५.    'कंजूष असा' हें पांचवें सूत्र. कृपणपणा करा. मॅकिआव्हिली आपल्या पाशवी नीतिशास्त्रांत पुढें सांगतो कीं, शक्य तों दुसर्‍यांच्या पैशांतून खर्च चालवावा व स्वत:चा पैसा वाचवावा. आपल्या प्रजेचें मनोरंजन करण्यांत राजानें उधळपट्टी करूं नये. स्वत:च्या पैशानें खावें, पण मेजवान्या वगैरे देऊं नये. प्रजेसाठीं खूप द्रव्य खर्च केल्यास उदारात्मा म्हणून कीर्ति होईल. पण लवकरच जवळचें सारें संपेल, प्रजेवर अधिक कर बसवावें लागतील व शेवटीं नाश होईल. स्वत:च्याच देशांत उभारलेल्या व मिळविलेल्या पैशांतून उदारपणा दाखविणार्‍या राजाचा शेवटीं विनाश होतो. ''स्वत:चें जें आहे तें देऊन टाकाल तर शेवटीं पस्तावाल.'' पण युध्दांत परकीयांपासून लुटून आणलेल्या पैशानें उदारपणा खुशाल दाखवावा, प्रजेचें वाटेल तितकें मनोरंजन करावें. कारण, त्यामुळें प्रजा राजाला उदार म्हणेल, इतकेंच नव्हे तर त्याच्यासाठीं ती लढावयाला व मरावयालाहि सदैव तयार राहील.

६.    'पशुवत् वागा' हें सहावें सूत्र. राजानें सौम्य वा मृदुप्रकृति असून कधींहि चालणार नाहीं. सर्वांना गुलाम करणें हें तर राजाचें काम. मॅकिआव्हिली सांगतो, ''सीझर बोर्जिया समकालीन राजांहून श्रेष्ठ आहे; कारण, तो सर्वांहून अधिक दुष्ट आहे.'' (पण या दुष्टपणामुळेंच या सीझर बोर्जियाचें भाग्य अस्तास गेलें हें मॅकिआव्हिलीला दिसलें नाहीं.) स्पेनचा राजा फर्डिनंड याच्या दुष्टपणाचीहि मॅकिआव्हिलीनें स्तुति केली आहे. मॅकिआव्हिली म्हणतो, ''पशु असेल तोच यशस्वी राजा होऊं शकेल. जे न्यायाचे भक्त आहेत, दुष्टपणाचे वैरी आहेत, दयाळू आहेत, ज्यांच्याजवळ माणुसकी आहे, अशा सम्राटांची शेवटीं वाईट गत होते. चांगुलपणा अंतीं फलदायक ठरत नाहीं. प्रजेनें नेहमीं आज्ञा पाळावी व सैनिकांनीं आदर दाखवावा म्हणून राजानें सदैव कठोरच राहिलें पाहिजे. स्वत:मधली माणुसकी मारून त्यानें पशूच झालें पाहिजे.

७.    'संधि सांपडेल तेव्हां तेव्हां दुसर्‍यांना फसवा' हें सातवें सूत्र. प्रतिस्पर्ध्यांस चिरडण्यासाठीं मनुष्यानें जाणूनबुजून पशु झालें पाहिजे, असें मॅकिआव्हिलीचें मत आहे. राजानें सिंहाप्रमाणें भीषण व कोल्ह्याप्रमाणें धूर्त झालें पाहिजे. ''कोल्ह्याप्रमाणें ज्याला नीट वागतां येतें, तोच नीट यशस्वी होऊं शकतो.'' न्यायापेक्षां बळाची प्रतिष्ठा अधिक आहे. कापट्य सत्याहून बलशाही आहे. राजानें वचन-पालनाच्या भ्रमांत कधींहि राहूं नये. या जगांत कोणीच दिलेलें वचन पाळीत नाहीं. ''सारेच लोक चांगले असते तर असा उपदेश करणें चुकीचें झालें असतें; पण लोक दुष्ट असतात, त्यांचा कोणावर विश्वास नसतो,  म्हणून आपणहि कोणावर विश्वास ठेवूं नये.'' राजाला शेंकडों सबबी सांगणें शक्य असतें.'' कारण, बहुतेक लोक शुध्द नंदीबैल असतात. फसवलें जाण्यासाठीं, नकळत लुबाडलें जाण्यासाठीं हें जग सदैव तयारच असतें.

अर्वाचीन काळांतील मुत्सद्देगिरी व व्यापारधंदा यांचा मॅकिआव्हिलीच जनत आहे ही गोष्ट आपणांस दिसून येईल. यशस्वी होणारा मुत्सद्दी वा धंदेवाला हा मॅकिआव्हिलीच्या सांगण्याशींच अधिक जवळ असतो व ख्रिस्ताच्या आज्ञांपासून फार दूर असतो असें दिसून येईल. पण तें जाऊं द्या. मॅकिआव्हिलीचें 'राजा' हें पुस्तक आपणांस अद्यापि पाहावयाचें आहे.

८.    'शत्रूंना तर ठार कराच करा, पण जरूर तर मित्रांनाहि' हें आठवें सूत्र. ज्या युगांत मॅकिआव्हिली राहत होता तें माणुसकीला पारखें होतें. सोळाव्या शतकांतील प्रमुख खेळांपैकी प्राण्यांची शिकार व नास्तिकांना जाळणें हे दोन खेळ लोकप्रिय होते; करमणुकीचीं हीं आवडतीं साधनें होतीं. त्या काळांतील एका सम्राटाला मनुष्याच्या पचनक्रियेची सर्व माहिती समजून घेण्याची इच्छा झाली. एकाद्या वैद्यशास्त्राचा विद्यार्थी दोन बेडूक फाडतो त्याप्रमाणें त्या सम्राटानें दोन जिवंत माणसांची आपल्यासमोर चिरफाड करून घेतली व आपली ज्ञानतृष्णा भागविली. शेंकडों वर्षे लढाया सारख्या चालू असल्यामुळें मनुष्यांचीं हृदयें दगडासारखीं झालीं होतीं; मानवी प्राणांची किंमतच नाहींशी झाली होती; खून म्हणजे एक मामुली बाब वाटे, मित्रांची फसवणूक म्हणजे जणूं मान्य कायदा ! जीवनाच्या या शिकारींत अशा गोष्टी क्षम्यच नव्हत तर कर्तव्यहि भासत, त्यामुळें मॅकिआव्हिलीचें बोलणें लोकांना पट्कन् पटे. त्याच्या तर्कशास्त्रांतले हे सारे दुवे ऐकावयाला ते तयार असत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel