''ही शेवटची लढाई आहे, प्रत्येकानें आपआपली जागा घ्यावी. हा आंतरराष्ट्रीय पक्ष म्हणजे सर्व मानवांचा पक्ष होईल.''  आणि मग तो महामना लेनिन उभा राहिला. तो कसा होता ? तो कसा दिसला ? तो आडव्या बांध्याचा, टक्कल पडलेला व ठेंगणा होता. तो अति साधा व जणूं घरगुती वृत्तीचा दिसे. त्याच्या ठायीं भव्य, दिव्य, कांहींहि नव्हते; एक जीर्ण कोट त्याच्या अंगांत होता, पायांतील विजार त्याला जरा मोठी-लांबच होत होती. पण असा हा साधा लेनिन उभा राहतांच सर्व श्रोत्यांनीं त्याला जणूं प्रणाम केला ! ती सभा एकदम जणूं प्रेमळ व भक्तिमान् भक्तांचीच होऊन गेली ! ''एक पिकलेल्या केसांचा म्हातारा सैनिक तर मुलाप्रमाणें स्फुंदूं लागला. सारे लोक देहभान विसरून गेले ! ते हंसूं लागले, रडूं लागले, नाचूं लागले, एकमेकांस क्षेमालिंगनें देऊ लागले. ते अपूर्व अशा आनंदसिंधूंत डुंबत होते. असा आनंद कधीं कोणी अनुभवला नव्हता. जनतेच्या या उचंबळलेल्या भावना ओसराव्या म्हणून लेनिन सस्मित उभा होता. तेथील रीडिंग स्टँडची कडा धरून उभ्या राहिलेल्या लेनिनचे लहान, चिमणे डोळे प्रेमानें हंसत होते. त्यानें आपली निर्मळ दृष्टि सर्व सभेवर फिरविली. भावना ओसरून सारे शांत झाल्यावर लेनिन रोजच्या साध्या व्यावहारिक आवाजांत म्हणाला, ''आतां आपण नवीन समाजरचना निर्माण करण्याचें काम सुरू करूं या.''  नवीन वर्षाला आरंभ करतांना एकादा शाळामास्तर बोलतो तसें लेनिन बोलला व जगांतील प्रामाणिक राज्यकारभाराचा पहिला मानवी प्रयोग अशा रीतीनें सुरू झाला.

- ३ -

जनतेचें लेनिनवर जितकें प्रेम होतें तितकें क्वचितच कोणा ऐतिकासिक व्यक्तीच्या वाट्यास आलें असेल. 'न्यू यॉर्क टाइम्स' च्या १९३१ सालच्या जानेवारीच्या अठराव्या तारखेच्या अंकांत वॉल्टर डुरान्टी लिहितो, ''आपल्या अनुयायांशीं बोलत असतांना मी लेनिनला पाहिलें आहे. डोळे दिपविणारा प्रकाश असावा व ती ठेंगणी, सुदृढ, लहान व कार्यमग्न मूर्ति बोलण्यास उभी राहावी. ती उभी राहतांच मेघगर्जनेप्रमाणें टाळ्यांचा कडकडाट होई. मी सभोंवार पाहीं, तेव्हां ईश्वराला समोर पाहणार्‍या लोकांच्या चेहर्‍यांवर तळपणार्‍या तेजासारखे तेज त्या श्रोत्याच्या तोंडावर फुललेलें मला दिसें.

लेनिनवर जनतेचें अपार प्रेम होतें. त्याच्याविषयीं त्यांना अत्यंत थोर पूज्यबुध्दि वाटे. कारण, लेनिन आश्चर्य वाटण्याइतका साधा होता. त्यानें आपली अद्वितीय बुध्दि जनतेच्या सेवेला वाहिली होती. अत्यंत गहन व कठिण गोष्टी तो त्यांना अत्यंत सोप्या भाषेंत समजावून देई. मनांतील विचार त्याला नीट प्रकट करतां येत असत. मुत्सद्दयांच्या बोलण्यांतील दुटपपीपणा व अस्पष्टता त्याच्या बोलण्यांत नसत. त्याचा सारा व्यवहार साधा, सरळ व प्रामाणिक असे. यामुळें तो मनांत असेल तेंच आपल्या भाषणांत सांगे. पोटांत एक व ओंठावर दुसरें असें करण्याची गरजच त्याला कधीं भासली नाहीं. आपल्या हातून कधीं कांहीं चूक झाजली तर ती तोच आधीं कबूल करी. पण त्याचबरोबर दुसर्‍याच्याहि चुका निष्ठुरपणें दाखविण्याचें कटु कर्तव्य तो करी. विशेषत: दुसर्‍यांचा दंभ प्रकट करण्यांत तर तो फारच कठोर बने. क्रांति झाल्यावर पूर्वीच्या कारकीर्दीतील कागदपत्र त्याच्या हातीं आपले व १९१४ सालचें महायुध्द घडवून आणणरे नाना गुप्त तहांचे कागदपत्र त्याला मिळतांच ते त्यानें ताबडतोब प्रसिध्द करून म्हटलें, ''जगांतील या असल्या अप्रामाणिक व दांभिक मुत्सद्दयांचा मी चिरशत्रु आहें.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel