा व त्याचा संबंध संपला. जन्मग्रामीं--ट्रीव्हजमध्यें अगर जन्मभूमींत--जर्मनींत कोठेंहि जाणें हें अटक करून घेण्यासारखें होतें, कदाचित् मृत्युमुखांत शिरणेंच होतें. त्याला जर्मनींतून हद्दपार करण्यांत आलें म्हणून तो पॅरिस येथें गेला; पण फ्रेंच सरकारनेंहि 'पॅरिस सोडून जा' असा हुकूम त्याच्यावर बजावला तेव्हां तो ब्रुसेल्स येथें जाऊन तेथील कामगारांवर शिकवूं लागला. त्यांचे हक्क काय व ते कोणत्या रीतीनें नीट मिळवितां येतील हें तो त्यांना समजावून देऊं लागला. तो म्हणे, ''मनुष्य परिस्थितीनुसार बनत असला, बदलत असला, तरी तो परिस्थितीचा निर्माताहि असतो,'' हें नीट विचार केल्यास माणसाला कळून येईल. परिस्थिति मानवाला आकार देते, मानवहि परिस्थितीला आकार देत असतो; इतिहास मनुष्याला बनवितो व मनुष्यहि इतिहास निर्माण करतो. हेंच दुसर्‍या शब्दांत सांगावयाचें तर असें म्हणतां येईल कीं, आपण उत्क्रांतीचे निर्माते आहों तितकींच उत्क्रांतीचीं संतानेंहि आहों.

इतिहासाचें आधिमौतिक पर्यालोचन करण्याच्या त्यांच्या तत्त्वज्ञानांतील प्राणभूत गोष्ट म्हणजे त्याची इतिहासाकडे पाहण्याची दृष्टि. मनुष्य उत्क्रांतीच्या गतीचा निर्माताहि आहे व तो बनविलाहि जात असतो. उत्क्रांतीच्या गतीचें तो एक निष्क्रिय साधनहि आहे आणि प्रत्यक्ष चळवळ करणारा, क्रियात्मक भाग घेणाराहि आहे या कल्पनेप्रमाणें अगर या तत्त्वाप्रमाणें आपण अधिक झपाट्यानें उत्क्रांतीचें जरूर तेव्हां क्रांतींत परिणमन करून जगाची प्रगति करूं शकूंच्. मार्क्सच्या मतें सामाजिक क्रांति ही सर्वांत महत्त्वाची. सामाजिक क्रांति म्हणजेच कामगारांचा उठाव. ज्या कामगारांवर समाजाचीं सारीं ओझीं असतात. ज्यांना समाजाचा सारा भार सहन करावा लागतो, पण सुख वा समाधान मात्र यत्किंचित् देखील भोगतां येत नाहीं अशा कामगारांचा उठाव ही मार्क्सच्या मतें अत्यंत महत्त्वाची क्रांति होय.

पूर्वीच्या सर्व तत्त्वज्ञान्यांनीं ईश्वराचा जो अंतिम प्रश्न त्याचा खूप ऊहापोह केला. देवाचा दूरचा प्रश्न दूर ठेवून जवळचा प्रॉलेटरियन प्रश्न कार्ल मार्क्स यानें हातीं घेतला. प्रॉलेटरियन या शब्दाचा अक्षरश: अर्थ 'खूप मुलें असणारा' असा आहे. कामगारांचा प्रश्न हातीं घेऊन त्यांत तो मग्न झाला. सारा इतिहास म्हणजे सकिंचन व अकिंचन यांच्यांतील झगडा. पिळणूक करणारे व श्रम करणारे किंवा धनिक व दास यांच्यांतील संघर्ष व झगडे म्हणजेच मानवी इतिहास. ''त्या त्या प्रसंगीं कामगार पुन: पुन: यशस्वी होत असतात; पण त्यांना मिळालेला विजय टिकत नाहीं; तो पळून जातो.''  पण कामगार-संघटना दिवसेंदिवस अधिकाधिक मजबूत होत आहे, वाढत आहे. जगांतील सर्वच राष्ट्रांचे हितसंबंध एकच असल्यामुळें चळवळीची राष्ट्रीयता नष्ट होऊन ती आंतरराष्ट्रीय होते. ''समाजवादी जेथें जेथें क्रांतिकारक चळवळ होईल तेथें तेथें तिला पाठिंबा देतात. रूढ सामाजिक व राजकीय परिस्थितीविरुध्द जेथें जेथें क्रांतिकारक उठाव दिसेल तेथें तेथें त्याला ते मदत करतात. कम्यूनिस्ट कधींहि स्वत:चे विचार अगर स्वत:चीं ध्येयें व उद्दिष्टें लपवीत नाहीं; अशा लपवालपवीचा तो तिटकारा करतो. रूढ सामाजिक रचना बळजबरीनें उलथून टाकली पाहिजे हें आपलें ध्येय तो निर्भयपणें उद्धोषीत असतो. समाजवादी क्रांति होणार या भीतिनें सत्ताधारी वर्गांना थरथर कापूं दे. कामगारांना भीति वांटण्याची गरज नाहीं. त्यांचें शृंखलांशिवाय दुसरें काय जाणार आहे ? पण ते सारें जग जिंकून घेतील. ''जगांतील कामगारांनों. एक व्हा.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel