- २ -

या धर्मयुध्दांतील पहिलें युध्द उद्भवण्याचें कारण प्रथम पाहूं या.  शार्लमननें चाबूक मारून मारून नाखुष व हट्टी युरोपला नवधर्माची दीक्षा दिली होती, जुना धर्म लोपला होता व चर्चचे बडे बडे अधिकारी दिवसेंदिवस व्यभिचारी व अध:पतित होत होते.  कांही उदारात्मे त्या काळींहि होतेच.  खर्‍या भक्तिप्रेमानें रंगलेले, ख्रिस्ताला शोभेसे कांहीं सौम्य व शांत लोक या काळांतहि आढळतातच.  पण अशा लोकांना चर्चमध्यें महत्त्वाचें स्थान नसे.  क्षुद्र प्रवृत्तीचींच माणसें बहुधा अधिकाराच्या जागांकडे ओढलीं जात असतात.  धकाधकी करणारे, पुढें घुसणारे, अहंमन्य, स्वार्थपरायण लोकच सत्तेसाठीं हपापलेले असतात.  त्यांना झगडे करण्यांत कसलीहि दिक्कत वाटत नाहीं.  वाटेल तें करावयाला ते तयार असतात, बिलकुल मागेंपुढें पाहत नाहींत.  असे लोकच पुष्कळदां चर्चमधल्या बड्या बड्या जागांवर निवडून येत.  बहुतेक सर्व पोप मूर्तिमंत पापात्मेच असत.  प्राचीन रोमन सम्राटांप्रमाणें पोपहि भराभर धर्माच्या गादीवर येत व पुष्कळांचे खून होत.  कोणांकोणांवर विषप्रयोगहि होत.  पोप सहावा स्टीफन, पोप बारावा जॉन, पोप सहावा अलेक्झांडर वगैरे दाखवून देतात कीं, सत्य हें कादंबरीहूनहि विचित्र व कुरूप असूं शकतें.  जरा गंभीर वृत्तीच्या इतिहासकारांनीं अनुल्लेखानें या पापात्म्यांच्या दुष्कृत्यांची जगाला विस्मृति पाडली आहे किंवा रोमनें उतारे टाळून 'त्यांचीं कृत्यें जग-जाहीर होणार नाहींत' याबद्दल काळजी घेतली आहे.  या पोपांचीं ख्रिश्चन धर्माला न शोभणारीं दुष्कृत्यें पुन: जिवंत करून सांगणें ठीक होणार नाहीं व त्याचा तादृश उपयोगहि नाहीं ; यांचें खासगी जीवन कादंबरीकारांस करमणुकीचें वाटेल, पण इतिहासकाराला त्याचा काडीचाहि उपयोग नाहीं.  एक गोष्ट आपण ध्यानांत घेऊं या कीं, असल्या लोकांच्या द्वेषमत्सरांतूनच रोमन कॅथॉलिक चर्च व ग्रीक चर्च यांच्यामध्यें भीषण मतभेद माजले !  मुळांत ख्रिश्चन धर्मांतील कांहीं मतभेदांवरच हे दोन्ही संप्रदाय उभे होते ; पण पुढें दोन्ही बाजूंस वैयक्तिक महत्त्वाकांक्षा उभ्या राहिल्या.  इ.स. १०५४ मध्यें रोमन चर्चच्या पदाधिकार्‍यांनीं ग्रीक चर्चच्या पदाधिकार्‍यांना कह्यांत ठेवतां येत नाहीं असें पाहून ग्रीक चर्च धर्मबाह्य ठरविलें व 'ग्रीक चर्चचे सारे पाद्री कायमचे नरकांत पडतील'' असें उद्‍घोषिलें.  ग्रीक चर्चहि स्वस्थ बसलें नाहींच.  त्यानेंहि त्याच प्रकारें उत्तर दिलें.  क्रूसेड्स् या नांवानें जो विनाशाचा भीषण भोंवरा पुढें सारखा फिरूं लागला त्यांत मिसळलेल्या अनेक प्रवाहांपैकीं ग्रीक चर्च व रोम चर्च यांतील भांडण हा मुख्य प्रवाह होता.  क्रूसेड्समधील पहिलें युध्द म्हणजे केवळ ख्रिश्चनांचा मुसलमानांवरील हल्ला नसून त्यांत ग्रीक चर्चला शरण आणण्याचाहि डाव होता.

क्रूसेड्सचें दुसरें एक कारण म्हणजे नॉर्मन लोकांनीं केलेल्या स्वार्‍यांमुळें सर्वत्र उत्पन्न झालेली अशांतता तद्वतच बेदिली.  हे नॉर्मन लोक युरोपच्या पूर्वेस व पश्चिमेस सर्वत्र लोंढ्याप्रमाणें पसरले.  युरोपांतील आधींच लोकसंख्या खूप वाढलेल्या देशांत नॉर्मनांची आणखी गर्दी झाली.  त्यांनीं हजारों घरेंदारें बळकावलीं.  त्यामुळें घरांदारांला मुकलेले लोक युरोपभर भटकत होते.  ते आशियावर स्वारी करून परधर्मीयांना त्यांच्या घरांतून हुसकून द्यावयाला अधीर झाले होते.  ते या कामासाठीं तयारच होते.

तिसरें कारण युरोप व आशिया यांमधील व्यापारी स्पर्धा.  क्रूसेड्सच्या नेत्यांना जेरुसलेम क्षेत्र ख्रिश्चनांस सुरक्षित करावें असें तर वाटत होतेंच, पण त्याहिपेक्षा युरोपच्या व्यापारासाठीं जग बिनधोक करावें असें अधिक तीव्रतेनें वाटत होतें.  क्रूसेड्स् करणारांना हाच हेतु अधिक उदात्त वाटत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel