कार्थेजच्या स्वारीची सर्व सिध्दता झाली. पण स्वारी करण्याला कारण मिळेना, योग्य सबब सांपडेना. पण कॅटोचे बेत अशानें थोडेच अडणार होते ? असल्या क्षुद्र गोष्टी त्याच्या मनोरथांच्या आड येणें शक्यच नव्हतें. निमित्त सांपडत नसेल तर निर्माण केलें पाहिजे असें तो म्हणे. युध्द करण्यासाठीं एक सबब त्यानें तयार केली. ज्याप्रमाणें त्यानें रोमन जनतेंत युध्दाची इच्छा उत्पन्न केली, त्याचप्रमाणें त्यानें युध्दासाठीं एक कारणहि निर्माण केलें. दुसर्या प्यूनिक युध्दाच्या अखेरीस 'रोमशीं मित्रभावनानें वागणार्या कोणत्याहि राष्ट्राशीं आम्ही लढाई करणार नाहीं' असे कार्थेजियनांनीं कबूल केलें होतें. पण त्यांना केलेला करार मोडणेंच भाग पडावें अशी परिस्थिति कॅटोनें उत्पन्न केली. नुमिडियाचा राजा मॅसिनिस्सा याला त्यानें कार्थेजियनांच्या प्रदेशावर स्वारी करण्याचा हुकूम दिला. कार्थेजियनांचीं शेतेंभातें जाळा, गुरेंढोरें पळवा अशी आज्ञा त्यानें केली. मॅसिनिस्सानें आज्ञेनुसार केलें. शक्य तोंवर कार्थेजियनांनीं कळ सोसली ; पण शेवटीं बचावासाठीं म्हणून त्यांनीं परत प्रहार केला—नव्हे, तसें करणें त्यांना भागच पडलें.
योजिलेलें कारस्थान सिध्दीस गेलेलें पाहून रोमन लोकांना मनांतल्या मनांत खूप आनंद झाला. ते म्हणूं लागलें, ''कार्थेजनें हें काय केलें ? यांनीं असा कसा करार - भंग केला ? आम्ही तर थक्कच झालों या नीच कृत्यामुळें. फसव्ये व अप्रामाणिक आहेत तर एकूण हे ! रिपब्लिकच्या मित्रावर हल्ला करण्याचें पाप यांनी कसें केले ?'' सीनेटरांनीं कार्थेजला तत्काळ कळविलें, ''तुमची व आमची लढाई सुरू झाली आहे.''
कार्थेजियन जाणत होते कीं, तें युध्द म्हणजे त्यांना मरणच होतें. त्यांनीं तहासाठीं रोमला वकील पाठविले व कळविलें, ''मॅसिनिस्सावर आम्हीं चाल केली खरीच. ही जी दुर्दैवी घटना घडून आली तिजबद्दल कराल ती शिक्षा भोगावयाला आम्ही तयार आहो. मॅसिनिस्सावर हल्ला करणार्यांत जे दोन प्रमुख पुढारी होते, त्यांना त्यांनीं रोमच्या समाधानार्थ व तें तशी मागणी करील हें आधींच ओळखून ठार करून टाकलें. रोमन लोकांची मैत्री परत मिळावी म्हणून कांहीहि करावयास ते तयार होते. 'तुमच्या मैत्रीच्या अटी कृपा करून कळवा' असें त्यांनीं रोमला परोपरीनें विनविलें.
''ठीक आहे,'' सीनेटरांनी उत्तरी कळविले, ''ज्याअर्थी तुम्ही नीट वळणावर आलां आहां, त्याअर्थी तुमचा देश, तुमचे कायदे, तुमची कबरस्थानें, तुमची मालमत्ता, तुमची स्वतंत्रता, सारें आम्हीं तुम्हांला परत देत आहों. पण तुम्ही आपल्या सीनेटरांचे तीनशें मुलगे आमच्याकडे ओलीस म्हणून पाठवा. तसेंच अत:पर आमच्या वकिलांचें सांगणें सदैव ऐकत जा व ते सांगतील तें तें बिनबोभाट मान्य करीत जा.''
ही रानवट व खुनशी मागणीहि कार्थेजियनांनीं कबूल केली. त्यांनी रोमन वकिलांच्या ताब्यांत तीनशें मुलगे दिले. एका गुलामवाहू जहाजांत गुरांढोरांप्रमाणें कोंबून हे अभागी जीव रोमला पाठविण्यांत आले ! ते तीनशें मुलगे मिळतांच रोमची आणखी नवी मागणी आली : ''कार्थेजनें नि:शस्त्र झाले पाहिजे, सारीं हत्यारें खालीं ठेवलीं पाहिजेत,''