- २ -
१८१८ सालच्या मेच्या पांचव्या तारखेस ट्रीव्हज येथें मार्क्सचा जन्म झाला. आईकडून तसाच बापाकडूनहि तो ज्यूच होता. ज्यू धर्मोपाध्यायांचें रक्त दोन्ही बाजूंनीं त्याच्या रक्तांत आलें होतें. मार्क्स सहा वर्षांचा होता तेव्हां त्याचा बाप प्रॉटेस्टंट झाला. त्यानें सर्व कुटुंबीयांसहि बॅप्तिस्मा दिला. मार्क्सचा बाप वकील होता. त्यानें असें कां केलें हें कोणासच माहीत नव्हतें. ज्यूंचा सर्वत्र छळ होई. आपल्या मुलांचा पुढें असा छळ होऊं नये म्हणून का त्यानें ख्रिश्चन धर्म स्वीकारला ? पण तसें असेल तर त्याचा तो हेतु सिध्दीस गेला नाहीं. कारण मार्क्सचें जीवन हें इतिहासांतील अत्यंत दु:खीकष्टी जीवन आहे.
कार्ल अत्यंत बुध्दिमान् विद्यार्थी होता. वयाच्या सतराव्या वर्षी त्यानें विद्यापीठांत प्रवेश केला व तेथें वाङ्मय, तत्त्वज्ञान, कायदा व प्रेम यांचा अभ्यास केला. गटेनें अनेक वेळां हृदय दिलें, मार्क्सनें एकदांच दिलें. मार्क्सची प्रेयसी वरिष्ठ वर्गांतील होती; तिचें नांव जेनी व्हॉन वेस्टफॅलन. त्यांचें प्रेम सात वर्षे फुलत होतें. सात वर्षांच्या प्रेमाराधनेनंतर दोघें विवाहबध्द झालीं. जेनीं मरेपर्यंत, अडतीस वर्षे दोघें दु:खक्लेशांची भाकरी एकत्र खात होतीं. कधीं कधीं तर घरात भाकरहि नसे. ती कोरडी भाकर अमर प्रेमाच्या दैवी मद्यासह ते खात. हालअपेष्टा भोगीत असूनहि दोघांचें परस्परांवर अतिशय प्रेम होतें व तें शेवटपर्यंत होतें.
वयाच्या तेविसाव्या वर्षी म्हणजे १८४१ सालीं त्यानें डेमॉक्रिटस व एपिक्यूरस यांच्या भौतिक तत्त्वज्ञानावर निबंध लिहिला. त्या निबंधामुळें त्याला तत्त्वज्ञानांतील डॉक्टर ही पदवी मिळाली; पण त्याला प्राध्यापकाची जागा मात्र मिळवितां आली नाहीं. कारण तो क्रांतिकारक विचारांचा होता. त्याची बुध्दि अत्यंत कुशाग्र होती. त्याची लेखनशैली विजेप्रमाणें प्रहार करीत जाई, जणूं फटके मारीत जाई ! तो त्या काळांतील क्रान्तिकारक चळवळींत तनमनधनेंकरून सामील झाला. गटेच्या पिढींतील सौंदर्यात्मक, कलात्मक बंडाचा काळ मार्गे गेला. आतांची पिढी त्याच्या पुढें गेली. आपल्या काळांतील छंदांत क्रान्ति करून किंवा नाटकांच्या संविधानकांत क्रान्ति करून त्यांना समाधान नव्हतें. अत:पर जीवनाच्या संविधानकांतच क्रान्ति करावयाची त्यांना इच्छा होती. हीन, प्रुट्झ, हार्टमन, बोर्ने वगैरे बुध्दिवादी तरुण जीवनांतच बदल करूं पाहत होतें. गटेचें वाङ्मयीन बंड आतां एकोणिसाव्या शतकांत समाजिक बंडांत परिणत झालें. या नवीन बंडाला मार्गदर्शक हवा होता. म्हणून कार्ल मार्क्स इतर अनेक बंडखोरांच्या सहकार्यानें नवीन समाजिक जागृतीवर लेखमाला लिहूं लागला.
ज्या वृत्तपत्रांत हे लेख येत, तें वृत्तपत्र बंद पाडण्यांत आलें; पण मार्क्स हताश झाला नाहीं. तो पॅरिसला गेला व तेथून त्यानें अनियंत्रित सत्तेवर कोरडे उडविण्याचें काम सुरू ठेवलें. त्याची सरबत्ती सुरूच राहिली. तो निबंध, पत्रकें वगैरे भराभरा लिहीत होता. त्यानें जें तत्त्वज्ञान पुढें जगाला संपूर्ण स्वरूपांत दिलें त्याची बीजें या पहिल्या लिखाणांतहि दिसून येतात. ''धर्म म्हणजे लोकांची अफू आहे'' अशासारख्या वाक्यांतून खरा मार्क्सचा नादच ऐकूंच् येतो. ''जेथें राजशाहीच्या मताला आधिक्य आहे तेथें मानवांचें अल्पमत असणार'', ''जेथें राजशाही तत्त्वाला कोणीच विरोध करीत नाहींत तेथें माणसेंच नाहींत असें समजावें'', ''तत्त्वज्ञान्यांनीं आतांपर्यंत जगाचें विवरण करण्यापेक्षा--जगाचा अर्थ सांगण्यापेक्षां अधिक कांहीं केलें नाहीं.... पण आम्ही जग बदलूं इच्छितों; जगाला बदलणें हें आमचें काम आहे.''