अलेक्झांडरनें ग्रीस देशांत सर्वत्र विजय-संचार केला.  त्याला कोणीहि कोठेंच विरोध केला नाहीं असें नाहीं.  तरवारीनें विरोध करणारे जरी त्याला फारसे भेटले नाहींत, तरी निराळ्याच रीतींनीं त्याला गप्प बसविण्याचे प्रकार कांहीं ठिकाणीं झाले.  अलेक्झांडरविषयीं आपणांस खरोखर काय वाटतें हें त्याच्या तोंडावर सांगण्याइतपत धैर्य व स्वातंत्र्य असलेले कांहीं लोक अद्यापि होते.  अलेक्झांडर जेव्हां कॉरिन्थ येथें आला तेव्हां विजयी वीराला शोभेसें त्याचें स्वागत झालें.  हजारोंनीं जयघोष केले, पण तेथें जमा झालेल्या स्तुतिपाठकांत त्याला डायोजिनीस दिसेना.  डायोजिनीस हा या जगांत कशांतहि कांही अर्थ नाहीं, सारें पोकळ व भोंगळ, दिखाऊ व व्यर्थ आहे असें मानणारा 'सिनिक' होता.  कॉरिंथमधल्या एकाच माणसाला अलेक्झांडर किंमत देई ; तो म्हणजे डायोजिनीस.  त्यानेंहि आपली स्तुति करावयास यावें असें अलेक्झांडरला वाटत होतें ; पण तो वृध्द पाखंडी आला नाहीं.  कॉरिन्थजवळच्या एका खेड्यांत तो शांतपणें व निश्चिंतपणें बसला होता.  जेत्यांचा गर्व व सम्राटांचा दिमाख दोहोंहिविषयीं तो बेपर्वा होता ; त्याला त्यांचें काडीइतकेंहि महत्त्व वाटत नव्हतें, तो मॅसिडोनियन सैन्याची ती प्रचंड व विजयी मिरवणूक पाहावयाला आला नाहीं कीं विजयी राजाचें दर्शन घडावें म्हणून त्यानें धडपडहि केली नाहीं.

डायोजिनीस आपणांकडे येत नाहीं असें पाहून अलेक्झांडरनेंच त्याच्याकडे जावयाचें ठरविलें.  डायोजिनीस एकटाच सूर्यप्रकाशांत ऊन खात बसला होता,  तेथें जाऊन मैत्रीची व उदारपणाची बजावणी करीत त्यानें विचारलें, 'मी तुम्हांला काय देऊं ?  तुमच्यासाठीं मीं करण्यासारखें कांहीं आहे काय ?'' ''होय,'' तो वृध्द व बेरकी डायोजिनीस म्हणाला, ''एक गोष्ट तुम्ही खास करूं शकाल : सूर्यप्रकाशाच्या व माझ्या दरम्यान तुम्ही उभे आहां तेवढे दूर व्हाल तर बरें.''

त्या म्हातार्‍याच्या या उध्दटपणाबद्दल त्याला शासन न करतां विचार-चिंतन करण्यासाठीं त्याला तेथेंच सोडून अलेक्झांडर निघून गेला !  अ‍ॅरिस्टॉटलचा शिष्य तो उगीच नव्हता झाला.  तो आपल्या एका खुशामत्यास म्हणाला, ''मी जर अलेक्झांडर नसतों तर डायोजिनीस होणें मीं पसंत केलें असतें.''  या म्हणण्यावर उत्तर द्यावेंसें डायोजिनीस याला वाटलेंच असतें तर तो म्हणाला असता, ''मी जर डायोजिनीस नसतों तर अलेक्झांडरखेरीज दुसरा कोणीहि व्हावयाला मी तयार झालों असतों.''

- ५ -

अलेक्झांडर अति महत्त्वाकांक्षी होता.  त्याच्या महत्त्वाकांक्षेनें त्याच्या डोक्यांतील सारें तत्त्वज्ञान पिटाळून लावलें होतें, इतर सारे विचारहि पार हांकलून दिले होते.  तो मागेंपुढें पाहणारा नव्हता ; तो बेछूट व बेदरकार असा केवळ सैतान होता !  जेथें पाऊल टाकण्यासहि इतरांस भय वाटे, तेथें तो खुशाल उडी घेई व नि:शंकपणें घुसे.  जें सर्वस्वीं अशक्य वाटे त्याबाबतहि तो जुगार खेळे व बहुतकरून विजयी होई.  एकादी दुस्तर नदीहि अलेक्झांडर सहज तरून जाई.  एकाद्या दुर्लंघ्य डोंगरावरून शत्रूला हुसकावयाचें असेल तर तो ती टेकडी चढून जाई व शत्रूला पळावयाला लावी.  देव नेहमीं त्याच्या बाजूनें लढतात अशी लोकांची समजून झाली होती.  तो सरळ, साधाभोळा प्ल्यूटार्क लिहितो, ''पँपिलियन किनार्‍याजवळील समुद्राच्या लाटा तेथील खडकाळ टेकड्यांच्या अगदीं पायथ्यापर्यंत येतात.  पण अलेक्झांडरला नीट जातां यावें म्हणून या लाटाहि मागें हटल्या व त्यांनीं त्याला रस्ता दिला.''  जेव्हां त्यानें फोनिशियनांच्या टायर शहराला वेढा घातला, तेव्हां तेथील लोकांनीं शहरांतील अ‍ॅपोलो देवाचा पुतळा दोरखंडांनी जाम बांधून टाकला व 'आतां कसा अ‍ॅपोलो अलेक्झांडरच्या बाजूला जातो, पाहूं या' असें ते स्वत:शीं म्हणाले.  त्या देवानें आपणांस सोडून अलेक्झांडरकडे जाऊं नये म्हणून त्यांनीं त्याला खिळे मारून जागच्या जागीं खिळवून टाकलें.  पण प्ल्युटार्क सांगतो, ''टायरमधील जनतेचे ते सारे प्रयत्न झुगारून देऊन अ‍ॅपोलो अखेर अलेक्झांडरकडे गेला तो गेलाच.  त्याचें शरीर दोरखंडांनी व खिळ्यांनीं जखडून टाकण्यांत आलें असलें तरी मन मोकळेंच होतें ; त्यामुळें अ‍ॅपोलोचा आत्मा अलेक्झांडरच्या वतीनेंच लढला.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel