ह्या विचारसरणीच्या सौंदर्यशास्त्रज्ञांना सुंदर शरीरांतील सुंदर आत्मा हें सौंदर्यांचे ध्येय आहे-असें वाटतें. बामगर्टननें अंतिम सत्याचे तीन निरनिराळे भाग पाडले होते. सत्य, शिव व सुंदर असे त्यानें अलग, परस्परनिरपेक्ष भाग कल्पिले होते. परंतु सुल्झर वगैरे पंडित हें पृथकत्व पुसून टाकून सत्य, शिव व सुंदर एकच करितात. सत्य व शिव यांत सौंदर्य ते विलीन करितात व सौंदर्यांत सत्यं शिवं ते पाहतात !

यांच्याकडून येणा-या सौंदर्यसमीक्षकांनी ही विचारसरणी तर नाहींच उचलिली, उलट तिच्या विरुध्द् बंडाचा झेंडा त्यांनी उभारिला. विकेलमनची सौंदर्यविषयक कल्पना सुल्झर वगैरेंच्या कल्पनेच्या अगदी विरुध्द् आहे. तो म्हणतो कलेचा हेतु व नीतीचा हेतु हे भिन्न आहेत. कला व नीति यांचें गमनपंथ एक नाहींत, यांचें प्राप्तव्य एक नाहीं, कलेला सत्यं शिवंशीं कांहीएक करावयाचें नाहीं. कलेचा हेतु बाहय सौंदर्य हा आहे. हें सौदर्य इंद्रियगम्य असें असलें पाहिजे.

१७१७-१७६७ हा विकेलमनचा काळ होय. कला व नीति यांची स्पष्ट भाषेंत त्यानें फारकत केली आहे. त्याचा सौंदर्यशास्त्रविषयक ग्रंथ प्रसिध्द् आहे. सौंदर्य हा कलेचा आत्मा होय. हें सौंदर्य सन्निरपेक्ष असतें. सत्य व शिव यांवर ते अवलंबून नाही. सौंदर्य हे त्रिविध असतें. (१) आकार सौंदर्य, (२) विचार सौंदर्य किंवा कल्पना सौंदर्य. हें मूर्तीच्या वगैरे रुपानें प्रगट होतें. (३) भाव सौंदर्य हें पहिल्या दोन प्रकारचें सौंदर्य असेल तरच प्रगट होतें. आकार सौंदर्य + विचार सौंदर्य =  भावसौंदर्य. हे भावसौंदर्य म्हणजे कलेचें परमोच्च ध्येय होय. प्राचीन कलेंत हें परम ध्येय गांठलेले दिसून येतें. अर्वाचीन कलेनें प्राचीन कलेचे अनुकरण केलें पाहिजे. इत्यादि याचे विचार आहेत.

लेसिंग, हर्डर यांच्यानंतर गटे काँटपर्यंतचे सर्व प्रसिध्द् जर्मन सौंदर्यशास्त्रवेत्ते हया वरील विचारसरणीचेच भोक्ते आहेत. काँटच्या वेळेपासनून पुन्हां कलेसंबंधी नवविचार उत्पन्न होऊं लागले.

याच काळांत इंग्लंड, फ्रान्स, इटली, हॉलंड वगैरे देशांत स्थानिक व देशीय अशा सौंदर्यविषयक कल्पना व विचार यांचा जन्म झाला. हे विचार जरी जर्मन पंडितांचे उसने घेतलेले नव्हते, तरी ते स्पष्ट नव्हते; हे विचार पुष्कळदां परस्परविरोधीहि असत. जर्मन सौंदर्य-शास्त्रज्ञांप्रमाणे हया पंडितांनींहि सौंदर्यांच्या कल्पनेवरच आपापल्या कलाविषयक पध्दति उभारिल्या आहेत. सौंदर्य हे शाश्वत असें अंतिम सत्य आहे व कमीअधिक प्रमाणांत तें मंगलाशींहि संलग्न आहे. सौंदर्य व साधुता ही एकाच मुळापासून उत्पन्न झालीं आहेत. अशा प्रकारचे हयांचे विचार आहेत. बामगर्टनचे समकालीन-त्याच्या थोडेसे आधींचेच म्हणा वाटलें तर असे शॅफ्टस्वरी, हटि्चसन, होम, बर्क, होगार्थ वगैरे लेखक आहेत व ह्यांनी कलेवर लिहिले आहे.

शॅफ्टस्वरी (१६७०-१७१३) म्हणतो जे सुंदर असतें तें असें असतें तें सत्य असतें. जें सुंदर व सत्य आहे तें अर्थातच सुखकर व मंगलावह असें असणारच. सौंदर्य हें मनालाच प्रतीत होतें. मूलभूत सौंदर्य म्हणजे परमात्मा. सौंदर्य व शिवत्व यांचा एकाच मुळांतून जन्म होतो, त्यांचा उगम एकाच ठिकाणाहून होतो.”

सौंदर्य हे साधुत्वापासून शॅफ्टस्वरीनें जरी अलग मानिलें आहे, तरी शेवटीं अविभाज्य असा संगमच त्यानें केला आहे. अंती तीं एकांत एक इतकी मिळून जातात कीं त्यांच्यांत पृथकत्व राहातच नाहीं.

हटचिसनचा १६९४ ते १७४७ हा काळ होय. “सौंदर्य व सद्गुण याच्या विचारांच्या प्रारंभाची मीमांसा”- ह्या आपल्या पुस्तकांत हा म्हणतो सौंदर्य हे कलेचे ध्येय आहे. आपल्या मनांत एकता व अनेकता यांची जाणीव उत्पन्न करणे हें कलेचें खरें स्वरुप होय. कला काय हें अंत:करणालाच समजतें. हें अंत:करण नैतिक भावनांपासून निराळेंहि असें नाहिं. सौंदर्य व साधुता यांचें साहचर्य नेहमी असतेंच असें नाही. सौंदर्य हें साधुत्वापासून अलगहि असूं शकतें, एवढेंच नव्हें तर कधीं कधीं प्रतिकूलहि असूं शकते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel