ते दोघे या मानवी अणूंना विचारतात, ''तुम्ही कसे जगतां ? वेळ कसा घालवितां ?'' ते मानवी अणू सांगतात, ''आमचा पृथ्वीवरचा बराचसा वेळ एकमेकांना मारण्यांतच जातो.''  एक तत्त्वज्ञानी त्यांना सांगतो, ''या क्षणीं आमच्या जातीचें एक लाख जंतू डोक्यांवर टोप्या घालून डोक्यांवर पागोटीं घालणार्‍या दुसर्‍या एका लाखांत मारीत आहेत.''  तो मानवी अणू पाहुण्यास पुन: सांगतो, ''ही मारामारी पॅलेस्टाइन नांवाच्या एका वारुळासाठीं चालली आहे.'' पुन: तो सांगतो, ''जे लाखों लोक एकमेकांचे गळे कापीत आहेत त्यांना त्या पॅलेस्टाइनच्या ढिपळावर सत्ता नाहींच मिळवावयाची. तें पॅलेस्टाइन सुलतानाच्या ताब्यांत असावें कीं युरोपीय राजाच्या ताब्यांत असावें यासाठीं ही मारामारी, ही खुनी कत्तल ! आणि अशा कत्तली अनादि कालापासून पृथ्वीवर सारख्या चालू आहेत.'' पृथ्वी नांवाचा हा ग्रह म्हणजे वेड्यांचें घर आहे असें या पाहुण्यांना वाटतें व त्या मानवी अणुपरमाणूंना सोडून ते आपल्या विचारवंत लोकीं त्वरेनें प्रयाण करतात.

- २ -

व्हॉल्टेअरच्या इंग्लंडच्या भेटींतून मायक्रोमिडास हें एकच पुस्तक जन्मलें नाहीं, तर 'इंग्रजांसंबंधीं पत्रें' हें त्याहूनहि अधिक महत्त्वाचें पुस्तकहि निर्माण झालें. अर्थातच तें तितकें मनोरंजन नव्हतें हें खरें. या पत्रांमध्यें त्यानें फ्रेंचांच्या गुलामीची इंग्रजांच्या स्वतंत्र वृत्तीशीं तुलना केली आहे, इंग्लंडच्या नियंत्रित राजशाहीचा गौरव केला आहे व तसलेंच सरकार फ्रेंचांनी फ्रान्समध्यें स्थापावें असें प्रतिपादन केलें आहे. त्यानें जवळजवळ 'आपला राजा फेंकून द्या' असेंच लिहिलें आहे. 'तत्त्वज्ञानाची कथा' या आपल्या पुस्तकांत डॉ० ड्यूरांट लिहितो, '' व्हॉल्टेअरला माहीत असो वा नसो, त्याचा हेतु असो वा नसो; त्याचीं पत्रें म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीच्या कोंबड्याचें पहिलें आरवणें होतें.''  व्हॉल्टेअरला हद्दपारींतून परत बोलावण्यांत आलें. ही पत्रें प्रसिध्द व्हावीं अशी त्याची इच्छा मुळींच नव्हती; खासगी रीत्या प्रचार व्हावा म्हणूनच त्यानें तीं लिहिलीं होतीं. पण एका अप्रामाणिक प्रकाशकाच्या हातीं तीं पडलीं व त्यानें व्हॉल्टेअरची परवानगी न घेतांच तीं छापून टाकलीं ! एका सरकारी अधिकार्‍याच्या हातीं एक प्रत आली. त्यानें लगेच तें पुस्तक राजद्रोही, अधार्मिक आणि अनीतिमय आहे असें जाहीर केलें. तें पुस्तक जाहीर रीत्या जाळण्यांत आलें व त्याला पकडण्यासाठीं पुन: वॉरंट निघालें.

बॉस्टिलच्या तुरुंगांत पुन: जाऊन बसण्याची व्हॉल्टेअरची इच्छा नव्हती. बॅस्टिलच्या तुरुंगाचें शिल्पकाम, त्याचा नकाशा, त्याचा आंतर भाग यांची आतां त्याला पुरेपूर माहिती असल्यामुळें तो पोलिसांच्या हातून निसटून पळून गेला व आपल्या प्रियकरिणीच्या बाहुपाशांत जाऊन विसांवला.

या त्याच्या प्रेयसीचें नांव मार्क्किसे डु चॅटेलेट. ती विवाहीत होती. तिचा नवरा म्हातारा व सैन्याबरोबर दूर होता. त्याच्या गैरहजेरीचा व्हॉल्टेअरनें पुरापुरा फायदा घेतला तो त्याची पत्नी व त्याचा किल्ला यांचा जणूं धनीच बनला. मार्क्किसे सुंदर तशीच चतुर होती. सिरे येथें तिचा बंगला होता. ही जागा यात्रेचें, विलासाचें, आनंदाचें व मेजवानीचें स्थान बनली. येथें तत्त्वज्ञानाच्या चर्चा चालत, खानपानहि चाले. प्राचीन ग्रीक लोकांचें वैभव जणूं पुन: सजीव झालें ! पलेटोच्या काळापासून अशीं भोजनें झालीं नव्हती, कीं अशा चर्चाहि झाल्या नव्हत्या. सिरे येथील हें स्थान युरोपभर विख्यात झालें. फ्रान्समधील निमांकित विद्वान् व उत्तमोत्तम बुध्दिमान् लोक व्हॉल्टेअरनें येथें गोळा केले. तो त्यांना सर्वोतकृष्ट मद्य देई,  त्यांच्यासाठीं आपलीं नाटकें करून दाखवी व आपल्या विनोदी टीकांनीं त्यांना पोट धरधरुन हंसावयाला लावी. सिरें येथेंच त्यानें आपल्या अत्युत्तम Cynical कथा लिहिल्या. कॅन्डिडे, The World As It Goes, Zadig, The Pupil of Nature, The Princess of Balaglon वगैरे मनोरम कथा त्यानें लिहिल्या.

या गोष्टींतील प्रमुख पात्रें म्हणजे रक्तामांसाचीं माणसें नाहींत. आपल्या मनांतल्या कल्पनांनाच मानवी पोषाख देऊन त्यानें उभें केलें आहे. हीं सारीं पात्रें म्हणजे कल्पनांचीं प्रतीकें आहेत, रूपकें आहेत. किती रसभरित व भव्य-दिव्य कल्पना ! आणि त्याना दिलेले पोषाखहि किती कल्पनारम्य ! या अद्भुत गोष्टींपैकीं कॅन्डिडे ही गोष्ट सर्वांत छान आहे. ही त्यानें तीन दिवसांत लिहिली. ही लिहितांना त्याची लेखणी जणूं अक्षरश: हंसत होती ! या पुस्तकांत त्यानें असें सिध्द केलें आहे कीं, या जगाहून अधिक वाईट जग असणें शक्य नाहीं. आपण राहतों तें जग शकय तितकें वाईट आहे. या गोष्टीसाठीं त्यानें घेतलेल्या विषयाहून अधिक खेदोत्पादक व उदास करणारा विषय सांपडणें विरळा ! पण व्हॉल्टेअरच्या जादूच्या स्पर्शानें निराशाहि हंसूं लागते. निराशाहि अत्यंत विनोदी वस्तु म्हणून गौरवावी,  पूजावी असें वाटतें. कॅन्डिडे ही गोष्ट म्हणजे निराशेचें बायबल; पण वाङ्मयाच्या इतिहासांतील हें अत्यंत आनंददायक पुस्तक आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel