प्रकरण ६ वें
ऍमस्टरडॅम येथील शांतमना स्पायनोझा
- १ -

स्वत:विषयीं युरोपीय पंडितांनीं चांगलें लिहावें-बोलावें यासाठीं चौदावा लुई लांचलुचपती देत होता. पण स्पायनोझाला तो पेन्शन द्यावयास तयार होता. अट एकच होती : या ज्यू तत्त्वज्ञान्यानें आपलें पुढचें पुस्तक लूईला अर्पण केलें पाहिजे. पण ज्याच्याविषयीं स्पायनोझाला आदर वाटत नसे त्याची खुशामत करण्याकरता क्षुद्रमति तो नव्हता; तो प्रामाणिक होता. त्याला आत्मवंचना करावयाची नसल्यामुळें त्यानें लुईचें म्हणणें नम्रपणें पण निश्चितपणें नाकबूल केलें.

याच सुमारास जर्मनींतील एक राजा कार्ल लुडविग यानें स्पायनोझाला हीडलबर्ग येथील विद्यापीठांत तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाची जागा देऊं केली. पण एका अटीवर : स्टेटच्या प्रस्थापित धर्मावर त्यानें कधीं टीका करतां कामा नये. स्पायनोझानें ती जागा साभार नाकारली. उपाशीं राहावें लागलें तरी हरकत नाहीं, पण सत्यच बोलावयाचें असें त्यानें ठरविलें.

त्याच्यासमोर असल्या सुवर्णसंध्या नाचत असतां त्याला खरोखरच अर्धपोटी राहावें लागत होतें. पैसे समोर खुळखुळत होते तरी त्यानें ते नाकारले. कधीं कधीं तो गव्हाच्या अगर दुसर्‍या कसल्या पिठाची नुसती कांजी पिऊनच दिवस काढी; चव यावी म्हणून तो तींत थोडे बेदणे व थोड्या मनुका टाकी. अजीबात उपाशीं राहण्याचा प्रसंग येऊं नये यासाठीं त्याला पै न पै जपून खर्चावी लागे.

चांगलें व पोटभर अन्न तर मिळत नव्हतेंच; पण बौध्दिक श्रम मात्र भरपूर होत असल्यामुळें त्याला क्षय होणार असें दिसूं लागलें. पण ईश्वर-प्रेमानें मस्त असणारा हा निग्रही तत्त्वज्ञानी राजांचें साह्य नाकारीत होता, तशीच निकटवर्ती मित्रांचीहि मदत स्वीकारीत नव्हता. दुसर्‍यांची श्रध्द व दुसर्‍याचे पैसे घेणें म्हणजे जणूं अधर्म असें त्याला वाटे. पोटासाठीं तो चष्म्याच्या कांचा घांसून देई व मिळणार्‍या फुरसतीच्या वेळांत आपले विचार अधिक स्वच्छ व सतेज करी. कसें जगावें हें दुसर्‍यांना शिकविण्यासाठीं तो आपले विचार घांशी व स्वत:ला जगतां येण्यासाठीं चष्म्यांच्या कांचा घांशी.

अशा अभंग व अविचल चारित्र्याचे लोक इतिहासांत फार विरळा ! त्याचा आत्मा अत्यंत बलवान् होता. तो अगदीं एकाकी असा राहत होता. त्याच्या वयाच्या चोविसाव्या वर्षी त्याच्या धर्मबांधवांनीं त्याला बहिष्कृत केलें होतें. त्यानें कोणताहि पंथ (वा चर्च) न पत्करतां स्वत:चा, सर्व चर्चे व सायनागॉग ज्याच्या पोटांत, येऊं शकतील असा स्वतंत्र विश्वव्यापक धर्म निर्माण केला. त्याला सर्व विश्वांत विश्वंभर भासत होता.

तो बंडखोर होता; पण त्याचें बंड विशिष्ट प्रकारचें होतें. त्याच्या बहिणीनें त्याचा वारसा लुबाडला होता. त्यानें तिला कोर्टांत खेंचलें व खटला जिंकला. पण पुन: सारी इस्टेट त्यानें तिलाच परत दिली.

कन्फ्यूशिअसप्रमाणें त्यालाहि अपकारावर वा अपायावर रागावण्यास मूळींच वेळ नव्हता. अपकार वा अपाय करणार्‍यांवर रागावण्याइतका क्षुद्र तो नव्हता. तो स्वत:चा इतका अध:पात होऊं देत नसे. दुसर्‍यांवर रागावण्याइतका खालीं तो कधींहि येत नसे. ऍमस्टरडॅम येथील ज्यू धर्मोपदेशकांनीं त्याच्यावर बहिष्कार घातला व 'याच्याशीं संबंध ठेवूं नका, याला एकाद्या कुत्र्याप्रमाणें वागवा' असें त्यांनीं सर्व ज्यूंना आज्ञापिलें, तरी त्यांच्यावर न रागावतां स्पायनोझा त्यांना सोडून-आपली जात सोडून-निघून गेला. 'ज्यू राबींना जें मोलवान् वाटत आहे त्याचें ते रक्षण करीत आहेत. मला ते बहिष्कृत न करतील तरच स्वत:च्या धर्माशीं प्रतारणा केल्याचें पाप त्यांना लागेल. पण ज्यू धर्मोपदेशकांचें वर्तन त्यांच्या धर्मकल्पनेनुसार योग्य असलें तरी माझें वर्तनहि माझ्या विचारसरणीनुसार योग्यच आहे व मी वागलों तसा न वागतों तर माझ्या हातून माझ्या आत्म्याची फसवणूक झाली असती' अशी त्याची विचारसरणी असल्यामुळें ज्यूंनीं त्याची ताबडतोब केलेली हकालपट्टी त्याच्या मतें तर्कदृष्ट्या योग्यच होती. तो आतां एकटाच राहिला, धर्महीन लोकांत फेंकला गेला. त्याचा ज्यूंच्या धर्मावरचा विश्वास साफ उडाला होता !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel