सर्वत्र प्रेम असेल तर माणसें चोर्‍या करणार नाहींत,  राजे व त्यांचे प्रधान उदार होतील, आई-बाप व मुलें यांचे संबंध प्रेमळ होतील, भावांभावांत मेळ व प्रेम राहतील, ते भांडणें पट्कन् विसरतील.  माणसें परस्परांवर प्रेम करतील तर बलवान् दुर्बळांस चिरडणार नाहींत वा खाणार नाहींत, बहुसंख्य लोक अल्पसंख्यांना लुटणार नाहींत, श्रीमंत गरिबांचा अपमान करणार नाहींत, सरदारवर्ग गरीब घराण्यांत जन्मलेल्या श्रमजीवी वर्गाचा उपमर्द करणार नाहीं, त्याच्याशीं अरेरावीनें वा अहंकारानें वागणार नाहीं, कपटी लोक साध्या, सरळ लोकांना फसविणार नाहींत वा त्यांच्या डोक्यावर बसणार नाहींत.''

चिनी ॠषीची ही वाणी हिब्रू भाषेंत भाषांतरिली तर हेच शब्द प्रेषित इसैया, अ‍ॅमॉस किंवा हिल्लेल यांचेहि आहेत असें आढळेल.  ही चिनी वाणी अरॅमिक भाषेंत भांषांतरिल्यास ती गॅलिलींतील निळ्या नभाखालच्या पर्वतांच्या व्यासपीठावरून उपदेश करणार्‍या तद्‍नंतरच्या ज्यू धर्मसंस्थांपकांचीच वाणी वाटेल.

- २ -

गॅलिलीचा तो सौम्य पुरुष ! तो फकिराप्रमाणें हिंडणारा महात्मा ! त्याला कोणीं देव तर कोणीं पागल बनविलें आहे ! कोणी त्याला जादूटोणा करणारा समजत, तर कोणी त्याला ढोंगी बुवा म्हणत ! कोणी तर त्याला 'अमेरिकन पध्दतीचा प्रचारक' मानतात.  पण तो यांपैकीं कोणीहि नव्हता.  प्रेमानें द्वेष शमवावा, क्षमेनें सूड जिंकावा, नम्रतेनें अहंकार जिंकावा, शांतीनें रक्तपात जिंकावा, असें शिकविणारे जे अनेक महात्मे पूर्वेकडे झाले, त्यांच्याच परंपरेतील व त्याच मालिकेंतील तोहि एक होता.  त्याचें खरें चित्र आजपर्यंत काढलें गेलेलें नाहीं व पुढेंहि कधीं काढले जाईलसें वाटत नाहीं. कारण, त्याच्या प्रत्येक चरित्रकारानें जणूं स्वत:चेंच चित्र काढून त्याला ख्रिस्ताचें नांव दिलें आहे, स्वत:ला ख्रिस्तावर लादलें आहे ! बायबलांत जसा येशू चमत्कार करणारा दिसतो, त्याच्याभोंवतीं जसें तेजोवलय शोभतें, तद्वतच रेनन, पापिनी, बस बार्टन वगैरेंनीं लिहिलेल्या चरित्रांतहि येशूच्या बाबतींत प्रकार आढळतात.  ख्रिस्ताच्या आपणांसमोर असलेल्या चित्रांत खूप विरोधाभास आहेत !  एका गालावर मारले असतां दुसरा गाल पुढें करण्यास सांगणारा येशू मंदिरांत जमलेल्यांस फटके मारून बाहेर हाकलीत आहे असें दिसतें !  एका क्षणांत तो पृथ्वीवर शांतता आणणारा आढळतो, तर दुसर्‍या क्षणीं तो तरवार परजीत आहेसें दिसतें ! सुखाचें व शांतीचें उपनिषद् सांगणारा तो सुखी लोकांची टिंगल उडवितो ! (जे तुम्ही आज हंसत आहां, तेच उद्यां रडाल, आक्रोश कराल, समजलें ?) तो शत्रूंना क्षमा करतो पण शत्रूंना प्रभूनें ठार करावें म्हणून प्रभूला आळवितोहि !  स्वर्गाच्या राज्याची घोषणा करणाराच तो अनेक जातींच्या जाती नरकांत लोटतो !  आपला उपहास करणारांनाहि आशीर्वाद देणाराच तो अंजिराचें झाड अंजीर देत नाहीं (अंजिरांचा मोसमच नसतां कोणता शहाणा मनुष्य अंजिराच्या झाडापासून अंजीर अपेक्षील ?) म्हणून त्याला शिव्याशाप देण्यासहि मागेंपुढें पाहत नाहीं !  असे हे परस्परविरोधी तुकडे एकत्र करून त्यांवरून जिवंत माणसाचें खरेंखुरें चित्र तयार करतां येईल का ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel