डार्विनच्या मतें त्याचें स्वत:चें कर्तव्य आमरण सारखें श्रमत राहणें हें होतें. आपल्या बांधवांना ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठीं अविरत झटणें हें त्याचें कर्तव्य होतें. पण श्रम करतांना त्याला वरचेवर दोन अडथळे येत. तो सुखी व संपन्न असल्यामुळें त्याला फार श्रमण्याची संवय नव्हती. प्रकृति बरी नसल्यामुळें काबाडकष्ट करणें त्याला अशक्यच होई. पण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यानें या दोन्ही अडचणींवर जय मिळविता. सुखासीनतेची संवय त्यानें सोडून दिली. पत्नीच्या प्रेमळ सेवापरायणतेमुळें शारीरिक व्यथेची व आजाराची अडचण दूर झाली. डार्विनची पत्नी अत्यंत दयाळू व फार थोर स्त्री होती. डार्विननें तिला 'अत्युत्तम व अति प्रेमळ' असें संबोधून अमर केलें आहे. ''अशी पत्नी लाभल्यामुळेंच मी ताण सहन करूं शकलों व शेवटपर्यंत नीट धडपड चालविली'' असें डार्विननें लिहिलें आहे. डार्विन नेहमीं आजारी आजारीच असावयाचा; त्याच्या पत्नीनें त्याच्या या प्रकृतीला अनुरूप असें शांत जीवन ठेवलें; कधीं आदळआपट नाहीं, कधीं रागावारागावी नाहीं. ती त्याला उत्साह देई, पण टोंचीत नसे. 'भराभरा आटपा' असें ती कधीं म्हणत नसे. त्याच्या प्रयोगांशीं ती परिचित राही, प्रुपेंच् तपासण्याच्या कामीं त्याला मदत करी व त्याला शारीरिक वेदना होत तेव्हां त्याची इतक्या प्रेमळपणें व कनवाळूपणें शुश्रूषा करी कीं, तो म्हणे, ''तुझ्याकडून शुश्रूषा करून घेण्यासाठीं आजारी पडणेंहि बरें.''

एम्माचें डार्विनवर जितकें प्रेम होतें तितकेंच डार्विनचें एम्मावरहि होतें. दोघांचें हें अन्योन्य प्रेम त्यांच्या मुलांच्या स्वभावांत पूर्णपणे उतरलें होतें. पूर्णपणें विकसित अशा जीवांचें हें कुटुंब होतें. त्यांचें संवर्धन फारच उत्कृष्टपणें झालें होतें. तीं मुलें आनंद, सौम्यता व अन्योन्य-आदर अशा वातावरणांत वाढलीं होतीं. आदरभार म्हणजे काय ? दुसर्‍यांच्या भावनांची सहानुभूतिपूर्वक जाणीव. सानुकंप विचार म्हणजेच सद्भाव, आदरभाव. डार्विनच्या चारित्र्याची ही मुख्य किल्ली आहे. वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यानें लंडनला शेवटची भेट दिली. आपल्या एका मित्राच्या घरांत शिरत असतां त्याला घेरी येऊं लागलीसें पाहून त्याचा मित्र बाहेर गेलेला होता तरी आचार्‍यानें त्याला 'आंत या ना ?' असें म्हटलें; पण बटलरला कशाला उगीच त्रास, या भावनेनें डार्विन आंत न जातां धडपडत बाहेर गेला व गाडी पाहूं लागला. पुढें तीन महिन्यांनीं म्हणजे १८८२ सालच्या मार्चच्या सातव्या तारखेस तो मरण पावला. त्याला मरणाची यत्किंचितहि क्षिति वाटली नाहीं. तो मरण्यास तयारच होता. त्याच्या अधार्मिक मतांसाठीं त्याच्या शत्रूंनीं त्याला नरकाचा धनी ठरविलें; पण एका धर्मशील स्त्रीच्या मतें, ''तो इतका चांगला होता कीं, तो खात्रीनें स्वर्गासच गेला असला पाहिजे. डार्विनचें ईश्वराशिवाय चालेल, पण त्या सर्वशक्तिमान् प्रभूचें डार्विनशिवाय कसें चालणार ?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel