त्याचे पुष्कळसे समकालीन लोक त्याच्या दिमाखानें दिपून जात व त्याला खरोखरच अवतारी मानीत. आजहि त्याच्या नांवाभोंवतीं तेजोवलय आहे. त्याचा एक अगदीं अर्वाचीन चरित्रकार लुई बरट्रांड लिहितो, ''चौदावा लूई हा सर्वांहून थोर फ्रेंच मनुष्य होऊन गेला. तो सर्वश्रेष्ठफ्रेंचमन होय.''  लुई बरट्रांडचें मन मध्ययुगीन आहे. घमंडेनंदन व आदळआपट करणारे लोक त्याला आवडतात. हा चरित्रकार एके ठिकाणीं लिहितो, ''ग्रीसचा होमच, रोमचा व्हर्जिल, इंग्लंडचा शेक्सपिअर, इटलीचा डांटे, जर्मनीचा गटे, तसा फ्रान्सचा चौदावा लुई.'' अशा प्रकारें लुईची अत्यंत स्तुति करून फ्रान्समधील थोर थोर कवी, शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ यांपेक्षांहि आपण चौदाव्या लुईला कां श्रेष्ठ मानतों याची कारणें तो देतो. तो म्हणतो, ''चौदावा लुई हा दैवी राजा होता. फ्रान्समध्यें त्याच्यासारखा दैवी मनुष्य जन्मला नाहीं. त्यानें सारें आयुष्य युध्दंत घालविलें. त्याचें युध्दवर जितकें प्रेम होतें,  तितकें कोणाचेंहि नव्हतें.''

चौदावा लुई युध्दच्या वातावरणांत वाढता. तीस वर्षांचें युध्द संपण्यापूर्वी आठ वर्षे म्हणजे १६३८ सालीं तो जन्मला. युध्दंतील विजय म्हणजे परमैश्वर्य असें त्याला शिकविण्यांत आलें होतें. युध्दप्रिय राष्ट्रांतील विकृत व विपरीत नीति त्याच्या बालमनावर ठसविण्यांत आली होती. गुप्त कारस्थानें खोटें बोलणें, फसवणूक, स्वार्थ, हांव, इत्यादि ध्येयें त्याच्यासमोर ठेवण्यांत आलीं होतीं. या विचारांवर तो पोसला गेला होता. त्याचा चरित्रकार बरट्रांड लिहितो, ''लहानपणापासूनच आपले विचार व आपल्या भावना लपविण्याची आनुवंशिक कला त्याला साधली होती. आपलें स्वरूप लपवून ठेवण्याची गोष्ट अत्यंत फायदेशीर व अवश्यक असते. राजामधला सर्वांत मोठा गुण म्हणजे आपलें स्वरूप समजूं न देणें हा होय.''

आपण मोठें झालें पाहिजे असें लहानपणापासूनच त्याला वाटूं लागलें होतें. 'तूं कोणी तरी मोठा आहेस' असें त्याला लहानपणापासून शिकविण्यांत येत होतें. त्याची जीवनांतील सर्वांत मोठी महत्त्वाकांक्षा हुषार धटिंगण होणें ही होती. त्याच्या शिक्षकांनीं त्याच्यासाठीं नाना प्रकारचे लढाऊ खेळ शोधून काढले होते. त्याचें सारें बालपण भांडणांत व मारामार्‍यांत गेलें. त्याचा स्वभाव वाघासारखा होता. ला पोर्टे नांवाचा त्याचा एक नोकर होता. वयाच्या तेराव्या वर्षी हे लुई महाशय कसे होते, याचें गमतीदार शब्द-चित्र त्यानें रंगविलें आहे. ला पोर्टे लिहितो, ''आम्ही माँटेरोहून कॉर्बील येथें गेलों. तेथें लुईनें आपल्या धाकट्या भावास आपल्याच शय्यागारांत निजण्यास सांगितलें. सकाळीं दोघे भाऊ जागे झाले. चौदावा लुई आपल्या भावाच्या अंथरुणावर थुंकला; तोहि लुईच्या अंथरुणावर थुंकला. लुई रागावून भावाच्या तोंडावर थुंकला, तेव्हां तो धाकटा भाऊ उडी मारून लुईच्या अंथरुणावर गेला व त्यानें तेथें लघुशंका केली ! लुईनेंहि तोच प्रकार भावाच्या अंथरुणावर केला ! ...'' असा हा तेरा वर्षांचा लुई होता.

आणि त्या वेळेस लुई राजा झाला होता. पांचव्या वर्षीच तो गादीवर बसला होता. पण चौदा वर्षांचा होईपर्यंत त्याला राज्याभिषेक करण्यांत आला नव्हता. त्याला राज्याभिषेक होईपर्यंत राज्यकारभार त्याची आईच पाहत होती. कार्डिनल माझारिन त्याला शिकवीत होता. हा इटॅलियन कार्डिनल लुईच्या आईचा प्रियकर होता. कार्डिनल माझारिन मोठा साहसी व नास्तिक होता. त्याची महत्त्वाकांक्षा पोप होण्याची होती. तो स्वत: अति हुषार, लफंग्या व दांभिक होता. त्यानें तरुण लुईला दंभाचें परिपूर्ण शिक्षण दिलें. तो लुईला सांगे, ''मोठमोठ्या सरदार-घराण्यांतल्या लोकांना कस्पटासमान, पायावरील धुळीप्रमाणें मान. दरबारांतील सरदार-दरकदारांशीं कधींहि अधिक परिचय ठेवूं नको. लोक कृपेची याचना करतील तेव्हां चेहरा कठोर कर. मनांतील भाव कधींहि प्रकट न करतां जणूं अनाकलनीय गूढ बन. यांतच खरा राजेपणा आहे. सर्व कारभार गुप्तपणें हांक. कोणालाहि कसलीहि दाद लागूं देऊं नको. शाब्दिक वचनें भरपूर द्यावीं; तीं पूर्ण मात्र कधींहि करूं नये. 'वचन किं
दरिद्रता ?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel