अलेक्झांडर आश्चर्यकारक वेगानें आशियांतील देश एकामागून एक घेत चालला.  त्याला हे असंभाव्य विजय सारखे मिळत गेल्यामुळें त्याचे शत्रूहि एक प्रकारच्या भोळसट आदरानें त्याच्याकडे पाहूं लागले.  हा कोणी देवच आकाशांतून पृथ्वीवर अवतरला आहे असें त्यांस वाटूं लागलें.  अलेक्झांडर एकाच वेळीं अनेक ठिकाणीं असतो अशा कथा पसरूं लागल्या.  त्याच्याविरुध्द शत्रूंनीं उभारलेल्या प्रचंड फौजा न लढतां आपोआप मोडल्या.  शत्रूचे सैनिक लढेनासेच झाले.  त्या प्रचंड सेनांचा पराजय अलेक्झांडरनें नाहीं केला, तर अलेक्झांडरविषयीं त्यांना वाटणार्‍या भीतीनें केला.

अलेक्झांडर वेडा होता खराच, पण तो तेजस्वी वेडा होता.  त्याचें वेडेपण क्षुद्र नव्हतें ; त्यांतहि एक प्रकारची ऐट होती.  आपण देव आहों असें त्यालाहि वेडाच्या लहरींत वाटे.  देव समजून आपली पूजाअर्चा लोकांनीं करावी असा आग्रह तो धरी.  एकदां त्याच्या मांडीवर प्रहार झाला तेव्हां इतरांच्या रक्ताप्रमाणेंच आपलेंहि रक्त आहे असें पाहून त्याला विस्मय वाटला.  कारण अमर अशा देवांच्या नसांतून जें दिव्य रक्त वाहतें तेंच आपल्याहि नसांत आहे अशी त्याची समजूत होती.  लढाईंच्या वेळीं तो आकशांतील देवतांना आपल्या साह्यास बोलावी ; तो त्यांना उद्देशून म्हणे, '' मी तुमचा भाईबंद आहें ; मी मर्त्य नाहीं हें विसरूं नका.''

त्याचे उत्कट व निष्ठावंत भक्तहि त्याचा हा अहंकारी पागलपणा पाहून कधीं कधीं थक्क होऊन जात !  स्वत:च्या क्षुद्र अहंकाराच्या आरशांत तो आपलें रूप पाही.  जगांतल्या सार्‍या क्षुद्र व दुबळ्या लोकांमध्यें आपण ज्युपीटरप्रमाणें शोभत आहों असें त्याला वाटे.  ज्युपिटर म्हणजे ग्रीकांचा युध्ददेव, जणूं ग्रीकांचा देवेन्द्रच ! अधिक पुढें जावयाचें नाहीं असें ठरविल्यावर हिंदुस्थानांतून जेव्हां तो परत फिरला तेव्हां त्यानें आपल्या घोड्यांचे लगाम, चिलखतांचे तुकडे व शिरस्त्राणांचे भाग मुद्दाम मागें ठेवले.  या सार्‍या वस्तू हेतुपुरस्सरच आकारानें प्रचंड अशा बनविण्यांत आल्या होत्या.  त्या पाहून मॅसिडोनियन सैन्यांतील लोक व घोडे प्रचंड आकाराचे, अजस्त्र होते असें हिंदूंना वाटावें असा हे अवशेष मागें ठेवण्यांत त्याचा हेतु होता.  त्याला स्वत:चें सर्व कांहीं पवित्र वाटे.  आशियांतील एका नव्या शहराला त्यानें आपल्या घोड्याचें व दुसर्‍याला आपल्या कुत्र्याचें नांव दिले !  त्याची ही आत्मप्रदर्शनाची वृत्ति, त्याची ही जाहिरातबाजी तिरस्करणीय व किळसवाणी वाटते.  जेव्हां त्याची विजयी सेना कार्यानियांतून जात होती, तेव्हां त्यानें एका प्रचंड व्यासपीठावर मेजवानी मांडली होती !  तें व्यासपीठ आठ घोडे ओढीत होते व त्यावर खान-पान चाललें होतें !  त्या चालत्या व्यासपीठावर तो आपल्या खुशमस्कर्‍यांसह खात-पीत बसला होता.  शहरामधून मूर्खांची ती मिरवणूक गेली तेव्हां मॅसिडोनियन मेजवानीमधील पोकळ ऐट व क्षुद्र अवडंबर पाहून पौर्वात्य दिङ्मूढ झाले !  हा मूर्खपणा कीं पराक्रम हें त्यांना समजेना.

त्याची वृत्ति इंग्लंडमधील हवेप्रमाणें चंचल होती.  त्याचा स्वभाव क्षणाक्षणास पालटे.  एका क्षणांत तो सौम्यपणा सोडून सैतानीपणा स्वीकारी !  एकदां त्याच्या सेना वाळवंटांतून जात असतां एका शिपायानें आणून दिलेलें पेय त्यानें नाकारलें.  कारण, सेनापतीनेंहि सर्वसामान्य शिपायांबरोबर तहान सोसली पाहिजे, त्यांचे जीव तहानेनें व्याकूळ होत असतां आपण पेय पिणें योग्य नव्हे, असें त्याला वाटलें.  पण पेय देणार्‍या एका नोकराकडून त्याचा एकदां चुकून अपमान झाला त्याबरोबर त्यानें दोन्ही हातांनीं त्याचे केस धरून त्याचें डोकें जोरानें भिंतीवर आपटलें !  त्याचें डोकें ठिकाणावर असे तेव्हां तो होमर वाची.  निशेच्या भरांत त्यानें आपला प्रियतम मित्र क्लायटस याला ठार मारलें ; पण शुध्दीवर आल्यानंतर त्याला झालेला पश्चात्ताप त्याच्या दारूच्या धुंदींतील खुनशीपणाइतकाच तीव्र होता.  स्तुति करणार्‍यांना तो लुटींतील भाग देई.  पण कॅलिस्थेनिस नामक एक तत्त्वज्ञानी त्याची देव म्हणून पूजा करीना म्हणून त्यानें त्याला फांशी दिलें !  त्याचा सर्वांत मोठा डरायस नामक शत्रु मेला तेव्हां तो रडला.  पण रोजची करमणूक म्हणून तो हजारों युध्द-कैद्यांची कत्तल करी !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel