त्याचे शब्द म्हणज पोकळ वचनें नसतात, तो कृतींचा आरंभ असतो. रुझवेल्ट हा व्यवहारकुशल अमेरिकन आहे. अमुक गोष्टी झाल्याच पाहिजेत असें त्याचें धोरण असतें. होत नाहींत म्हणजे काय ? कूलिज म्हणे ''आपल्या देशांत कायदे वाजवीपेक्षां जास्त आहेत.''  रुझवेल्ट म्हणतो, ''कायदे वाजवीपेक्षां कमी आहेत, आणखी पाहिजेत.''  याचा अर्थ हाच कीं, प्रबळांपासून दुर्बळांचे रक्षण करण्यास पुरेसे कायदे नाहींत. म्हणून अध्यक्षपदीं निवडून येतांच रुझवेल्ट निश्चयानें व खंबीरपणें नव्या कामास लागला. हें नवें काम म्हणजे न्यायाची सुसंबध्दता-नवी व्यवस्था. असें रुझवेल्टनें केलेल्या कायद्यांचें थोडक्यांत परीक्षण केल्यास दिसून येईल की तो ख्रिश्चन धर्माची अमलबजावणी करूं पाहत होता. ख्रिश्चन तत्त्वें सामाजिक जीवनांत आणण्याचा त्याचा तो प्रचंड प्रयोग होता. या त्याच्या नव्या कायद्यांना 'नका कारभार' असें म्हणतात. त्याच्या 'न्यू डील' चे प्रमुख विशेष पाहूं या.

१९४३ सालच्या मार्चच्या चौथ्या तारखेस हूव्हरनें रुझवेल्टला एके काळीं अति प्रबळ असलेल्या आर्थिक रचनेचें प्रेत दाखविलें. नवा प्रेसिडेंट रुझवेल्ट झाला होता व त्याच्यावर आर्थिक रचनेंत प्राण ओतण्याच्या आवश्यक कार्याची जबाबदारी होती. रुझवेल्टनें तें काम हिमतीनें उचललें व त्यांत यश मिळविलें. बँकर्सना त्यानें अधिक प्रामाणिक केलें. ते कमी दिवाळें काढतील असे केलें. त्याच्यापूर्वी कित्येक वर्षे इतके प्रामाणिक बँकर्स कधींहि नव्हते. पूर्वी सदैव निघत असलेली दिवाळी निघणें बंद झालें. ठेवी ठेवणारांचा बँकवाल्यांवर पुन: विश्वास बसला. दारूबंदीचा पोरकट कायदा त्यानें रद्द केला. कृतज्ञ राष्ट्रानें पुन: शहाणपणा व विवेक यांचा अंगीकार केला. दारू मिळून राष्ट्र ताळयावर आलें.

नंतर तो शेतकर्‍यांना दारिद्र्यांतून वर काढण्यासाठीं पुढें सरसावला. त्यानें शेतकर्‍यांना सांगितलें कीं, 'कमी पैदास झाली तर सरकार नुकसानभरपाई देईल.'  यामुळें स्टॉक-एक्सचेंजमधले वायदेवाले, रेलरोड व इतर आंतरराष्ट्रीय उद्योगधंद्यांचे चालक व इतर लहानमोठे श्रमजीवी लोकांच्या रक्तावर पोसणारे व आपल्याच बंधूंच्या हालअपेष्टांवर जगणारे लोकहि स्तंभित झाले. अकिंचनांची बाजू घेणारा त्यांचा कैवारी प्रेसिडेंट उभा राहतांच स्वार्थी पुंजीपतींचे खेळ बंद झाले, त्यांचीं स्वार्थी कारस्थानें बंद पडलीं. पण अजूनहि त्यांचें आश्चर्य कमी झालें नाहीं. रुझवेल्टच्या नव्या डीलला घाणेरडीं नांवें ठेवून ते त्याचे श्रेय नष्ट करूं पाहत होते. संपत्तीची अधिक चांगल्या रीतीनें विभागणी व्हावी असें तो म्हणतो. पण टीकाकार म्हणतात, 'रुझवेल्ट समाजवादच आणीत आहे.' गरिबांचीं घरें नीट बांधून देण्याची योजना, आजारीपण, बेकारी व वार्धक्य यांसाठीं तरतूद करणें, बालश्रमाची पध्दत बंद करणें इ० कार्यक्रमांकडे हे टीकाकार भीतीनें पाहतात. वारसांवरील कर वाढविणें, बड्या उत्पन्नांवरचे कर वाढविणें, असंरक्षित दरिद्री जनतेच्या हक्कांची पायमल्ली घटनाकायद्यानें होत असल्यास त्या घटनेंत चूक आहे असें दाखविणें, इत्यादि रुझवेल्टच्या कृत्यांनीं पुंजीपती घाबरले, गडबडले. सरकारी भांडवल घालून टेन्नेस्सी व्हॅली समाजाच्या उपयोगासाठीं नांवारूपास आणण्याचा प्रयोग पाहून तर हवा तसा फायदा घेण्यास सवकलेले चंदूलाल थक्कच झाले ! हा प्रयोग फार धोक्याचा आहे, यांत क्रांतीची-समाजवादाची बीजें आहेत असें ते म्हणूं लागले. पण हा प्रयोग यशस्वी करण्याची मोठी महत्त्वाकांक्षा रुझवेल्ट धरीत आहे. तो या शेवटच्या प्रयोगांत यशस्वी झाल्यास उद्योगधंद्यांतील स्वार्थीपणावर प्राणांतिक प्रहार केलासें होईल, म्हणून हें धोरण अयशस्वी करण्यासाठीं वॉलस्ट्रीटमध्यें कारस्थानें चालू आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel