श्रीमंत लोकांनी पूर्वी ज्या कलात्मक भावना अनुभविल्या असतील त्यांची स्मृती जागृत करून देण्याचे काम ही सोंगाडी कला करीत असते. ही सोंगाडी कला असा भ्रम उत्पन्न करते, असे मृगजळ उत्पन्न करते की त्या वरच्या वर्गातील लोकांना आपण खरोखरच सत्कला चाखीत आहोत असे वाटू लागते. कलेपासून केवळ सुखसंवेदनाचीच अपेक्षा करणा-या त्या विलासी जीवांना ही नक्कलच अस्सल आहे असे वाटते व ते वाहवा बोलू लागतात. अहोरूपमहोध्वनीचा सारा प्रकार. ह्या कृत्रिम कलेला स्वत:ची नीट बतावणी करून दाखविण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. पूर्वीच्या कला म्हणून मान्य झालेल्या कृतींतून जसे वातावरण असेल तसे निर्माण करण्याची जरूर असते. हे जे जुने उसने घ्यावयाचे त्याला काव्यमय असे नाव देण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या दंतकथा, कवीसंकेत, आख्यायिका, लोककथा, प्राचीन परंपरा या सर्वांना मिसळून काव्यसृष्टी होत असते. काव्यमय वस्तू व काव्यमय व्यक्ती यांचा एक विशिष्ट संग्रहच असतो. नायक व नायिका, प्रिया व प्रियकर, गुराखी, यति, देवदूत, सर्व प्रकारची भूतेखेतें, यक्षकिन्नर, राक्षस, ज्योत्स्ना, वीज, पर्वत, सागर, सरोवरे, वने-उपवने, लांब केशकलाप, सुंदर डोळे, पारवे, कबुतरे, बुलबुल, गुलाब, लिली-असा हा काव्यमय वस्तू व काव्यमय व्यक्ती यांचा पसारा असतो. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे प्राचीन कवींनी ज्या ज्या वस्तूंचा व ज्या ज्या व्यक्तींचा आपल्या कलाकृतींतून उपयोग केला होता, त्या सर्व आपणांस काव्यमय वाटत असतात. अशा ह्या पसा-यांतून काहीतरी निर्माण करण्यात येत असते व ते श्रीमंतांच्या जवळ देण्यात येत असते.
सुमारे ४० वर्षांपूर्वी एक पडत मूर्ख अशी बाई (ती आता जिवंत नाही.) माझ्याकडे आली व म्हणाली, ''मी लिहिलेली कादंबरी तुम्ही ऐका; मी वाचून दाखविते.'' त्या कादंबरीचा आरंभ एका नायिकेच्या वर्णनापासून झाला होता. तिचा पोषाख ठराविक काव्यमय असा होता व तिचे कसे काव्यमय दाखविलेले होते; काव्यमय वनाममध्ये एका काव्यमय निर्झराजवळ एक काव्यमय पुस्तक ती वाचीत असते. परंतु एकदम पाठीमागून एक काव्यमय नायक पुढे येतो. पिसे लावलेली टोपी त्याच्या शिरावर असते. त्याच्याबरोबर दोन काव्यमय श्वेत श्वान होते. त्या लेखिकेला तिने लिहिलेले सारे काव्यमय वाटत होते, आणि ते सारे वर्णन काव्यमय म्हणून वाखाणण्यात आले असते; परंतु पुढे त्या नायकाला काहीतरी बोलणे तर भाग होते. केवळ वर्णन कोठवर पुरणार? बोलण्याची वगैरे आवश्यकता न भासती तर फार चांगले झाले असते. परंतु पिसांची टोपी घातलेला तो नायक जेव्हा त्या शुभ्र पोषाखांतील काव्यमय कुमारीजवळ बोलू लागतो, त्यावेळेस त्याच्या तोंडात कोणते विचार घालावे, ते ग्रंथकर्तीला समजत नाही. तिच्या स्वत:च्या जवळ तर काहीच सांगण्यासारखे नसते. तिचे डोके रिकामे असते व हृदयांत खडखडाट असतो. अशा वेळेस दुस-या लोकांच्या काव्यमय कृतीतील काही काव्यमय वचनांची तिला आठवण येते. त्या स्मृती तिला आवडतात. त्या स्मृतींवर आपलेपणाचा शिक्का मारून आपण कलाकृती निर्माण करू असे तिला वाटते. परंतु भावनास्पर्श हा जो कलेचा मुख्य परिणाम, तो तेव्हाच घडवता येतो, जेव्हा कर्त्याला तो जी भावना देऊ पहात असतो, तिचा स्वत:च्या विशिष्ट अशा पध्दतीने अनुभव आलेला असतो, ज्यावेळेस दुस-याने कोणीतरी दिलेली भावना स्वत:ची समजून तो देऊ पाहतो, त्यावेळेस हा परिणाम होणार नाही. काव्यापासून स्फुरलेले काव्य-अस्सलाची ही नक्कल लोकांच्या हृदयाला स्पर्श करू शकणार नाही. अशा प्रकारचे खोटे पांघरूण घेतलेले काव्य, हे दांभिक, भावनाहीन, सोंगाडे काव्य, ज्यांची रूची बिघडलेले आहे अशा लोकांतच ढकेल व खपेल. त्या वर सांगितलेल्या लेखिकेला ना प्रतिभा, ना बुध्दि, ती बावळट व मूर्ख होती. एकंदर सारी तिची वस्तुस्थिती चटकन लक्षात येत होती. परंतु तिचे सोडून त्या. विद्वान व बुध्दिमान लोकही उसने घेतात व त्या उसन्याभोवती स्वत:च्या कलेचे तंत्र उभे करतात; त्या उसन्या वस्तूला अवडंबराने सजवतात. परंतु त्यांच्या या कलेतील ग्रीक कलांपासून घेतलेली उसनवारी लक्षांत आल्याशिवाय राहात नाही. प्राचीन जगांतील, ख्रिश्चन दंतकथांतील, जुन्या साहित्यांतील चोरून घेतलेले भाग दिसून येतात. दिवसेंदिवस ही भिकारडी उसनवारी वाढत आहे. या उसनवारीला त्यात या कलाप्रांतांतील पोषाख जरा खुबीने चढविला की सर्व काही चालते.