पण मॅजिस्ट्रेट व जेलर जॉर्जला भयंकर माणूस मानीत. जगांत शांति असावी असें तो म्हणे, म्हणूनच शांतीला त्याचा धोका होता असें मानून ते त्याला तुरुंगांत ठेवूं इच्छीत. त्याला नास्तिक, पाखंडी, शठ, देशद्रोही म्हणण्यांत येई. दंडे मारून त्याच्या डोक्यांतले शांतीचे विचार ते काढून टाकूं पाहत. त्याचा शांतीचा रोग गेला असें वाटून त्याला मुक्त करण्यांत आलें कीं लगेच त्याचा शांततेचा प्रचार पूर्ववत् पुन: सुरू होई. माणसें वाईट नसतात, तीं स्वभावत: चांगलीं असतात, इ० कल्पनांचा प्रचार त्यानें सुरू केला कीं पुन: त्याला तुरुंगांत अडकवीत. असा हा घरसोडीचा खेळ सारखा चालला होता.
जॉर्जचें शरीर दणकट होतें; तरीहि त्याची प्रकृति शेवटीं तुरुंगांत बिघडलीच. पण तुरुंगाधिकार्यांनीं त्याचें शरीर मारलें तरी त्यांना त्याचें मन मारतां आले नाहीं. इंग्लंडमधील कारागृहाच्या घाणींत व अंधारांत मानवी स्वातंत्र्याच्या ध्येयाचें बीं फुललें.
- ३ -
ऑलिव्हर क्रॉम्वेल इंग्लंडचा हुकूमशहा होता, तेव्हां सरकारविरुध्द कट केल्याच्या आरोपावरून फॉक्सला पकडण्यांत आलें. या आरोपाला उत्तर म्हणून फॉक्सनें क्रॉम्वेलला एक पत्र पाठविलें. त्यांत तो लिहितो, ''ईश्वरसाक्ष मीं अशी घोषणा केली आहे कीं, मी कोणाहि मानवाविरुध्द कधींहि शस्त्र उचलणार नाहीं. तुमच्याविरुध्द किंवा कोणाच्याहि विरुध्द कोणतेंहि पाशवी शस्त्र मी उचलणार नाहीं. ईश्वरानें सर्व हिंसेच्याविरुध्द साक्षी म्हणून मला पाठविलें आहे ! लोकांना अंधारांतून प्रकाशाकडे आणण्यासाठीं मला पाठविण्यांत आलें आहे ! लढाया व लढायांचीं कारणें यांपासून मानवांना परावृत्त करून त्यांना शांततेच्या मार्गावर आणणें हें माझें जीवितकार्य आहे.''
या विक्षिप्त व्यक्तीविषयीं क्रॉम्वेलला कुतूहल वाटलें; त्याची जिज्ञासा जागृत झाली. त्यानें फॉक्सला बोलावलें. सकाळीं सहाव्या सुमारास क्रॉम्बेलच्यासमोर त्याला आणण्यांत आलें. क्रॉम्वेल अंथरुणांत होता. त्याचा पोषाख अर्धवट होता. क्वेकर जॉर्ज फॉक्स आपल्या नेहमींच्या शिरस्त्याप्रमाणें म्हणाला, ''या घराचा शांति लाभो !'' क्रॉम्वेलनें प्रत्यभिवादन केलें. पण तसें करतांना त्यानें जरा स्मित केलें.
ते दोघे धर्म, राजकारण, लढाया, यांवर बोलले. प्रत्येकाला दुसर्याच्या सहानुभूतीविषयीं, सूक्ष्मदृष्टीविषयीं व विचारशक्तीविषयीं आदर वाटत होता, आश्चर्यहि वाटत होतें. दोघेहि क्रान्तिकारक होते. मानवांमानवांत अधिक मोकळेपणाचे, शहाणपणाचे आणि मित्रभावाचे संबंध असावे असें दोघांनाहि मनापासून वाटत होतें. दोघाचेंहि ध्येय एकच होतें; पण दोघांच्या कार्यपध्दतींत व साधनांत दोन ध्रुवांचा फरक होता. जगांत न्यायबुध्दि याची म्हणून क्रॉम्वेल डोकीं उडवीत हाता, तर सर्वांच्या हृदयांत करुणा व भूतदया यांचा उद्भव व्हावा म्हणून फॉक्स धडपडत होता. क्वेकर-पंथाचा पुढारी जॉर्ज फॉक्स हा सुध्दं एक क्रॉम्वेलच होता; पण आपल्याच देशबांधवांचें रक्त सांडण्याचा गुन्हा त्यानें कधींहि केला नाहीं.
फॉक्स जाण्यास निघाला तेव्हां क्रॉम्वेलनें त्याचा हात धरून सजल दृष्टीनें त्याच्याकडे पाहून म्हटलें, ''पुन: एकदां माझ्या घरीं ये. आपण रोज तासभर एकत्र बसल्यास दोघेहि परस्परांच्या अधिक जवळ येऊं. मी आपल्या स्वत:च्या आत्म्याचें वाईट चिंतणार नाहीं तद्वतच तुमचेंहि वाईट चिंतणार नाहीं.'' तेव्हां फॉक्स शून्यपणें येवढेंच म्हणाला, ''तूं माझें अशुभ चिंतिशील तर तूं स्वत:च्या आत्म्याचीच हानि करून घेशील'' आणि पुन: शेवटीं म्हणाला, ''तूं आपलें हृदय कठोर होऊं देऊं नको. मी गेल्यावर पुन: तुझें हृदय निर्भय होईल, जप.'' आणि तो चांभार ॠषि त्या हुकूमशहाला सोडून गेला.