- ३ -

ल्यूथरनें धार्मिक वादळ उत्पन्न केल्यामुळें त्याला १५१८ सालच्या ऑक्टोबरांत ऑग्सबर्ग येथें बोलावण्यांत आलें व बंडखोर विचार सोडून देण्याबद्दल आज्ञा करण्यांत आली. पण ल्यूथर ठाण मांडून उभा होता. त्यानें कांहींहि करण्याचें नाकारलें. तो जर्मनींत फारच लोकप्रिय होता. दोन वर्षेपर्यंत चर्च त्याच्या वाटेला गेलें नाहीं. पण सौम्यतेनें मन वळवून काम होत नाहीं असें आढळतांच पोप छळण्यास उभा राहिला. १५२० सालच्या जूनमध्यें एक आज्ञापत्र काढून 'ल्यूथरचीं मतें अधार्मिक आहेत' असा शिक्का पोपनें त्यांवर मारला आणि ल्यूथरचीं सर्व पुस्तकें जाळून टाकण्याची आज्ञा केलीं. त्यानें ल्यूथरला क्षमा मागण्यासाठीं साठ दिवसांची मुदत दिली. तेवढ्या मुदतींत क्षमा मागून आपलें म्हणणें मागें न घेतल्यास त्याला शापित ठरविण्यांत येईल अशी धमकी दिली ! ल्यूथरनें शापित होणेंच पसंत केलें. पोपच्या पत्रकाला त्यानें तेजस्वी उत्तर देऊन पोपला त्याच्या चिल्यांपिल्यांसकट आशीर्वादपूर्वक सैतानाकडे पाठवून दिले. विटेनबर्ग येथील जनता व विद्यार्थी यांचा उत्साह उचंबळला. ल्यूथरनें पोपच्या पत्रकाची व विरोधकांच्या लिखाणाची जाहीररीत्या होळी केली !

पोपनें नाटकाच्या शेवटच्या अंकाची सजावट सुरू केली व पाखंडी ल्यूथरला भस्मसात् करण्याचें ठरविलें. पण अंकाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्य पात्रच पळून गेलें ! ल्यूथरला त्याच्या इच्छेविरुध्द त्याच्या मित्रांनीं वार्टबर्गच्या किल्ल्यांत नेलें व तो तेथें नांव बदलून राहूं लागला. जर्मनीमध्यें नव्या कराराचें ग्रीकमधून भाषांतर करून तो आपला वेळ घालवीत होता. 'बायबल प्रत्येकाला वाचतां आले पाहिजे' असें वुइक्लिफप्रमाणेंच त्याचेंहि मत होतें व पोपांचीं भाष्यें, विवरणें व स्पष्टीकरणें वाचण्याऐवजीं बायबल स्वत: वाचून स्वत:च त्याचा अर्थ करावा असें त्यानें प्रतिपादिलें.

ल्यूथर अदृश्य झाल्यावर एक महिन्यानें सम्राटानें 'ल्यूथर चर्चचा पाखंडी शत्रु व स्टेटचाहि वैरी आहे' असें जाहीर केलें. ल्यूथर कायद्याच्या ऐहिक व पारमार्थिक बाहूंत (दोर्दंडांत) सांपडला. ल्यूथर आतां एक तर कायमचा अंधारांत तरी गडप होणार अगर हुतात्मा तरी होणार असें स्पष्ट दिसत असतां पुन: त्याला दैवानें हात दिला. कारण याच वेळी फ्रेंचांनीं जर्मनीशीं युध्द सुरू केल्यामुळें नास्तिकांना माफी देण्यांत आली ! सम्राट् दहा वर्षे युध्दांत गुंतल्यामुळें ल्यूथरला आपल्या सुधारणेची योजना आंखून कार्यक्रम निश्चित करण्यास भरपूर वेळ मिळाला.

त्याला प्रारंभीं तरी कॅथॉलिक चर्चपासून अलग होण्याची इच्छा नव्हती, नवीन धर्म सुरू करण्याचीहि त्याची मनीषा नव्हती. तो जुन्याच धर्मांतील दोष काढून टाकूं इच्छीत होता. त्याचा धर्मोपाध्यायांच्या उद्दामपणाला विरोध होता. या धर्मोपाध्यायांनीं आपण इतरांहून श्रेष्ठ असें कां समजावें हेंच त्याला कळेना. चर्चच्या अधिकार्‍यांनीं केवळ ईश्वराचेच सेवक होऊन भागणार नाहीं, तर त्यांनीं जनतेचेहि सेवक झालें पाहिजे असें त्याला वाटे. ल्यूथरनें धर्मोपदेशकांना ''सामान्य लोकांप्रमाणें राहा, विवाह करा, आपली वागणूक सुधारा, आढ्यतेनें जनतेपासून दूर राहूं नका, निराळे पोषाख नकोत, कांही नको !'' असें सांगितलें.

चर्चच्या कांहीं उत्सव-समारंभांनाहि ल्यूथरचा विरोध होता. एका विशिष्ट पध्दतीनेंच प्रार्थना केली पाहिजे असा सनातनी कॅथॉलिकांचा आग्रह असे. ल्यूथर म्हणे कीं, आपलीच प्रार्थनापध्दति प्रभूला अधिक पसंत पडेल. अर्थातच हा प्रश्न औपचारिक होता. पण सोळाव्या शतकांत औपचारिकपणालाहि फार महत्त्व असे. एकाद्या धार्मिक वचनाचा अर्थ कसा लावावा यावर रणें माजत, कत्तलीहि होत ! एकाद्या अध्यात्मिक वाक्यांत स्वल्पविराम कोठें असावा इतक्या क्षुल्लक मुद्दयावरूनहि युध्दें पेटत !

ल्यूथरची सनातन कॅथॉलिक चर्चवरची श्रध्दा अजीबात उडाली होती असें नव्हे. 'थोडीं नवीं तत्त्वें, थोडे नवे विचार, कांहीं नवे विधि-निषेध, कांहीं जुन्या अवडंबरांची छाटाछाट' असें जुनें चर्च सुधारण्याचें त्याचें धोरण होतें. त्याचे कांहीं विचार उदात्त असले तरी त्याचें पुष्कळसें म्हणणें हास्यास्पदच होतें. त्याला नवें बांधावयाचें नव्हतें तर जुन्यालाच थोंडेंसें वळण द्यावयाचें होतें. त्याला कॅथॉलिकांनीं बहिष्कृत केल्यामुळेंच तो स्वत:चें नवें प्रॉटेस्टंट चर्च स्थापण्यास सिध्द झाला. कॅथॉलिक चर्च व प्रॉटेस्टंट चर्च यांत केवळ बाह्यत:च फरक होता असें नव्हे, तर आंतर फरकहि होणार होता. दोन्ही चर्चमध्यें अंतर्बाह्य भेद होता. प्रॉटेस्टंट चर्चमध्यें जो तो आपआपला धर्मोपाध्याय होता. ईश्वर व भक्त यांच्या दरम्यान मधल्या पंड्यांची जरुरी राहिली नव्हती. प्रत्येकास आपापल्या इच्छेनुसार ईश्वराची पूजा करण्याची मुभा देण्यांत आली होती. प्रॉटेस्टंट पंथीयांनीं पोपची सत्ता मानण्याऐवजीं बायबलची सत्ता मानावाची होती व हें आपलें धोरणच अधिक चांगलें असें प्रॉटेस्टंट रोमन कॅथॉलिकांना पटवून देत असत.

पण आतां प्रॉटेस्टंट व कॅथॉलिक एकमेकांस जाळूं लागले, फांशीं देऊं लागले. चर्चच्या पूर्वीच्या कांहीं पाद्र्यांप्रमाणें ल्यूथरहि आपल्या अनुयायांना सर्वांत महत्त्वाची एक गोष्ट सांगावयाला विसरला. त्यानें धार्मिक सहिष्णुतेचें महत्त्व शिकविलें नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel